मराठी रंगभूमीवरचा नटसम्राट या शब्दात श्रीराम लागूंचे वर्णन करता येईल. भूमिका जिवंत करणे हा वाक्प्रचार लागूंच्या बाबतीत अगदी खरा ठरतो. मराठी रंगभूमी, चित्रपट, हिंदी चित्रपट यात यशस्वी मुशाफिरी करणारे लागू खर्या अर्थाने रमले ते नाटकातच.
नावापुढे लावलेली डॉक्टरी श्रीराम लागूंनी कधी केली नाही, पण कलावंत म्हणून केलेले काम डॉक्टरेट मिळविण्याइतके महत्त्वाचे आहे. डॉक्टरी करता करता प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशनच्या माध्यमातून नाटकात काम करणार्या लागूंना मराठी चित्रपटसृष्टीत ब्रेक दिला तो व्ही शांताराम यांनी. चित्रपट होता 'पिंजरा'.
यातील मास्तरची भूमिका लागूंनी अजरामर केली. मराठीतील एव्हरग्रीन असा हा चित्रपट. त्यामागोमाग 'सुगंधी कट्टा, सामना, देवकीनंदन गोपाला, चंद्र आहे साक्षीला, सिंहासन' आदी यशस्वी चित्रपटांची मालिकाच सुरू झाली. प्रत्येक भूमिकेत जीव ओतणे हे लागूंचे वैशिष्ट्य.
मराठीत काम करताना त्यांना हिंदीतही ऑफर आल्या. लागू हिंदीत गेले खरे पण त्यात ठसा उमटू शकेल अशा भूमिका त्यांच्या वाट्याला क्वचितच आल्या. व्यावसायिक चित्रपटांच्या या दुनियेत कामाच्या समाधानापेक्षा लोकांना काय आवडते हे जास्त पाहिले जाते. लागूंनी त्यामुळेच कामाचे समाधान मिळविण्यासाठी मराठी रंगभूमीची सेवा करणे सोडले नाही.
हिंदी चित्रपटात चरित्र अभिनेत्याच्या भूमिका त्यांनी ताकदीने उभ्या केल्या. 'सौतन' चित्रपटातील वडिलांची भूमिका त्यांच्या कसदार अभिनयामुळे लक्षात रहाते. अनेक मालिकांमधूनही त्यांनी काम केले.
मराठी रंगभूमीवरची लागूंची कामगिरी अजोड आहे. लागूंच्या अभिनयक्षमतेचा अत्युच्च अविष्कार पहायला मिळाला तो वि. वा. शिरवाडकर लिखित 'नटसम्राट' नाटकातून. आप्पासाहेब बेलवलकर नावाचा नटसम्राट त्यांनी अक्षरशः जिवंत केला. आप्पासाहेबांची ती पल्लेदार स्वगते, त्यांचा अभिनय हे सारे लागू असे काही उभे करतात की ते पाहणं अविस्मरणीय या सदरात जमा होते.
लागूंनी पु. लं.च्या 'सुंदर मी होणार' मधूनही काम केले. निळू फुलेंबरोबर त्यांचे 'प्रेमाची गोष्ट...? हे नाटक नुकतेच आले होते. सॉक्रिटिसच्या विचारांवर आधारीत ' सूर्य पाहिलेला माणूस' हे नाटकही वैचारीक वर्तुळात गाजले. शिवाय 'मित्र' मधूनही वेगळे लागू पहायला मिळाले.
लागूंच्या पत्नी दीपा श्रीराम यांनी निर्मिती केलेल्या 'झाकोळ' या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. लागू निरिश्वरवादी म्हणून प्रसिद्ध आहेत. 'देवाला रिटायर करा' या त्यांच्या विधानाने एकेकाळी खळबळ उडवली होती.
अनेक सामाजिक, राजकीय बाबींवर ते परखड प्रतिक्रिया नोंदवतात. सांस्कृतिक व्यासपीठावर ते चौफेर विषयांवर अभ्यासपूर्ण विधाने करतात. सूक्ष्म निरिक्षण व विश्लेषण क्षमता याचा उत्कृष्ट संयोग त्यांच्या व्यक्तीमत्वात झाला आहे.
श्रीराम लागू अभिनित चित्रपट व नाटके :
1. भिंगरी 2. सामना 3. सुगंधी कट्टा 4. चंद्र आहे साक्षीला 5. पिंजरा 6. आपली माणसं 7. चिमणरांव गुंड्याभाऊ 8. देवता 9. स्वयंवर 10 सिंहासन 11. ध्यासपर्व 12. मुक्ता
नाटके-
1. नटसम्राट 2. सुंदर मी होणार 3. मित्र 4. प्रेमाची गोष्ट 5. सूर्य पाहीलेला माणूस