मर्सिडिज क्रेझ!

रस्त्यांवर फिरताना आपल्याला भरपूर गाड्या दिसतात. चारचाकी वाहनं तयार करणार्‍या बर्‍याच कंपन्या आहेत. पण मर्सिडिजशी कोणत्याही गाडीची तुलना होऊ शकत नाही. या गाडीची शान, तिचा थाट सगळंच हटके आहे. मर्सिडिज ही श्रीमंती थाटाची गाडी आहे. संपूर्ण जगात मर्सिडिज गाड्यांचा बोलबाला आहे. आपल्या देशातही मर्सिडिजचा कारखाना आहे. पुण्यातील चाकणमध्ये मर्सिडिजचं भारतातलं मुख्य कार्यालय आहे. तिथेच गाड्यांची निर्मिती केली जाते. चाकण परिसरातील 100 एकर जागेत मर्सिडिज बेंझ इंडियाचं मुख्य कार्यालय आहे. 1994 मध्ये मर्सिडिजनं भारतात कारची निर्मिती सुरू केली. त्याआधी मर्सिडिज गाड्या जर्मनीतून भारतात येत असतं.
सध्या आपल्या देशात मेक इन इंडियाचे वारे वाहत आहेत. परदेशी कंपन्यांनी भारतात येऊन निर्मिती करावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. त्याचाच एका भाग म्हणून लवकरच मर्सिडिज भारतात 2000 कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे. म्हणून पुण्यातला चाकणचा कारखाना बराच चर्चेत आला आहे. मर्सिडिजनं भारतात आपला जम बसवलाय. जर्मनीच्या बाहेर आपल्या देशातील बंगळूरूमध्ये कंपनीचं रिसर्च आणि डेव्हलपमेंट सेंटर आहे. या केंद्रात 2000 इंजिनिअर आणि आयटी स्पेशालिस्ट काम करतात. त्यादृष्टीनं मर्सिडिजचा हा खूप मोठा प्रकल्प आहे. येथे ट्रक आणि बस तयार केल्या जातात.
 
मर्सिडिज ही कंपनी आलिशान गाड्यांच्या निर्मितीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. मर्सिडिज गाडी घेणं ही फारच अभिमानास्पद बाब समजली जाते. 1926 मध्ये या कंपनीची स्थापना झाली. चारचाकी गाड्यांसोबतच ही कंपनी ट्रक आणि बसचीही निर्मिती करते. जर्मनीतील स्टुअर्टमध्ये कंपनीचं मुख्यालय आहे.
 
या मुख्यालयातून कंपनीचा सगळा कारभार चालतो. आज संपूर्ण जगातच मर्सिडिजनं आपलं स्थान निर्माण केलं आहे. आता रस्त्यावर ही दिमाखदार गाडी बघाल तेव्हा ही माहिती आठवा आणि मोठे झाल्यावर अशीच गाडी घ्या.

वेबदुनिया वर वाचा