वारीची परंपरा ही 800 वर्षांपेक्षाही अधिक जुनी आहे. महाराष्ट्रातील विविध गावांमधून तसंच अगदी कानाकोपऱ्यातून लाखो भाविक विठ्ठलनामाचा गजर करत ही परंपरा आजही जपत आहेत. आषाढ आणि कार्तिक या दोन्ही एकादशीला ही वारी होते पण आषाढी एकादशीची वारी ही खूपच मोठी आणि महत्त्वाची असल्याचे सांगितले जाते. आळंदीमधून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू या स्थळावरून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत म्हणून ओळखले जातात. वारकरी संप्रदायामध्ये लहान-मोठा, श्रीमंत-गरीब हा भेद नाही. वारकर्यांच्या मुखात केवळ विठ्ठलनामाचा गजर असतो.
पंढरीत जाऊन चंद्रभागा नदीत स्नान करुन विठोबाचे दर्शन ही एकच इच्छा वारकऱ्याची मनात असते. याच भक्तीपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत, अशी भागवत संप्रदायाची ठाम धारणा आहे. एकादशीला चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेणे याने प्राप्त होणारे आध्यात्मिक सुखाचे वर्णन शब्दात मांडणे अवघडच आहे. वारीबद्दल उत्सुकता इतकं की जागतिक स्तरावरही याचा अभ्यास सुरू आहे. जागतिक पातळीवरील वारीचा हा अनुभव घेण्यासाठी अनेक अभ्यासक, संशोधकही सहभागी होतात.
आषाढी एकादशीला पंढरपुरला आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूवरून तुकारामांची, त्र्यंबकेश्वरवरून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची तर उत्तर भारतातून कबिराची पालखी एकत्र येते. आषाढीच्या वारीला सुगीची उपमा दिली जाते. शेतकरी आपल्या शेतात पेरणी करतात आणि मग वारीसाठी निघतात. वारी करुन विठोबाचे दर्शन घेऊन घरी जाईपर्यंत त्यांच्या शेतात जोमाने झालेली वाढ बघून शेतकऱ्याला शक्ती मिळते. विठ्ठलाच्या भक्तीसाठी आसुसलेला प्रत्येक जण या वारीत सहभागी होतो तर वारीला जाऊ शकत नाहीत ते उपवास करून आपल्या विठ्ठलाची भक्ती करतात.
पंढरीच्या वारीची परंपरा ही बरीच जुनी असल्याचेही सांगण्यात येतं. सुमारे तेराव्या शतकामध्ये ही परंपरा असल्याचे उल्लेख आढळतो. ज्ञानदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती तेव्हा ज्ञानदेव महाराजांनी भागवत या धर्माची पताका खांद्यावर घेतली तसंच सर्व जातीपातींच्या लोकांना आणि समाजाला एकत्रितपणे या वारीच्या सोहळ्यात सामील करून घेतले. हेच व्यापक स्वरूप जपत पुढे एकनाथ महाराज, तुकाराम महाराज यांसारख्या संतांनी वारीची परंपरा चालवली.