आर्टिफिशीअल ज्वेलरीची चलती

अनेक महिलांच्या दृष्टीने सोन्याचे दागिने वापरणे परवडणारे नसते. अशा महिलांकरिता आर्टिफिशीअल ज्वेलरी म्हणजे फॅशन ज्वेलरीचा पर्याय चांगला आहे. सोन्याचे भाव सध्या नियंत्रणात असले तरी ते भाव केव्हा वाढतील याची शाश्वती देता येत नाही. त्यामुळेच फॅशन ज्वेलरीचा पर्याय अनेकांच्या दृष्टीने अपरिहार्य ठरला आहे. असे दागिने सोन्याच्या तुलनेत अत्यंत स्वस्त असतात. यातील डिझाईन आणि रंग ग्राहकांच्या दृष्टीने आकर्षक असतात. हे दागिने, सोन्यांच्या दागिन्यां प्रमाणेच कलाकुसरीने तयार केलेले असतात. हे दागिने तुटले किंवा 
खराब झाले अथवा हरवले तर त्याचे फारसे दु:ख वापरणार्‍याला होत नाही. महिलांमध्ये अशा दागिन्यांची आवड वाढू लागली आहे. 
 
यामागची कारणे खालीलप्रमाणे सांगता येतील. 
 
हल्लीच्या काळातील महिलांची जीवनशैली आमूलाग्र बदलली आहे. नोकरदार महिलांना अनेक ठिकाणी कामानिमित्त जावे लागते. 
 
अशा वेळी नोकरदार महिलांना आपले व्यक्तिमत्त्व प्रभावी दिसण्याकरिता असा दागिन्यांचा मोठा उपयोग होतो. अशा दागिन्यांची किंमत सोन्याच्या दागिन्यांच्या तुलनेत कमी असल्याने त्यांची मागणी अचानक वाढली आहे. मध्यम वर्गातील महिलाही खरेदी करू शकतात. 
 
महिलांना कपडय़ांना अनुरूप असे दागिने घालण्याची इच्छा असते. सोन्या-चांदीच्या तसेच हिर्‍यांच्या दागिन्यांमध्ये फारसे वैविध्य नसते. 
 
मात्र अशा शोभेच्या दागिन्यांमध्ये भरपूर व्हरायटी उपलब्ध आहे. त्यामुळे आपल्या वस्त्र प्रावरणांना मॅच होतील असे दागिने आपल्याला यातून निवडता येतात. 
 
सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर असे दागिने सर्वाधिक उपयुक्त आहेत. सोन्याचे दागिने पळवून नेण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे महिलांना असे महागडे दागिने घालण्याचा धोका पत्करण्याऐवजी स्वस्तातले दागिने परवडतात. सोन्या, हिर्‍यांच्या दागिन्यांमुळे अनेकदा महिलांच्या जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो, असेही दिसून आलेले आहे. या पाश्र्वभूमीवर फॅशन ज्वेलरी वापरणे सर्वाधिक सुरक्षित ठरते. 
 
फॅशन ज्वेलरीमध्ये एकाहून एक असे चांगले डिझाइन उपलब्ध असतात. अनेक डिझाइन असल्यामुळे निवड करण्यास वाव राहातो. 
 
कौटुंबिक मालिकांमध्ये नायिका, सून, सासू यासारखी पात्रे ज्या पद्धतीचे दागदागिने वापरतात, तसे वापरण्याची फॅशन महिलांमध्ये रूढ झाली आहे. मालिकांमधील स्त्री पात्रे फॅशन ज्वेलरीचाच वापर करीत असल्याने त्यांचे अनुकरण करणार्‍यांची संख्या वाढली आहे. म्हणूनच फॅशन ज्वेलरीच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसते.
 
मृदुला फडके 

वेबदुनिया वर वाचा