लसूण, बीट, कलिंगड खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो का? या दाव्यासंदर्भात ब्रिटनमधील डॉ. ख्रिस वान टूल्लेकेन यांनी पडताळणी केली. त्यांना काय आढळलं?
हृदयविकाराचा त्रास असणाऱ्या रुग्णांसाठी उच्च रक्तदाब हा मोठा धोका असतो. ब्रिटनमध्ये सर्वाधिक मृत्यू यामुळेच होतात.
लसूण, बीट आणि कलिंगडामुळे रक्तदाब नियंत्रणात राहत असेल तर हे पदार्थ जीवरक्षक होऊ शकतात.
लंडनस्थित किंग्स कॉलेजचे डॉ. अँडी वेब यांनीही या दाव्यासंदर्भात प्रयोग केले. खरंच या तीन गोष्टींमुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो का
कसा केला प्रयोग?
रक्तदाब अनियमित असणाऱ्या 28 स्वयंसेवकांना निवडण्यात आलं.
या सगळ्यांचा उच्चतम रक्तदाब 130mm होता. सर्वसाधारण लोकांचा रक्तदाब 120 असणं अपेक्षित आहे. या स्वयंसेवकांना तीन गटांमध्ये विभागण्यात आलं.
पहिल्या गटातील लोकांना दररोज लसणाच्या दोन पाकळ्या खायला देण्यात आल्या.
दुसऱ्या गटातल्या लोकांना रोज कलिंगडाच्या दोन मोठ्या फोडी देण्यात आल्या.
तिसऱ्या गटातल्या लोकांना रोज दोन बीट खाण्यास सांगण्यात आलं.
तीन आठवड्यात प्रत्येक गटाने तिन्ही वस्तू आलटून पालटून खाल्या.
लसूण, बीट, कलिंगडात असं काय खास असतं?
सुपरफूड्स सारख्या प्रसारमाध्यमांमध्ये वापरल्या जाणाऱ्या संकल्पनांना आपण महत्त्व देत नाही पण खाण्यापिण्यातल्या अनेक गोष्टी आपल्या प्रकृतीवर थेट परिणाम करतात.
म्हणून आम्ही लसूण, बीट आणि कलिंगडाची चव चाखली. सिद्धांतानुसार या तीन गोष्टी रक्तदाब नियंत्रणात ठेवतात.
या तीन पदार्थांच्या सेवनामुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावतात आणि रक्ताचं वहन सहजेतेने होतं. पण या तीन पदार्थांचा परिणाम एकसारखा नाही.
चाचणीचे निष्कर्ष काय आहेत?
प्रत्येक स्वयंसेवकाचा रक्तदाब दिवसातून दोनवेळा मोजण्यात आला. प्रत्येकवेळी तीन आकडे नोंदवण्यात आले आणि त्याची सरासरी काढण्यात आली.
यानंतरच तीन पदार्थांचा नेमका परिणाम समजू शकला. कोणता पदार्थ सर्वाधिक परिणामकारक आहे ते स्पष्ट झालं.
या प्रयोगादरम्यान सर्व स्वयंसेवक सर्वसामान्य जीवन जगत होतं. त्या सगळ्यांचा सरासरी रक्तदाब 133.6mm नोंदवण्यात आला. बीट खाणाऱ्या समूहाचा रक्तदाब 128.7 तर लसूण खाणाऱ्या गटाचा 129.3 असा होता.
या छोट्या समूहावर केलेल्या प्रयोगाचे आकडे डॉ. वेब यांनी केलेल्या मोठ्या संशोधनाशी साधर्म्य साधत होते.
उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा त्रास यांच्यातील परस्परसंबंधावर करण्यात आलेल्या संशोधनातून हे स्पष्ट झालं होतं की रक्तदाब असाच कमी होत गेला तर स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका 20 टक्क्यांनी कमी होऊ शकतो.
कलिंगडाचा तसा परिणाम जाणवला नाही. यामुळे रक्तदाब 128.8 एवढाच नोंदला गेला. असं झालं कारण कलिंगडात पाणी असतं. सक्रिय घटकांची संख्या कमी असते.
प्रयोगातून काय मिळालं?
बीट आणि लसूण नियमितपणे खाल्लं तर रक्तदाब कमी राखायला मदत होऊ शकते मात्र केवळ हेच दोन पदार्थ खाल्ले तर रक्तदाब आटोक्यात राहील असं नाही.
बीटात नायट्रेट असतं. ते पालक, ब्रोकोली, कोबी यामध्येही असतं. लसणीत एलिसिन नावाचा घटक असतो. कांदा आणि तत्सम पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतो.
अनेक भाज्या-फळं आहेत ज्यामुळे आपला रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो. हे पदार्थ किती परिणामकारक ठरतील हे आपण किती प्रमाणात सेवन करतो यावर अवलंबून असेल.