माणसाच्या एकंदर आयुष्याचा सारांश काढायचा झाला तर त्याच्या स्मृती आणि त्याने जगलेल्या काळाचे मोजमाप असेच म्हणायला हवे. खरे जगणे या काळाच्या हिशोबात राहून जाते. तसेच स्मृती तुमच्या आयुष्याचा ठेवा असतो हे खरे आणि त्यात दु:खाचा हिशेब मोठ्या रकान्यात मांडला जातो, हेही खरे.
लंडनमध्ये केवळ पैसे कमावण्यासाठी गेलेल्या आदित्यची खरी मनीषा स्वयंपाक करण्याची आहे. त्याला लंडनमध्ये मराठी खाद्यपदार्थ देणारे रेस्तराँ उघडायचे आहे. प्रस्थापित जगातील शहाणपणा त्याच्या विरोधातील आहे. त्यामुळे तो पुन्हा लंडनला न जाता पुण्याला येतो, जेवण बनवायला शिकायला. त्याचा तेव्हाचा हॉस्टेलवाला मित्र आता नोकरी करुन बॅचलरसारखाच राहत असल्याने त्याच्याकडे डबा येतो. त्या डब्यातील गुलाबजाम खाऊन त्याला राटाटुई चित्रपटात इगो या खाद्यसमीक्षकाला जशी आई आठवते, तसे आदित्यला त्याची आई आठवते. त्यातून तो त्या डबे देणार्या राधाला शोधायला निघतो आणि ही काहाणीतील गुंतागुंत गहिरी व्हायला लागते. काळ आणि स्मृतींची उत्तम निभावलेली थीम आणि सोनाली कुलकणींची भूमिका सुंदर साधली आहे.