ग्रीन कॉमेट : 50 हजार वर्षांनी पृथ्वीच्या जवळ येणारा हा धूमकेतू कधी आणि कसा दिसणार?

बुधवार, 25 जानेवारी 2023 (13:00 IST)
पृथ्वीजवळ आकाशात एक नवा पाहुणा आला आहे. ग्रीन कॉमेट नावानं ओळखला जाणारा हा धूमकेतू जगभरात सध्या चर्चेचा विषय बनला आहे. कारण तब्बल 50 हजार वर्षांनी तो पृथ्वीच्या जवळ आला आहे. 
म्हणजे याआधी हा धूमकेतू आला होता, तेव्हा इथे पृथ्वीवर निअँडरथल्स या आदिमानवाचा वावर होता आणि या धूमकेतूची एक फेरी पूर्ण होईपर्यंत आधुनिक मानवाची अख्खी प्रजाती विकसित झाली. 
 
हा धूमकेतू त्यामुळेच अनेकांना खास वाटतो आहे. पण मुळात धूमकेतू म्हणजे काय?
 
तर अमेरिकन अंतराळसंस्था नासानं केलेल्या वर्णानानुसार धूमकेतू म्हणजे कॉमेट हे सौरमाला तयार होत असताना उरलेल्या राडारोड्यातून तयार झाले आहेत. 
 
ते एकप्रकारे अंतराळातले दगड आणि बर्फाच्या मिश्रणानं बनलेले गोळेच आहेत असं म्हणा ना. 
 
धूमकेतू अनेकदा सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतात आणि कक्षेत सूर्याजवळ येतात तेव्हा त्यांचं शेपूट दिसू लागतं. सूर्याच्या उष्णतेमुळे धूमकेतूमधील बर्फ वितळून ही शेपटी तयार होते.
 
2020 साली उत्तर गोलार्धात अनेक ठिकाणी दिसलेल्या निओवाईज धूमकेतूची शेपटीही साध्या डोळ्यांनी दिसू शकत होती. 
 
काही धूमकेतूंची कक्षा लहान असते, तर काहींची इतकी लांब असते की सूर्याभोवती एक फेरी मारायला त्यांना हजारो वर्षही लागतात. अशा धूमकेतूंना 'लाँग पिरीयड कॉमेट' म्हणतात.
 
शास्त्रज्ञांच्या मते बहुतांश 'लाँग पीरीयड कॉमेट' आपल्या सूर्याच्या भोवती साधारण 306 अब्ज किलोमीटरवर असलेल्या एका बर्फाळ ढगातून येतात.
सूर्याभोवतीचा हा ढग म्हणजे बर्फाळ तुकड्यांनी बनलेलं एक आवरण किंवा कवच असून त्याला ऊर्ट क्लाऊड असं नाव देण्यात आलं आहे.
 
तर  C/2022 E3 (ZTF) हा धूमकेतूही याच ऊर्ट क्लाऊडमध्ये जन्माला आल्याचं शास्त्रज्ञ सांगतात. आता हा धूमकेतू दिसणार कुठे? आणि कसा?
 
कुठे दिसणार ग्रीन कॉमेट?
मार्च 2022 मध्ये या धूमकेतूचा शोध लागला, म्हणजे तो गुरूजवळ येईपर्यंत माणसाला त्याची चाहूलही लागली नव्हती. 
 
या धूमकेतूचं शास्त्रीय नाव खरंतर C/2022 E3 (ZTF) असं आहे. त्याचं दुसरं नामकरण झालेलं नाही, पण हिरवट रंगामुळे लोक त्याला ग्रीन कॉमेट म्हणतायत. 
 
हा हिरवा रंग कशामुळे आला? तर या धूमकेतूमध्ये डायअ‍ॅटॉमिक कार्बन (कार्बनच्या दोन अणूंची जोडी) या मूलद्रव्याचं प्रमाण जास्त आहे. सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे हे मूलद्रव्य हिरवट रंगाचा प्रकाश परावर्तित करतं आणि त्यामुळेच धूमकेतू हिरव्या रंगाचा दिसतो, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.
 
जानेवारी 2023 मध्ये हा धूमकेतू सूर्याजवळ आल्यावर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्सनं त्याचा एक फोटो जारी केला.
लडाखच्या हानले गावातील हिमालयन चंद्रा टेलिस्कोपने टिपलेल्या फोटोंचा हा संच आहे. त्यात हा धूमकेतू हिरवट रंगाचा असल्याचं दिसतंय. 
 
2 फेब्रुवारीला हा धूमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळ असेल तर 10 ते 12 फेब्रुवारीदरम्यान तो मंगळापर्यंत पोहोचेल, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. तोवर तो उत्तर गोलार्धातून पाहता येऊ शकतो.
 
मुंबईच्या नेहरू प्लॅनेटोरियमचे संचालक अरविंद परांजपे माहिती देतात की, “पृथ्वीच्या जवळ म्हणजे किती अंतरावर तर साधारण 4.2 कोटी किलोमीटर्सवर, म्हणजे साधारण सूर्यापासून बुध जेवढ्या अंतरावर आहे, तेवढ्या अंतरावर हा धूमकेतू येणार आहे.
अरविंद परांजपे सांगतात, "सध्या रात्री साधारण 10 वाजता याचा उदय उत्तर क्षितिजाच्या जवळ होतो आहे. साधारण रात्री 11-12 वाजेपर्यंत तो वर येतो तेव्हा नीट दिसू शकेल. तुम्ही दुर्बिणीतून हा धूमकेतू पाहू शकता.”
 
पण सध्या फार कमी लोकांना हा धूमकेतू नुसत्या डोळ्यांनी दिसू शकला आहे. कारण तो जेवढा प्रखर होईल असं वाटलं होतं, तेवढा तेजस्वी झालेला नाही, अशी माहिती परांजपे देतात.
 
ते सांगतात, “धूमकेतूचे अभ्यासक अनेकदा म्हणतात की धूमकेतू हे मांजरासारखे असतात. ते कधी कसे वागतील सांगता येत नाही.”
 
शहरात प्रकाश प्रदूषणामुळे हा धूमकेतू दिसणं शक्य नाही. पण तुम्ही एखाद्या काळोख्या ठिकाणी असाल तर हा धूमकेतू पाहण्याचा प्रयत्न नक्की करू शकता. 
 
धूमकेतू महत्त्वाचे का आहेत?
धूमकेतू आपल्या सूर्यमालिकेच्या सुरुवातीपासूनचे घटक आहेत.
 
म्हणजे सूर्यमालेच्या निर्मितीविषयीची माहिती धूमकेतूंच्या अभ्यासातून मिळू शकते. त्यातून विश्वाची अनेक रहस्यं उलगडू शकतात.
 
धूमकेतूंच्या शेपटीचे अवशेष काही वेळा मागे राहतात. पृथ्वी या अवशेषांजवळून जाते, तेव्हा या अवशेषांमुळे उल्कावर्षाव झालेला पाहायला मिळतो.
 
धूमकेतू एखाद्या ग्रहावर, पृथ्वीवर आदळणार नाही ना, याची माहितीही त्याच्या कक्षेच्या अभ्यासातून मिळते. त्यामुळेच धूमकेतूचा अभ्यास करणं गरजेचं असल्याचं वैज्ञानिक सांगतात.
6.5 कोटी वर्षांपूर्वी मेक्सिकोच्या चिक्सुलूब भागात एक महाकाय अशनी कोसळून मोठं विवर तयार झालं जे आजही अस्तित्वात आहे. एका सिद्धांतानुसार या स्फोटामुळे डायनोसॉर्सचा अंत झाला. पृथ्वीवर कोसळलेला तो महाकाय दगड म्हणजे लघुग्रह किंवा धूमकेतू असावा असं काही शास्त्रज्ञांचं मत आहे.
 
तर काहींच्या मते धूमकेतूंमुळेच पृथ्वीवर पाणी पोहोचलं आणि पुढे त्यातून जीवसृष्टीचा जन्म झाला.
 
चर्चेतले काही प्रसिद्ध धूमकेतू
हॅलेचा धूमकेतू - दर 76 वर्षांनी येणारा हा धूमकेतू मानवी इतिहासातील अनेक घटनांचा साक्षीदार आहे. हा साध्या डोळ्यांनीही दिसतो. वेगवेगळ्या संस्कृतींनी वेगवेगळ्या काळात त्याची नोंद केल्याचं दिसतं.
शूमेकर-लेव्ही धूमकेतू - 1994 साली जुलै महिन्यात हा धूमकेतू गुरू ग्रहावर आदळून नष्ट झाला होता.
हेल-बॉप धूमकेतू - 1997 साली आलेला हा धूमकेतू चर्चेचा विषय ठरलेला होता.
टेंपल-टटल धूमकेतू - दर 33 वर्षांनी सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करणाऱ्या या धूमकेतूच्या मागे राहिलेल्या अवशेषांमुळे दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात पृथ्वीवर उल्कावर्षाव होतो.
 
Published By- Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती