म्हाडा तातडीने भरती प्रक्रिया राबवणार

मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020 (11:23 IST)
म्हाडामध्ये मोठ्या संख्येने पदे रिक्त झालेली आहेत. त्यामुळे आता म्हाडाला तातडीने भरती प्रक्रिया राबवावी लागणार आहे. त्याप्रमाणे लवकरच भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, अशी माहिती मुंबई इमारत आणि दुरूस्ती पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी दिली.
 
म्हाडातील अनुभवी असा अधिकारी आणि कर्मचारी वर्ग गेल्या काही वर्षात निवृत्त झाला आहे. त्यामुळे या रिक्त झालेल्या जागी कर्मचारी भरती करण्यासाठी गृहनिर्माण मंत्री यांना पत्र दिले आहे. काही पदे ही कायम स्वरूपी तसेच काही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. जवळपास ५०० जणांची अधिकारी आणि कर्मचार्‍यांची पदे रिक्त असल्याचे त्यांनी सांगितले. या पदांमध्ये अगदी शिपाई, ड्रायव्हर पदापासून ते अभियंता पदापर्यंत जागा रिक्त आहेत.
 
रेंट कलेक्टर, लिपिक, कार्यकारी अभियंता अशा विविध पदांसाठीची भरती अपेक्षित आहे. म्हाडाकडे आता प्राधिकरण म्हणून जबाबदारी आलेली असतानाच म्हाडाचे कार्यक्षेत्रही वाढले आहे. पण म्हाडाच्या सध्याच्या कर्मचारी वर्गाची मर्यादा आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कार्यकारी अभियंत्यापासून अनेक पदांवर एकाहून अधिक जबाबदार्‍या आहेत. म्हणूनच भरती प्रक्रिया अधिक लवकर राबविण्याची गरज त्यांनी सांगितली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती