लुई ब्रेल यांना अंध व्यक्तींसाठी ब्रेल लिपी तयार करण्यासाठी सैन्याच्या संदेशांची मदत कशी झाली? वाचा
रविवार, 7 जानेवारी 2024 (10:42 IST)
ही गोष्ट आहे 1812 ची. एक दिवस फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिसजवळील कूपव्रे कम्युनमध्ये कार्यशाळा भरली होती. या कार्यशाळेत लुई ब्रेल नावाचा मुलगा खेळत होता, याच ठिकाणी त्याचे वडील हार्नेस तयार करायचे.
हार्नेस हे घोड्याचं खोगीर बांधण्यासाठी किंवा लगाम बनविण्यासाठी वापरलं जातं.
तीन वर्षांचा असताना, चामड्याचं काम करणं किंवा त्या अवाजारांकडे आकर्षित होणं साहजिक होतं. त्याचे वडील ज्या पद्धतीने काम करायचे तेच तो करू लागला. त्याने वडील जशी धारदार शस्त्र हाताळतात तशी शस्त्र हाताळायला सुरुवात केली.
कदाचित त्याने हे पहिल्यांदाच केलं नसावं. आणि जरी त्याने हे केलं असेल तरी त्याला अशा वस्तू हाताळू नको असं सांगितलं असावं. पण त्याचं वय पाहता त्याने हे ऐकलच नाही.
पण त्या नंतर जो अपघात झाला ज्यामुळे त्याचे आणि काही वर्षांनंतर इतर अनेकांचे जीवन बदललं.
त्याने चामड्यात छिद्र पाडण्याचा प्रयत्न करताना त्याच्या हातातून आरी निसटली आणि थेट डोळ्यात गेली.
त्याला डोळ्याला संसर्ग झाला आणि संसर्ग केवळ वाढलाच नाही तर दुसऱ्या डोळ्यातही पसरला.
वयाच्या 5व्या वर्षी लुई ब्रेल पूर्णपणे अंध झाला.
त्याच्या परिसरात असणाऱ्या शाळेत अंधांसाठी कोणताही विशेष उपक्रम किंवा मदतीचं केंद्र नव्हतं. मात्र त्याच्या पालकांचं स्पष्ट मत होतं की, आपल्या मुलाने शिक्षण घेतलं पाहिजे. म्हणून त्यांनी वयाच्या 7 व्या वर्षी ब्रेलला शाळेत घातलं.
बहुतेक वेळा तो त्याचा अभ्यास तोंडपाठ करायचा, त्यामुळे तो वर्गात अतिशय गुणवान विद्यार्थी होता. पण वाचता आणि लिहिता येत नसल्यामुळे त्याची नेहमीच गैरसोय होत असे.
शेवटी, त्याच्या सोबत जे काही चांगलं घडायचं होतं ते घडलंच. त्याने फ्रान्समधील रॉयल इन्स्टिट्यूट फॉर ब्लाइंड यूथ (आरआयजेसी)मध्ये अभ्यास करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळवली.
पॅरिसचं शिक्षण
ब्रेल 10 वर्षांचा असताना पॅरिस मध्ये आला.
त्या वेळी, त्या संस्थेत वापरण्यात येणारी वाचन पद्धत अगदी मूलभूत होती. त्यांनी जी काही पुस्तकं छापली होती त्यातले शब्द थोडे उंच होते. शाळेचे संस्थापक व्हॅलेंटीन हाई यांनी हा प्रकार शोधून काढला होता.
म्हणजे शब्द तयार करण्यासाठी किंवा वाक्य तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना खूप प्रयत्न करून त्या पुस्तकावर बोटं फिरवावी लागायची आणि त्यानंतर अर्थ लावता यायचा.
1821 मध्ये, फ्रेंच सैन्यातील कॅप्टन चार्ल्स बार्बियर यांनी लाईटचा वापर न करता अंधारात रणांगणावरील संदेश वाचू शकता येईल अशी प्रणाली विकसित केली होती. ही प्रणाली दाखवण्यासाठी ते संस्थेत आले होते.
रात्रीच्या अंधारात वाचता येणारी लिपी अंधांसाठी सुद्धा फायदेशीर ठरू शकते असं त्यांना जाणवलं.
अक्षरांऐवजी बिंदू आणि रेषा
त्यामुळे छापील आणि उठावदार अक्षरे वापरण्याऐवजी, लिखाणात ठिपके आणि रेषा वापरण्यात आले.
विद्यार्थ्यांनी यावर प्रयोग केले, पण लवकरच त्यांचा उत्साह मावळला कारण प्रणालीमध्ये केवळ विरामचिन्हंच नव्हती तर फ्रेंच शब्दांना प्रतिशब्द म्हणून वापरात आलेल्या खुणा देखील होत्या.
लुई ब्रेल मात्र आपल्या निश्चयावर ठाम होता.
त्याने या खुणा आधार म्हणून वापरल्या.
तीन वर्षांनंतर, जेव्हा तो 15 वर्षांचा झाला, तेव्हा त्याने आपली नवीन प्रणाली पूर्ण केली होती.
बदल
त्याच्या नवीन लेखन पद्धतीची पहिली आवृत्ती 1829 मध्ये प्रकाशित झाली.
त्याने बार्बियर यांची प्रणाली सुलभ करून थोडे बिंदू कमी केले होते.
योग्य आकाराचे बिंदू आपण एकाच स्पर्शात आणि आपल्या बोटाच्या टोकाने अनुभवू शकू ही कल्पना त्याने प्रत्यक्षात आणली.
कागदावर उठलेले ठिपके तयार करण्यासाठी त्याने एका सुईचा वापर केला. हीच ती सुई होती ज्यामुळे त्याला अंधत्व आलं होतं.
आणि सरळ रेषा नीट आखल्यात याची खात्री करण्यासाठी, त्याने पट्टी वापरली.
लुई ब्रेलला संगीताची आवड असल्याने त्याने नोट्स लिहिण्यासाठी एक प्रणाली शोधून काढली.
बराच वेळ गेला...
त्यावेळचं जग अतिशय पुराणमतवादी असल्यामुळे ब्रेलच्या नाविन्याचा अवलंब करण्यास संस्था लवकर तयार झाल्या नाहीत.
इतकं की तो ज्या संस्थेत शिकला होता त्या संस्थेतही ती प्रणाली अवलंबात आणली नाही. शेवटी ब्रेलच्या मृत्यूआधी 2 वर्ष ही लिपी वापरण्यास सुरुवात केली.
वयाच्या 43 व्या वर्षी क्षयरोगाने त्याचा मृत्यू झाला
कालांतराने, ही लिपी फ्रेंच भाषिक जगतामध्ये वापरली जाऊ लागली. 1882 मध्ये युरोप आणि 1916 मध्ये उत्तर अमेरिका आणि नंतर उर्वरित जगापर्यंत पोहोचली
अतिशय सोपी लिपी
ब्रेल लिपीमुळे जगभरातील अनेक अंध लोकांचं जीवन बदललं.
ही लिपी इतर युरोपियन लिपींप्रमाणे डावीकडून उजवीकडे वाचली जाते. ती कोणतीही भाषा नसून एक लेखन प्रणाली आहे, याचा अर्थ ती वेगवेगळ्या भाषांमध्ये स्वीकारली जाऊ शकते.
गणित आणि वैज्ञानिक सूत्रांसाठी ब्रेल कोड विकसित करण्यात आलेत.
मात्र नवीन तंत्रज्ञानाच्या आगमनाने या लिपीच्या साक्षरतेचं प्रमाण कमी होत आहे.
मरणोत्तर सन्मान
1952 मध्ये, लुई ब्रेलच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी त्याचे शरीराचे अवशेष शोधून काढून पॅरिसमधील पॅंथिऑनमध्ये हलविण्यात आले. इथे फ्रान्समधील प्रसिद्ध बौद्धिक विचारवंतांना दफन करण्यात आलं आहे.
मात्र त्याचं मूळ असलेल्या कूपव्रेमध्ये त्याचे हात एका कलशात ठेऊन दफन करण्यात आले आहेत.
त्याने केलेल्या कामाचा सन्मान म्हणून नासाने दुर्मिळ प्रकारच्या 9969 लघुग्रहाला ब्रेल असं नाव दिलं. ही ब्रेलसाठी मोठी श्रद्धांजली आहे.