गजलक्ष्मी व्रत 2021, या दिवशी विशेष वरदान देते महालक्ष्मी, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी
बुधवार, 22 सप्टेंबर 2021 (14:51 IST)
या वर्षी श्री महालक्ष्मी व्रत सोमवार, 13 सप्टेंबर 2021 रोजी सुरू झालं. हे व्रत 16 दिवस चालते. हे व्रत मंगळवार, 28 सप्टेंबर 2021 रोजी संपेल. दरवर्षी महालक्ष्मीचे व्रत भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या अष्टमीपासून सुरू होते, जे 16 दिवस चालू राहील आणि कृष्ण पक्षाच्या अष्टमीला संपतं. पितृपक्षातील वद्य अष्टमीला लक्ष्मी देवीची पूजा करावी, असे सांगितले जाते. याला गजलक्ष्मी व्रत असे संबोधले जाते. याशिवाय महालक्ष्मी व्रत आणि गजपूजन असेही याला म्हटले जाते.
पूजा विधी
या दिवशी तिन्ही सांजेला गजलक्ष्मी व्रत आचरावे.
सायंकाळी स्नानादी करुन पूजेच्या ठिकाणी चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र ठेवावे.
केशरयुक्त गंधाने अष्टदल रेखाटावे.
नंतर अक्षता ठेवून त्यावर पाण्याने भरलेला कलश स्थापित करावा.
कलशाजवळ हळदीने कमळ काढावे. यावर लक्ष्मी देवीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा.
मातीचा गजराज स्थापित करावा.
लक्ष्मी देवीचे पूजन करताना शक्य असल्यास सोने आणि चांदीची नाणी ठेवावी.
लक्ष्मी देवी आणि गजराजाची षोडशोपचार पूजा करावी.
लक्ष्मी देवी आणि गजराजाला फुले, फळे अपिर्त करावी.
दागिने अर्पित करावे.
या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले गेले आहे म्हणून घरात भरभराटी यावी म्हणून शक्य असल्यास या दिवशी नवीन सोन्याची खरेदी करून ते अर्पण करावे.
शक्य असल्यास चांदीच्या गजराजाची स्थापना करावी.
याशिवाय लक्ष्मी देवीच्या मूर्तीसमोर श्रीयंत्र ठेवून पूजन करावे.
देवीला कमळाची फुले अर्पित करावी.
मिठाई आणि फळे अर्पित करावी.
पूजन झाल्यानंतर लक्ष्मी मंत्रांचा जप करावा.
'ॐ योगलक्ष्म्यै नम:', 'ॐ आद्यलक्ष्म्यै नम:' आणि 'ॐ सौभाग्यलक्ष्म्यै नम' अशा मंत्रांचा १०८ वेळा जप करावा.
तुपाचा दिवा लावून लक्ष्मी देवीची आरती करावी.
सर्वांना प्रसादाचे वाटप करावे.
गजलक्ष्मी व्रत पूजन शुभ मुहूर्त-
हिंदू पंचांगानुसार अष्टमी तिथीची सुरुवात 28 सप्टेंबर, मंगळवार रोजी संध्याकाळी 06.16 मिनिटापासून सुरु होऊन याचं समापन 29 सप्टेंबर रात्री 08.29 मिनिटावर होईल. उद्या तिथी असल्यामुळे व्रत 29 सप्टेंबर रोजी ठेवण्यात येईल.