भुलाबाईची गाणी संपूर्ण Bhulabai Song Marathi
सोमवार, 22 सप्टेंबर 2025 (17:39 IST)
पहिली गं पुजाबाई देवा देवा सा देव
साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा
खंडोबाच्या नारी बाई वर्षा वर्षा आवसनी
आवसनीच पाणी जस गंगेच पाणी
गंगेच्या पाण्याला ठेविला कंठ
ठेविला कंठ राणा भुलाबाईची
ठोकिला राळा हनुमंत बाळा
हनुमंत बाळाचे लांब लांब डोळे
टीकाळीचे डोळे हात पाय गोरे
भाऊ भाऊ एकसनी
माता पुढ टेकसनी
टेकसनीच एकच पान
दुरून भुलाबाई नमस्कार
एवढीशी गंगा झुळूझुळू वाहे
तांब्या पितळी न्हाय गं
हिरवी टोपी बाय गं
हिरवी टोपी हारपली
सरपा आड लपली
सरप दादा हेकोडा
जाई आंबा पिकला
जाई नव्हे जुई नव्हे
चिंचाखालची रानोबाय
चिंचा वेचत जाय गं
शंभर पान खाय गं
खाता खाता रंगली
तळ्यात घागर बुडाली
तळ्या तळ्या साखळ्या
भुलाबाई जाते माहेरा
जाते तशी जाऊ द्या
थालीभर पाण्याने न्हाऊ द्या
बोटभर मेण लाऊ द्या
बोटभर कुंकू लाऊ द्या
जांभळ्या घोड्यावर बसु द्या
जांभळ्या घोड्याचे उलटे पाय
आऊल पाऊल अमरावती गाव
अमरावती गावचे ठासे ठुसे
दुरून भुलाबाई चे माहेर दिसे
ऐलमा पैलमा गणेश देवा माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा
माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी पारवा घुमतोय पारावरी
गोदावरी काठच्या उमाजी नायका
आमच्या गावच्या भुलोजी बायका
एविनी गा तेविनी गा
आमच्या आया तुमच्या आया खातील काय दुधोंडे
दुधोंड्याची लागली टाळी आयुष्य देरे भामाळी
माळी गेला शेताभाता पाऊस पडला येताजाता
पडपड पावसा थेंबोथेंबी,
थेंबोथेंबी आडव्या लोंबी
लोंब्या लोंबती अंगणी
अंगणा तुझी सात वर्ष भोंडल्या तुझी सोळा वर्ष
अतुल्या मातुल्या चरणी चातुल्या
चरणी चारचोंडे हातपाय खणखणीत गोंडे
एकेक गोंडा वीसवीसाचा साड्या डोंगर नेसायचा
नेसा ग नेसा बाहुल्यांनो अडीचशे पावल्यांनो
आपे दूध तापे, त्यावर पिवळी साय,
लेकी भुलाबाई साखऱ्या लेवून जाय
कशी लेवून जाय, कशी लेवू दादा,
घरी नंदा जावा, करतील माझा हेवा
नंदाचा बैल येईल डोलत,
सोन्याचं कारलं साजीरं बाई, गोजीरं
नंदा भावजया दोघीच जणी बाई दोघीच जणी,
शिंक्यावरचं लोणी खाल्लं कुणी खाल्लं कुणी
तेच खाल्लं वहिनींनी, वहिनींनी,
आता माझे दादा येतील गं, येतील गं,
दादाच्या मांडीवर बशील गं, बशील गं,
दादा तुमची बायको चोट्टी चोट्टी
असू दे माझी चोट्टी चोट्टी
घे काठी लगाव पाठी
घरादाराची लक्षी मोठ्ठी मोठ्ठी ॥
एक लिंबू झेलू बाई दोन लिंब झेलू
दोन लिंब झेलू बाई, तीन लिंब झेलू
तीन लिंब झेलू बाई, चार लिंब झेलू
चार लिंब झेलू बाई, पाच लिंब झेलू
पाचा लिंबाचा पानोठा,
माळ घालू हनुमंता
हनुमंताची निळी होडी
येता जाता कमळ तोडी
कमळाच्या पाठीमागे लपली राणी
अग अग राणी इथे कुठे पाणी
पाणी नव्हे यमुना जमुना
यमुना जमुनाची बारीक वाळू
तेथे खेळे चिल्लार बाळू
चिल्लार बाळाला भूक लागली
मी तर जाते सोनार वाडा
सोनार दादा सोनार दादा
गौरीचे मोती झाले का नाही
गौरीच्या घरी तांब्याच्या चुली
भोजन घातले आवळीखाली
उष्टया पत्रावळी चिंचेखाली
पान सुपारी उद्या दुपारी……
घरावर घर बत्तीस घर
इतका कारागीर कोणाचा
भुलोजी च्या राणीचा
भूलोजीची राणी
भरत होती पाणी
धावा धावा कोणी
धावतील तिचे दोनी
दोनी गेले ताकाला
विंचू चावला नाकाला
नंदा भावजया दोघी जणी
दोघी जणी
घरात नाही तिसर कोणी
तिसर कोणी
शिक्यातल लोणी खाल्ल कोणी
तेच खाल्लं वहिनीनी वहिनीनी
आता माझे दादा येतील गं येतील गं
दादाच्या मांडी वर बसील गं बसील गं
दादाची बायको चोट्टी चोट्टी
असू दे माझी चोट्टी चोट्टी
घे काठी लगाव काठी
घरा घराची लक्ष्मी मोठी
काळा कोळसा झुकझुक पाना
पालखीत बसला भुलोजी राणा
भुलोजी राण्याचे कायकाय आले
सारे पिंपळ एक पान
एक पान दरबारी
दुसर पान शेजारी
शेजाऱ्याचा डामा डुमा
वाजतो तसा वाजू द्या
आम्हाला खेळ मांडू द्या
खेळात सापडली लगोरी
लगोरी गेली वाण्याला
वाण्या वाण्या सोपा दे
सोपा माझ्या गाईला
गाई गाई दुध दे
दुध माझ्या बगळ्याला
बगळ्या बगळ्या गोंडे दे
(गोंडे माझ्या राज्याला)
तेच गोंडे लेऊ सासर जाऊ
सासरच्या वाटे कुचू कुचू दाटे
पंढरीच्या वाटे नारळ फुटे
नदीच्या काठी राळा पेरला
बाई राळा पेरला
एके दिवशी काऊ आला
बाई काऊ आला
एकच कणीस तोडून नेल
बाई तोडून नेल
सईच्या अंगणात टाकून दिल
बाई टाकून दिल
सईन उचलून घरात नेल
बाई घरात नेल
कांडून कुंडून राळा केला
बाई राळा केला
राळा घेऊन बाजारात गेली
बाई बाजारात गेली
चार पैशाची घागर आणली
बाई घागर आणली
घागर घेऊन पाण्याला गेली
बाई पाण्याला गेली
मधल्या बोटाला विंचू चावला
बाई विंचू चावला
आला गं सासरचा वैद्दय
हातात काठी जळक लाकूड
पायात जोडा फाटका तुटका
नेसायचं धोतर फाटक तुटक
अंगात सदरा मळलेला
डोक्यात टोपी फाटकी तुटकी
तोंडात विडा शेणाचा
कसा गं दिसतो बाई म्हायरावाणी
गं बाई म्हायरावाणी
आला गं माहेरचा वैद्दय
हातात काठी पंचरंगी
पायात जोडा पुण्यशाई
नेसायचं धोतर जरीकाठी
अंगात सदरा मलमलचा
डोक्यात टोपी भरजरी
तोंडात विडा लालेला
कसा गं दिसतो बाई राजावाणी
गं बाई राजावाणी
सा बाई सु, सा बाई सु,
बेलाच्या झाडाखाली
महादेवा तू रे महादेवा तू
हार गुंफिला, विडा रंगीला
झेंडुची फुले माझ्या भुलाबाईला रे
माझ्या भुलाबाईला॥
सा बाई सु, सा बाई सु,
बेलाच्या झाडाखाली
महादेवा तू रे महादेवा तू
हार गुंफिला, विडा रंगीला
गुलाबाचे फूल माझ्या भुलाबाईला रे
माझ्या भुलाबाईला॥
सा बाई सु, सा बाई सु,
बेलाच्या झाडाखाली
महादेवा तू रे महादेवा तू
हार गुंफिला, विडा रंगीला
मोगऱ्याची फुले माझ्या भुलाबाईला रे
माझ्या भुलाबाईला॥
काळी चंद्रकला नेसू कशी नेसू कssशी
जाईच तेल आणू कशी आणू कss शी
जाईच तेल आणल आणल
सासूबाईच न्हाण झाल
वन्साबाईची वेणी झाली
मामाजीची शेंडी झाली
उरलेलं तेल झाकून ठेवलं
रानोबाचा पाय पडला
सासूबाई सासूबाई अन्न द्या
दुधभात जेवायला द्या
आमच उष्ट तुम्ही खा
विडा घेऊन खेळायला जा
आमचे मामा व्यापारी व्यापारी
तोंडात चिक्कण सुपारी सुपारी
सुपारी काही फुटेना फुटेना
मामा काही उठेना उठेना
सुपारी गेले गडगडत गडगडत
मामा आले बडबडत बडबडत
सुपारी गेली फुटून फुटून
अक्कण माती चिक्कण माती
अश्शी माती सुरेख बाई जातं ते रोवावं
अस्सं जातं सुरेख बाई सपिटी दळावी
अश्शी सपिटी सुरेख बाई करंज्या कराव्या
अश्शा करंज्या सुरेख बाई तबकी ठेवाव्या
अस्सं तबक सुरेख बाई शेल्याने झाकावं
अस्सा शेला सुरेख बाई पालखी ठेवावा
अश्शा पालखी सुरेख बाई माहेरी धाडावी
अस्सं माहेर सुरेख बाई खेळाया मिळतं
अस्सं सासर द्वाड बाई कोंडूनी मारितं
कारल्याची बी पेर ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा
कारल्याची बी पेरली हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना
कारल्याला कोंब येऊ दे ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा
कारल्याला कोंब आल हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना
कारल्याला वेल येऊ दे ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा
कारल्याला वेल आला हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना
कारल्याला फुल येऊ दे ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा
कारल्याला फुल आले हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना
कारल्याला कारले लागू दे ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा
कारल्याला कारले लागले हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना
कारल्याची भाजी कर ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा
कारल्याची भाजी केली हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना
कारल्याची भाजी खा ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा
कारल्याची भाजी खाल्ली हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना
कारल्याचा गंज घास ग सुनबाई मग जा अपूल्या माहेरा माहेरा
कारल्याचा गंज घासला हो सासूबाई आता तरी धाडा ना धाडा ना
मला काय पुसते बरीच दिसते पूस आपल्या सासऱ्याला सासऱ्याला
मामंजी मामंजी मला मूड आल पाठवता की नाही नाही
मला काय पुसते बरीच दिसते पूस आपल्या भासऱ्याला भासऱ्याला
दादाजी दादाजी मला मूड आल पाठवता की नाही नाही
मला काय पुसते बरीच दिसते पूस आपल्या जावेला जावेला
जाऊबाई जाऊबाई मला मूड आल पाठवता की नाही नाही
मला काय पुसते बरीच दिसते पूस आपल्या नन्देला नन्देला
वन्स वन्स मला मूड आल पाठवता की नाही नाही
मला काय पुसते बरीच दिसते पूस आपल्या दीराला दीराला
भाऊजी भाऊजी मला मूड आल पाठवता की नाही नाही
मला काय पुसते बरीच दिसते पूस आपल्या नवऱ्याला नवऱ्याला
पतीराज पतीराज मला मूड आल पाठवता की नाही नाही
आन फणी घाल वेणी मग जा अपूल्या माहेरा माहेरा
आणली फणी घातली वेणी भुलाबाई गेल्या माहेरा
यादवरा या राणी रुसून बैसली कैसी
सासूरवाशीण सून घरात येना कैसी
सासू गेली समजावयाला
चला चला सुनबाई अपुल्या घराला
मी नाही यायची तुमच्या घराला
माझा पाटल्यांचा जोड देते तुम्हाला
तुमचा पाटल्यांचा जोड नको मजला
मी नाही यायची तुमच्या घराला
यादवरा या राणी रुसून बैसली कैसी
सासरे गेले समजावयाला
चला चला सुनबाई अपुल्या घराला
मी नाही यायची तुमच्या घराला
माझी घोडागाडी देतो तुम्हाला
तुमची घोडागाडी नको मजला
मी नाही यायची तुमच्या घराला
यादवरा या राणी रुसून बैसली कैसी
सासूरवाशीण सून घरात येना कैसी
दीर गेले समजावयाला
चला चला वहिनी अपुल्या घराला
नवीन कपाट देतो तुम्हाला
तुमच कपाट नको मजला
मी नाही यायची तुमच्या घराला
यादवरा या राणी रुसून बैसली कैसी
सासूरवाशीण सून घरात येना कैसी
जाऊ गेली समजावयाला
चला चला जाऊबाई अपुल्या घराला
जरीची साडी देते तुम्हाला
जरीची साडी नको मजला
मी नाही यायची तुमच्या घराला
यादवरा या राणी रुसून बैसली कैसी
सासूरवाशीण सून घरात येना कैसी
नणंद गेली समजावयाला
चल चल वहिनी अपुल्या घराला
चांदीचा मेखला देते तुजला
चांदीचा मेखला नको मजला
मी नाही यायची तुमच्या घराला
यादवरा या राणी रुसून बैसली कैसी
सासूरवाशीण सून घरात येना कैसी
पतीराज गेले समजावयाला
चला चला राणीसाहेब अपुल्या घराला
माझा लाल चाबूक देतो तुम्हाला
तुमचा लाल चाबूक हवा मजला
मी तर यायची अपुल्या घराला
यादवरा या राणी घरात आली कैसी
चादण्या रात्री आम्ही भुलाबाई जागवल्या जागवल्या
सासू म्हणते सुने सुने तो पाटल्यांचा जोड काय केला काय केला
हरवला हरवला, तुमच काय जाते माझ्या बाबाने घडवला घडवला
चादण्या रात्री आम्ही भुलाबाई जागवल्या जागवल्या
झिप्रं कुत्र सोडा ग बाई सोडा ग बाई
चारी दरवाजे लावा ग बाई लावा ग बाई
कोण पाव्हणे आले ग बाई आले ग बाई
सासरे पाव्हणे आले ग बाई आले ग बाई
झिप्रं कुत्र बांधा ग बाई बांधा ग बाई
चारी दरवाजे उघडा ग बाई उघडा ग बाई
कोण पाव्हणे आले ग बाई आले ग बाई
पतीराज पाव्हणे आले ग बाई आले ग बाई
पहिल्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा
सरता सरता नंदन घराच्या
नंदन घराच्या बगिच्या वरी
चिंचा बहुत लागल्या
भुलाबाई राणीचे डोहाळे
तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी
पलंग फिरे चौक फिरे
शंकर बसिले शेजारी ।।१।।
दुसऱ्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा
सरता सरता नंदन घराच्या
नंदन घराच्या बगिच्या वरी
पेरू बहुत लागले
भुलाबाई राणीचे डोहाळे
तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी
पलंग फिरे चौक फिरे
शंकर बसिले शेजारी ।।२।।
तीसऱ्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा
सरता सरता नंदन घराच्या
नंदन घराच्या बगिच्या वरी
संत्री बहुत पिकले
भुलाबाई राणीचे डोहाळे
तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी
पलंग फिरे चौक फिरे
शंकर बसिले शेजारी ।।३।।
चौथ्या माशीचा घडवा येतो येतो रे शिरवा
सरता सरता नंदन घराच्या
नंदन घराच्या बगिच्या वरी
मोसंबी बहुत पिकल्या
भुलाबाई राणीचे डोहाळे
तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी
पलंग फिरे चौक फिरे
शंकर बसिले शेजारी ।।४।।
पाचव्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा
सरता सरता नंदन घराच्या
नंदन घराच्या बगिच्या वरी
डाळिंब बहुत पिकले
भुलाबाई राणीचे डोहाळे
तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी
पलंग फिरे चौक फिरे
शंकर बसिले शेजारी ।।५।।
सहाव्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा
सरता सरता नंदन घराच्या
नंदन घराच्या बगिच्या वरी
द्राक्ष बहुत पिकले
भुलाबाई राणीचे डोहाळे
तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी
पलंग फिरे चौक फिरे
शंकर बसिले शेजारी ।।६।।
सातव्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा
सरता सरता नंदन घराच्या
नंदन घराच्या बगिच्या वरी
आंबे बहुत पिकले
भुलाबाई राणीचे डोहाळे
तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी
पलंग फिरे चौक फिरे
शंकर बसिले शेजारी ।।७।।
आठव्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा
सरता सरता नंदन घराच्या
नंदन घराच्या बगिच्या वरी
खरबूज बहुत पिकले
भुलाबाई राणीचे डोहाळे
तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी
पलंग फिरे चौक फिरे
शंकर बसिले शेजारी ।।८।।
नवव्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा
सरता सरता नंदन घराच्या
नंदन घराच्या बगिच्या वरी
टरबूज बहुत पिकले
भुलाबाई राणीचे डोहाळे
तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी
पलंग फिरे चौक फिरे
शंकर बसिले शेजारी ।।९।।
एक लिंबू झेलू बाई दोन लिंब झेलू
दोन लिंब झेलू बाई, तीन लिंब झेलू
तीन लिंब झेलू बाई, चार लिंब झेलू
चार लिंब झेलू बाई, पाच लिंब झेलू
पाचा लिंबाचा पानोठा,
माळ घालू हनुमंता
हनुमंताची निळी होडी
येता जाता कमळ तोडी
कमळाच्या पाठीमागे लपली राणी
अग अग राणी इथे कुठे पाणी
पाणी नव्हे यमुना जमुना
यमुना जमुनाची बारीक वाळू
तेथे खेळे चिल्लार बाळू
चिल्लार बाळाला भूक लागली
मी तर जाते सोनार वाडा
सोनार दादा सोनार दादा
गौरीचे मोती झाले का नाही
गौरीच्या घरी तांब्याच्या चुली
भोजन घातले आवळीखाली
उष्टया पत्रावळी चिंचेखाली
पान सुपारी उद्या दुपारी......
अडकित जाऊ, खिडकीत जाऊ
खिडकीत होतं ताम्हन
भुलोजीला मुलगा झाला
नाव ठेवा वामन
अडकित जाऊ
खिडकीत जाऊ
खिडकीत होता बत्ता
भुलोजीला मुलगा झाला
नाव ठेवा दत्ता
अडकित जाऊ
खिडकीत जाऊ
खिडकीत होती वांगी
भुलोजीला मुलगी झाली
नाव ठेवा हेमांगी
अडकित जाऊ
खिडकीत जाऊ
खिडकीत होती दोरी
भुलोजीला मुलगी झाली
नाव ठेवा गौरी
अडकित जाऊ
खिडकीत जाऊ
खिडकीत होती पणती
भुलोजीला मुलगी झाली
नाव ठेवा मालती
अडकित जाऊ
खिडकीत जाऊ
खिडकीत होती घागर
भुलोजीला मुलगा झाला
नाव ठेवा सागर
अडकित जाऊ
खिडकीत जाऊ
खिडकीतून पाय घसरला
भूलोजीला लेक झाली
नाव ठेवा सरला
अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीतून पाय घसरला
भूलोजीला लेक झाला साखरपाना विसरला
आणा आणा पारीस उगळा उगळा काथ
आज आमच्या भुलाबाईचा शेवटचा दिवस
शेवट च्या दिवशी बाळाला टोपी मोत्यांनी गुंफली झोझो रे
बाणा बाई बाणा सुरेख बाणा
गाणे संपले खिरापत आणा
आणा आणा लवकर,
वेळ होतो आम्हाला
जाऊ द्या आम्हाला,
भुलाबाईचे गाणे म्हणायला ॥
भुलाबाईची आरती
केळीच्या पानावर उगवला दिवस
उगवला दिवस
आज आमच्या गुलाबाईला कितवा दिवस
कितवा दिवस
आज आमच्या गुलाबाईला .... दिवस
.... दिवस
... व्या दिवशी बाळाला टोपरं टोपरं
मोत्यानं गुंफलं जो बाळा जो जो रे
भाद्रपदचा महिना आला । आम्हा मुलींना आनंद झाला ।
पार्वती म्हणे शंकराला चला हो माझ्या माहेरा माहेरा ।
गेल्या बरोबर पाट बसायला बसायला। विनंती करून सरस्वतीला सरस्वतीला।
सरस्वती सरस्वती जगदंबे जगदंबे । फुल चढवा बेगंबे बेगंबे।
बेगंबेचा आकडा आकडा । सुटला घोडा वाकडा वाकडा ।
या घोड्याचा लांब पाय लांब पाय।
त्यावर बसले गुलोजी राय गुलोजी राय ।
गुलोजींना आमचा नमस्कार नमस्कार ।
शुभ्र पौर्णिमा शुभ्र दिनी शुभ्र दिनी ।
अर्चन पूजा करु आम्ही करु आम्ही ।
सर्व मुली गोळा झाल्या झाल्या ।
टिपर्या मध्ये गुंग झाल्या झाल्या ।
आरती संपली आणा बाई खिरापत खिरापत
आणावी शंकराने शंकराने
वाटावी पार्वतीने पार्वतीने
प्रसाद घेऊन घरी जाऊ बाई घरी जाऊ
प्रसाद घेऊन घरी जाऊ बाई घरी जाऊ