नववीत गेलेल्या लेकीने आयब्रोज करण्याचा हट्ट धरणे हा आजकालच्या आयांसाठी नवा अनुभव नाही. पण वयात येणार्या आपल्या मुलीला आत्तापासूनच या ब्युटी ट्रीटमेंटची सवय लावावी की नाही अशी त्यांची द्विधा मन:स्थिती होऊन जाते. ब्युटी पार्लरमध्ये येणार्या मुलींचे वय दिवसोंदिवस कमी होत चालले आहे. पूर्वी कॉलेजमध्ये गेल्यावर पार्लरमध्ये जायची सवय असलेल्या मुली आता शाळेत असतानाच या सगळ्या ब्युटी ट्रीटमेंट्समध्ये तरबेज झालेल्या दिसतात. त्यांना घेऊन येणार्या आया मात्र खूप कन्फ्युज दिसतात. लहान वयात पार्लरमध्ये जाणं योग्य नाही हे वास्तव एकीकडे त्रास देत असतं, तर दुसरीकडे मुलीचा हट्ट, समवयस्क मुलींकडे पाहून तिला अशा गोष्टींचं वाटणारं कुतूहल आणि मुलगी सुंदर दिसावी अशी इच्छा असा सगळाच गोंधळ आईच्या मनात सुरू असतो. काही ब्युटी ट्रीटमेंट्सनी मुलींचा आत्मविश्वास वाढत असला तरी या ट्रीटमेंट्ससाठी तिनं एक विशिष्ट वय पूर्ण केलेलं असणं महत्त्वाचं असतं. नाहीतर त्याचे दुष्परिणाम मुलीलाच भोगावे लागतात. कोणत्या ट्रीटमेंट कोणत्यावयात कराव्यात, त्याचे फायदे-तोटे याची माहिती जाणून घेऊ.