राज्यात डिसेंबरपर्यंत पोलीस भरती करणार…गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

सोमवार, 12 जुलै 2021 (23:30 IST)
डिसेंबरपर्यंत राज्यात सुमारे 5 हजार पेालिसांची भरती करण्यात येईल. त्यानंतरच्या टप्प्यात सुमारे 7 हजार पोलिसांची भरती करण्यात येईल अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. औरंगाबाद पोलीस परिक्षेत्रांतर्गत कायदा व सुव्यवस्था अंमलबजावणीबाबत झालेल्या आढावा बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी कायदा सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गुन्हे सिध्दतेचे प्रमाण वाढवण्याचे निर्देश दिले.
 
औरंगाबाद पोलीस परिक्षेत्रांतर्गत कायदा व सुव्यवस्था अंमलबजावणीबाबत झालेल्या आढावा बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील बोलत होते. यावेळी पोलीस महासंचालक संजय पांडे, विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम.एम.प्रसन्ना, पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, पोलीस अधीक्षक श्रीमती मोक्षदा पाटील तसेच बीड, उस्मानाबाद आणि जालना जिल्हा पोलीस अधीक्षक उपस्थित होते. बैठकीच्या सुरूवातीला श्री. प्रसन्ना यांनी सादरीकरणाव्दारे गृहमंत्र्यांना परीक्षेत्रातील सविस्तर माहिती दिली.
 
पुढे बोलतांना गृहमंत्री म्हणाले की, औरंगाबाद परिक्षेत्रातील गुन्ह्यांचे प्रमाण अधिक असल्याने पोलिसांनी अधिक सक्षमपणे तपास करणे गरजेचे आहे. पोलीस दलात कर्मचारी हा घटक महत्त्वाचा असून त्याची तपासात देखील भूमिका महत्त्वाची आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणुन घ्या आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य द्या. लोकप्रतिनिधींच्या बाबतीत असणारा राजशिष्टाचार प्राधान्याने पाळा. डिसेंबरपर्यंत राज्यात सुमारे 5 हजार पेालिसांची भरती करण्यात येईल. त्यानंतरच्या टप्प्यात सुमारे 7 हजार पोलिसांची भरती करण्यात येईल. पोलीस सेवेत कर्मचारी दाखल झाल्यानंतर संबंधित कर्मचारी किमान पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवानिवृत्त व्हावा, त्यादृष्टीने योजना बनविण्यात येत आहे. जिल्ह्यांमध्ये पोलीस दल अधिक सक्षम बनविण्यासाठी जिल्हा वार्षिक निधीतुन निधीची मागणी करा. कोरोना काळात पोलीस दलाने कौतुकास्पद कामगिरी केल्याचेही गृहमंत्री म्हणाले.
 
बैठकी दरम्यान उपस्थित पोलीस अधिक्षकांनी आपआपल्या जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची माहिती गृहमंत्र्यांना दिली. गृहमंत्र्यांनी बैठकीपूर्वी आयुक्तालयातील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाला भेट दिली. बैठकीमध्ये विविध पुस्तिकांचे विमोचन गृहमंत्र्यांच्याहस्ते करण्यात आले.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती