मृत्यूच्या सावलीत जगणाऱ्या एका जीवाची गोष्ट

शनिवार, 22 फेब्रुवारी 2020 (16:03 IST)
प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात काही न काही त्रास असतात, सगळे निरनिराळ्या चटक्यांनी पोळलेले असतात, सगळ्यांचे कष्टही वेगवेगळ्या प्रकाराचे असतात.  कष्ट शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक असू शकतात आणि प्रत्येकाची त्या त्रासांकडे पाहण्याची दृष्टी वेगळी असते, पण सामान्य मनुष्याला एक सवय असते ती म्हणजे आपल्याच त्रासाला फार मोठं सम‍‍जण्याची. असं प्रत्येकाला वाटत असतं की आम्ही ज्या त्रासातून वर आलोय त्या पुढे बाकी लोकांचे काहीच नाही "अहो तुमचं कसं छानच होत सगळं! आम्हाला विचारा कष्ट कशाला म्हणतात! " हे असे आपण ऐकतच असतो.  
 
वेळ प्रसंगी काही लोकं तर चांगला तिखट-मीठ लावून आपल्या जीवनातील वाईट प्रसंग सांगतात आणि त्यांना भरपूर सहानुभूती पण मिळते आणि हल्ली तर सोशल मीडियामुळे सगळं फारच सोपं झालं आहे. ताप आला की हॅशटॅग, खरचटले की सेल्फी आणि स्टेटस, 10 मि‍निटात अर्ध्या जगाला कळतं की तुम्ही आजारी आहात.  
असो..... पण आपण कल्पना करू शकतो का एक भयंकर आणि असाध्य असा आजार असलेला व्यक्ती सतत हसतमुख राहू शकतो?? बरेचदा तर अशी परिस्थिती आली की डॉक्टरांनी आशाच सोडली, सगळं संपलं असं सांगितलं, पण ईश्वरी कृपा आणि इच्छाशक्ती या दोन गोष्टींचा मदतीने ते यातून बाहेर पडले, जणू त्यांचा हसरा चेहरा बघून मृत्यू पण मागे फिरला. आपल्या त्रासांचा बाऊ न करता आपलं उरलेलं आयुष्य इतरांचे कष्ट कमी करण्यात लावतो आहे.
 
आज अशाच एका व्यक्तीच आयुष्याबद्दल आपण ऐकणार आहोत 
 
श्री मुकुल भास्करराव गरे. यांचा जन्म यवतमाळच्या एका सर्वसाधारण कुटुंबात झाला. इतर मुलांप्रमाणेच त्यांचा कुटुंबीयांनी फार लाडा-कौतुकाने व सर्वात लहान असल्यामुळे जास्त काळजीपूर्वक लक्ष देत त्यांना वाढवलं. अभ्यासात साधारण मार्क्स आणणारे मुकुल खेळ आणि वादानं कलेत मात्र तरबेज होते. बालपणापासून हरफनमौला मुकुल व्हायोलिन वादन तसेच बॅडमिंटन व क्रिकेट या तिन्ही क्षेत्रात चांगला प्रदर्शन करत होते. पण एक गोष्ट सगळ्यांना त्रास द्यायची, ती म्हणजे त्यांची ढासळणारी तब्येत. नेहमी अंगी असणारा ज्वर, सर्दी- खोकला, इतर मुलांच्या तुलनेत त्यांना लवकर दम लागायचा, कोणत्याही वस्तू किंवा स्थानाच लगेच इन्फेक्शन व्हायचं, ते सारखेच आजारी पडायचे. काही वर्ष त्यांना औषध आणि दवाखान्यात भरती करून बरं वाटेल असा प्रयत्न आई- वडिलांनी केला. घरात मोठे भाऊ-बहीण पण होते. सुरुवातीला वाटलं की त्यांची प्रकृती तशीच आहे परंतु वारंवार औषध आणि दवाखान्यात भरती करून पण त्यांचा त्रास काही कमी होत नव्हता. हे काही साधारण नव्हतं.  
 
14-15 वर्षाचा वयात मुकुलजींना क्रिकेट खेळणं जड जाऊ लागलं, त्यांची तब्येत जास्ती बिघडल्यावर हे लक्षात आलं आणि मग त्यांना तपासणी करायला मोठ्या दवाखान्यात नेलं, सगळ्या तपासण्या झाल्यावर जे काही कानावर आलं ते फार जीवघेणं होतं. मुकुलजींच्या हृदयाच्या वॉल्वला 1.8 सेमी छिद्र होतं. या त्रासाला व्ही. एस. डी (वेंट्रिकुलर सेपटल डिफेक्ट) असं म्हणतात. हा त्रास आईचा गर्भात असतानाच होतो. आज तंत्रज्ञानाचा वापर करून यावर वेळीच शस्त्रक्रिया होते परंतु त्यासाठी ते लगेच कळणं आवश्यक आहे. मुकुलजींना वयाचा 16 व्या वर्षी ह्याच निदान झालं त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेलेली होती. शस्त्रक्रिया होणे आता शक्य नव्हते किंवा तसे केल्यास जगण्याची शक्यता न चा बरोबर होती!!!
 
काय वाटलं असेल हो त्यावेळी त्यांना????? जेव्हा डॉक्टर येऊन बोलले की आता तुमचं आयुष्य फक्त दोन वर्षे......... कल्पना जरी केली न तरी काटा येतो अंगावर. अरे 16 वर्षाचं वय, या वयात जेव्हा मुलं गर्लफ्रेंडची स्वप्ने रंगवतात, हृदयाचे गीत गुणगुणतात, " दिल मेरी ना सुने दिल की मैं ना सुनूं" " बद्तमीज दिल माने ना" परंतु एखाद्याचे दिल इतकं बद्तमीज आहे की ते कधीही बंद पडू शकतं!!!!  
 हे कळल्यावर काय गत होईल हो त्या निरागस जीवाची??? काय करेल तो?? कुठे जाईल?? कोणाकडे गाराने सांगेल??? तरुण वयातील गुलाबी स्वप्न रंगवत असताना साखरझोपेत गालावर सणसणीत चपराक बसल्यासारखं आहे नं हे????
 
अहो संपूर्ण आयुष्य जगून टाकायचं आहे दोन वर्षात हे कळल्यावर तुम्ही काय केलं असतं???? हात -पाय गाळून बसला असता किंवा स्वताला खोलीत बंद करून जीवाचा आकांत करून रडत बसला असता. नशिबाला, देवाला, घरच्यांना गुंडाळलं असतं आणि बोल लावले असते, परंतु मुकुलजींने असं काहीही केलं नाही. त्यांनी हा त्रास स्वीकारला व त्या बद्दल जाणून घेतलं. मरायचं तर आहेच पण इतरांना त्रास देऊन मरण्यापेक्षा परिस्थितीला हसून तोंड द्यायचं ही त्यांची भावना. त्यांना वेळोवेळी होणारे त्रास व त्यावर उपचार हे कळायला फार मोठा काळ लागला. ही बाब 16 व्या वर्षी कळली आणि आता फक्त औषधं घेऊन जगायचं आहे, हा त्रास कधीही बरा होणार नव्हता हे त्यांना समजलं होतं. आता जिवंत राहायला त्यांना सतत औषध, तपासणी व उपाय हे करावं लागणार होतं. ही प्रक्रिया पण काही साधी- सोपी नव्हती.  
 
रोज नियमितपणे कृत्रिम ऑक्सिजन घ्यावी लागत असे ते पण 8 ते 10 तास. कोणत्याही प्रकाराचे निश्चेतक (एनेस्थिसिया) त्यांना देऊ शकत नव्हते. जर जखम झाली तर बेशुद्ध केल्या‍विनाच ती शिवावी लागत असे. त्यांचा देह बाहेरून जरी साधारण दिसत होतं तरी दगदग, प्रवास, तणाव, श्रम, मानसिक ताण त्यांना सहन होत नसे. हिमोग्लोबिनची अधिकता होऊन गाठी पडू नये या साठी दर आठवड्यात रक्त बाहेर काढणं आवश्यक होतं. ही प्रक्रिया फार कष्टकारी होती पण काहीच पर्याय नव्हता. इतर पुरुषांसारखं आयुष्य ते जगू शकत नव्हते. जड काम, मेहनत, सतत काम हे सगळं त्यांना वर्ज्य होतं. ते लग्न करू शकत नव्हते, संसार करू शकत नव्हते, साधी दाढदुखीत पण त्यांना ऑक्सिजन सिलेंडर सोबत न्यावं लागत होतं!! हे इतकं सगळं असून ही मुकुलजी खचले नाही, हात-पाय गाळून बसले नाही की आपलं दुःख कुरवाळत इतरांची सहानुभूती मिळवली नाही.  
हा भयंकर आजार, सतत होणाऱ्या तपासण्या, आय सी यूमध्ये सारखं भरती होणं, ईसीजी, औषधं, गोळ्या, इंजेक्शन, सगळं चालू असताना पण ते एकाजागी बसून राहिले नाही किंवा त्यांनी घरी बसून आराम केला नाही. वेगवेगळ्या नोकर्‍या केल्या, दुकान सांभाळलं, तसंच अभिनयाची आवड होती म्हणून यवतमाळ सारख्या छोट्या ठिकाणांहून बाहेर पडून आधी नागपूर, मग पुणे असा प्रवास करत थेट मुंबई गाठली. या सगळ्या प्रवासात त्यांनी अनेक जागी नोकरी व इतर कामंही केले, परंतु शिस्तबद्ध राहणी आणि तत्त्वांशी तडजोड नाही या नियमामुळे बरेचदा विपरीत घडलं. पण ते त्यातून बाहेर पडले व पुढे वाढले. थांबले नाही की हरले नाही. आपल्या परिश्रमाने त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात ही पाऊल टाकले व त्यात यशस्वी झाले. अनेक हिंदी व मराठी मालिका व सिनेमात त्यांनी जागा मिळवली, पण या साठी त्यांनी आपलं दुःख कोणासमोर गाऊन सहानुभूतीने काम मिळवलं नाही, हे त्यांचा वैशिष्ट्य.
 
शारीरिक, आर्थिक व मानसिक प्रत्येक प्रकारच्या त्रासातून ते गेले व बाहेर पडले पण निराश-हताश झाले नाही, त्यांची ही संघर्षगाथा आपल्या पुस्तकात त्यांनी सांगितली आहे.  
मुबंई सारख्या मोठ्या शहरात, आर्थिक चणचण, सामाजिक जीवन, सतत मरणाची चाहूल, आणि त्यामुळे जीवनात निर्माण झालेली पोकळी, भगवान कृष्णावर त्यांची अतूट श्रद्धा, त्यामुळे त्यांना वेळोवेळी आलेले प्रत्यय, तसेच अर्ध आयुष्य झाल्यावर मिळालेला सौ. ऊषाजींचा सहवास, त्याचं प्रेम, जिव्हाळा, भक्कम आधार, आणि चि. अथर्व ज्यांनी त्यांना वडील बनवलं, हे सगळं जगावेगळं आहे. जो माणूस रात्री झोपला तर सकाळी उठेल की नाही याची पण खात्री नव्हती अश्या व्यक्तीसोबत संसाराचा खेळ मांडणं सोपं आहे का????   खरंच धन्य आहे त्यांचा पत्नी... मुकुलजी आपलं आयुष्य आनंदाने व दुप्पट हिमतीने जगून राहिले आहे!!  
 
# झुंज श्वासाशी# या पुस्तकात त्यांनी आपल्या या प्रवासा बद्दल वर्णन केलं आहे. लहानपणापासून ते वयाच्या 50 व्या वर्षापर्यंत या आजारामुळे किती आणि काय कष्ट सोसावे लागले, या सगळ्यात कोण आणि कसे त्यांचा मदतीला आले, त्यांना वारंवार मदत करणारे त्यांचे डॉक्टर, घरचे सदस्य तसेच सोबती याचं अत्यंत हळवं वर्णन आहे. त्यांची सकारात्मकता, ऊर्जा, जगण्याची जिद्द, सतत काहीतरी करत राहण्याची सवय तसेच स्वतःच्या त्रासाचा बाऊ न करता इतरांसाठी काहीतरी चांगला करायचं ही इच्छा या सगळ्याचा जोरावर कसं त्यांनी मृत्यूला पछाडलं, शिवाय त्यांचा या कामगिरीसाठी त्यांचा वेळोवेळी झालेलं कौतुक आणि प्रोत्साहन आपल्याला दिसतं.  
 
मुंबईच्या अनेक समाचार पत्रातून आणि मराठी वाहिनी वरून त्यांची मुलाखत घेण्यात आली. महानायक श्री अमिताभ बच्चन यांनी पत्राद्वारे मुकुलजींच कौतुक केलेलं आहे!!
  आज मुकुलजी अनेक संस्था व हॉस्पिटलमध्ये मेडिकल कंसल्टेंट म्हणून काम करून राहिले आहे. विशेष म्हणजे ते फक्त स्वताकरता जगत नसून इतरांना पण जगण्याची नवी उमेद देतात. असे लोकं ज्यांना स्वतःला किंवा परिवारातील सदस्याला व्ही एस डी हा आजार आहे त्यांना या त्रासाबद्दल माहिती, व उपचाराविषयी सांगतात. काऊंसलिंग करतात व आयुष्य सकारात्मकरीत्या कसं जगायचं हे सांगतात. इतकंच नव्हे तर या त्रासावर होणारी शस्त्रक्रिया फार महाग असते म्हणून जे कोणी हा खर्च करू शकत नाही त्यांना आर्थिक मदत कशी मिळेल याची व्यवस्था करतात. कित्येकांना मुकुलजींचा सल्ला घेतल्याने जीवन पुन्हा मिळालं आहे. जगण्याची इच्छा जिवंत झाली आहे.
 
"जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिये" या वाक्याला चरितार्थ करणारे मुकुल गरे मागचे 34 वर्ष बोनस आयुष्य जगून राहिले आहे. त्यांचा हा प्रवास ऐकून पुस्तक वाचून मनातील सगळं नैराश्य, नकारात्मकता दूर पळून जाते, आजच्या धावपळीच्या काळात मानसिक आणि शारीरिक व्याधी मुळे किंवा लहान-सहान कारणांमुळे आत्महत्या किंवा तसा प्रयत्न करणाऱ्या मुलांसाठी मुकुलजींच आयुष्य एक प्रेरणा आहे. काहीही झालं तरी खचायचं नाही, प्रयत्न संपवायचे नाही. जो सतत प्रयत्नशील असतो ईश्वर त्याचा पाठीशी असतो, हे सांगणारे श्री मुकुल गरे रिअल लाईफ हीरो आहे!!!  
 
मुकुल दादा तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी आभाळभर शुभेच्छा..........
 
- प्रगती गरे दाभोळकर

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती