सौंदर्य खुलविण्यासाठी सोने, चांदी, मोती अशा अनेक प्रकाच्या दागिन्याचा उपयोग केला जातो. आजकाल मोत्याच्या दागिन्याची फॅशनही खूपच दिसून येत आहे. मोत्याचा हार, कानातले, अंगठी, अशा विविध प्रकारामुळे तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळाच लुक येतो.
तुम्हाला माहिती आहेत का? मोत्याचे दोन प्रकार असतात. नैसर्गिक व मानवनिर्मित. नैसर्गिक मोत्याची निर्मिती फार दुर्मिळ गोष्ट आहे. परपोषी प्राण्याचे शिंपल्यात प्रवेश करणे व त्यापासून मोती तयार होणे ही फार क्वचित होणारी घटना आहे. मानवनिर्मित प्रक्रियादेखील अशीच असते परंतु त्यात प्राण्याला जबरदस्ती अस्वस्थ करण्यासाठी शिंपल्यात इरिटंट सोडले जाते. किंबहुना उत्तम गुणवत्तेच्या कृत्रिम मोत्यांसाठीही तीन वर्षे वाट पाहावी लागते. केवळ पाच टक्के कृत्रिम मोती मौल्यवान खड्यांच्या गुणवत्तेचे असतात. मोत्यांची त्यांच्या वातावरणावरून विभागणी केली जाते. गोड पाण्यातील व खाऱ्या पाण्यातील मोती. खाऱ्या पाण्यातील मोती जास्त थर असलेले व अधिक गोलाकार असतात. परंतु नवीन तंत्रामुळे आता गोड्या पाण्यातील मोतीदेखील खाऱ्या पाण्याची बरोबरी करताना दिसतात.
तुमचा मोती जर खूप परफेक्ट दिसत असेल, तर तो खोटा असू शकतो. खरे मोती क्वचितच पूर्णपणे परफेक्ट असतात. त्यांचे आकार व थर यामध्ये थोडाफार दोष आढळतो. मोत्यावर दिसणाऱ्या लहान त्रुटी खऱ्या मोत्याचे सूचक असतात.