न्यूमोनियाबाबत तुम्हाला माहिती असायला हव्या अशा 5 गोष्टी
सोमवार, 5 फेब्रुवारी 2024 (09:38 IST)
गेल्या काही दिवसांमध्ये जगभरात न्यूमोनिया सदृश्य श्वसनासंबंधीच्या संसर्गाची प्रकरणं वाढत असल्याचं समोर येत आहे.चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशननं नोव्हेंबर 2023 मध्ये देशात काही आजारांमध्ये वाढ झाल्याची माहिती दिली होती. इन्फ्लुएन्झा, कोविड आणि मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया या लहान मुलांवर गंभीर परिणाम करणाऱ्या जीवाणू संसर्गाचा त्यात समावेश होता.
जागतिक आरोग्य संघटनेनं (डबल्यूएओ) मात्र यामुळं फारसा धोका निर्माण होण्याची शक्यता नसल्याचं म्हटलं होतं. आरोग्य अधिकाऱ्यांना चीनमधील या न्यूमोनियासंदर्भात काहीही असामान्य आढळलं नसल्याचं डबल्यूएचओनं म्हटलं होतं.
विलगीकरणामुळं मुलांच्या प्रतिकारशक्तीच्या प्रमाणात जो फरक निर्माण झाला, तो यासाठी कारणीभूत असल्याचं डबल्यूएचओनं म्हटलं होतं. त्यामुळंच पॅथोजन्स (रोगजनक)च्या संपर्कात आल्यानंतर उद्रेक होत असल्याचंही डबल्यूएचओनं सांगितलं.
त्याचवेळी युके, फ्रान्स, डेन्मार्क आणि अमेरिका यांसारख्या देशांमध्येही निर्बंध उठवल्यानंतर अशा प्रकारच्या फ्लूसदृश्य आजाराच्या प्रकरणांत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.
डबल्यूएचओच्या मते जगभरात संसर्गजन्य आजारामुळं होणाऱ्या बालकांच्या मृत्यूचं सर्वात मोठं कारण न्यूमोनिया हे आहे.
2019 मध्ये यामुळं 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 7,40,180 चिमुकल्यांचा मृत्यू झाला. या वयोगटातील मुलांच्या एकूण मृत्यूच्या तुलनेत हे प्रमाण 14% होतं.
दक्षिण आशिया आणि सबसहारन आफ्रिका या भागांमध्ये मृत्यूचं प्रमाण सर्वाधिक आहे.
त्यामुळं न्यूमोनियाबाबत पाच गोष्टी आपल्या सर्वांना माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे.
1.न्यूमोनिया म्हणजे काय?
नॅशनल फाऊंडेशन फॉर इन्फेक्शियस डिसिज (NFID)च्या मते, न्यूमोनिया म्हणजे संसर्गामुळं फुफ्फुसांवर येणारी सूज.
न्यूमोनिया कोणालाही होऊ शकतो, पण काहींना त्यापासून अधिक धोका निर्माण होऊ शकतो.
कमी वयाची मुलं, वृद्ध नागरिक किंवा काही गंभीर आजार असणाऱ्यांना हा धोका जास्त असतो. या गंभीर आजारांमध्ये हृदयरोग, मधुमेह, फुफ्फुसांचे आजार, प्रतिकारशक्ती कमी करणारे आजार आणि काही प्रकारचे कर्करोग यांचा समावेश आहे.
2.लक्षणे काय आहेत?
न्यूमोनियाच्या लक्षणांमध्ये ताप, थंडी, खोकला, दम लागणे आणि अशक्तपणा याचा समावेश आहे.
पण परिस्थिती अधिक गंभीर बनल्यास त्यात श्वसनक्रिया बंद होणे, सेप्सिस किंवा अगदी मृत्यूदेखील होऊ शकतो. त्यामुळं गंभीर संसर्ग टाळण्यासाठी लवकर निदान आणि उपचार होणं गरजेचं असतं.
काही ठराविक लक्षणं दिसल्यास तातडीनं वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं असल्याचं अमेरिकन लंग असोसिएशननं म्हटलं आहे. यामध्ये श्वास घेण्यास त्रास होणं, ओठ किंवा बोटांची टोकं निळसर होणे, छातीत दुखणे, प्रचंड ताप किंवा बेडक्यासह खोकला या लक्षणांकडं दुर्लक्ष करू नये.
3.न्यूमोनिया कसा पसरतो?
न्यूमोनिया पसरण्याचे अनेक मार्ग आहेत. साधारणपणे लहान मुलांच्या नाकात किंवा घशात आढळणारे जीवाणू आणि विषाणू श्वासाद्वारे आत गेल्यास त्यामुळं फुफ्फुसांना संसर्ग होऊ शकतो.
खोकताना किंवा शिंकताना तोंडातून बाहेर पडणाऱ्या अतिसूक्ष्म थेंबांच्या माध्यमातूनही संसर्ग होऊ शकतो. हे थेंब पडलेल्या वस्तूला स्पर्श केल्यास त्यातून संसर्ग पसरतो.
पण न्यूमोनियासाठी कारणीभूत असलेले विविध प्रकारचे पॅथोजन्स आणि त्याच्या संसर्गाचे मार्ग यावर आणखी संशोधन होणं गरजेचं आहे. संसर्ग रोखण्यासाठीच्या उपाययोना आणि उपचार यासाठी ते महत्त्वाचं आहे.
4. न्यूमोनियावर उपचार कसे केले जातात?
अँटिबायोटिक्सद्वारे संसर्गावर उपचार शक्य असल्यास डॉक्टरांकडून त्याची शिफारस केली जाते. काही रुग्णांना अँटिबायोटिक्सची गरज भासत नाही.
बहुतांश रुग्णांना दोन ते चार आठवड्यांत बरं वाटतं.
त्याचवेळी अधिक धोका असलेले काही रुग्ण गंभीर आजारी पडतात. त्यामुळं त्यांना उपचारासाठी रुग्णालयांमध्ये दाखल करावं लागतं.
रुग्णालयांमध्येही रुग्णांना शक्यतो अँटिबायोटिक्स आणि फ्लूइड्स (सलायन) सह औषधं दिली जातात. तसंच श्वास घेण्यासाठी मदत व्हावी म्हणून ऑक्सिजनचा पुरवठाही केला जातो.
आरोग्याची एकूण स्थिती तपासण्यासाठी छातीचा एक्स-रे आणि रक्ताच्या काही चाचण्याही कराव्या लागतात.
5. न्यूमोनिया कसा टाळावा?
खालील काही गोष्टींद्वारे न्यूमोनिया टाळण्याचा प्रयत्न करता येतो.
अमेरिकेच्या नॅशनल हार्ट, लंग अँड ब्लड इन्स्टिट्यूटच्या मते, न्यूमोकल बॅक्टेरियामुळं उद्भवणाऱ्या न्यूमोनियापासून बचावासाठी लसी फायदेशीर ठरू शकतात. पण त्यामुळं सर्व प्रकारच्या न्यूमोनियापासून रक्षण होत नाही.
तरीही लस घेतलेल्या लोकांना लस न घेतलेल्यांच्या तुलनेत कमी गंभीर आजारांचा किंवा कमी गुंतागुंतीचा सामना करावा लागतो. त्यांच्यामध्ये संसर्गाचं प्रमाण सौम्य असतं. त्याचबरोबर न्यूमोनियाही फार काळ टिकणारा नसतो.
स्वच्छता राखणे (वारंवार हात धुणे), धुम्रपान सोडणे आणि नियमित व्यायाम तसंच चांगल्या आहाराच्या माध्यमातून रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवल्यानंही न्यूमोनिया होण्याचा धोका कमी होण्यास मदत होते.
गंभीर आजारी पडण्याचा अधिक धोका असलेल्यांनी न्यूमोनियाची लस घेण्याचा सल्ला युकेच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसद्वारे देण्यात आला आहे.
या लसीमुळं मिनिंगायटिस (मेंदू आणि कण्यातील संसर्ग) आणि सेप्सिस (संसर्गावरील जीवघेणी प्रतिक्रिया) अशा गंभीर आजारांसाठी कारणीभूत ठरणाऱ्या जीवाणूंच्या संसर्गापासूनही संरक्षण मिळतं.