स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि पोलादी पुरूष वल्लभभाई पटेल

शनिवार, 31 ऑक्टोबर 2020 (10:54 IST)
स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि कराची कॉग्रेस अधिवेशनाचे (१९३१) अध्यक्ष पोलादी पुरूष वल्लभभाई पटेल यांचा जन्म गुजरातमधील नडियाद येथे ३१ ऑक्टोबर १८७५ झाला. लहानपणापासूनच संघटन कौशल्य असणार्याज पटेल यांना साहस आणि राष्ट्रभक्ती त्यांच्या वडिलांकडून पिढीजात मिळाली होती. त्यांचे वडील जवेरभाई राणी लक्ष्मीबाई यांच्याबरोबर स्वातंत्र्याची पहिली लढाई लढले होते.
 
वल्लभभाई उच्च शिक्षणासाठी १९१० साली इंग्लंडला गेले. १९१३ मध्ये त्यांनी वकिलीस सुरुवात केली. गांधीजींनी केलेल्या आवाहनाने १९१७ मध्ये ते गुजरात सभेचे सचिव या नात्याने स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय झाले. १९१८ मधील खेडा सत्याग्रहात गांधीजींचे जवळचे सहकारी म्हणून ते कार्यरत झाले आणि वकिलीला रामराम ठोकला.
 
वल्लभभाई पटेल यांनी १९२८ मधील बार्डोली तालुक्यातील कर आंदोलनाचे त्यांनी नेतृत्व केले. येथून त्यांना 'सरदार' ही उपाधी मिळाली. मिठाच्या सत्याग्रहात पकडले जाणारे ते एक प्रमुख राष्ट्रीय नेते होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली कराची मधील कॉग्रेस अधिवेशनात गांधी-आयर्विन करार मांडला. पटेल यांनी तीव्रपणे स्वातंत्र्यासाठी आवाज उठविल्याने ते जानेवारी १९३२ ते मे १९३३ पर्यंत गांधीजींसह १६ महिने येरवडा तुरुंगात राहिले. 
 
यानंतर एक वर्षासाठी ते नाशिकच्या तुरूंगात राहिले. १९४० च्या वैयक्तिक सत्याग्रहात त्यांना पुन्हा अटक झाली. स्वातंत्र्याच्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणार्याे सरदार यांना देशे स्वातंत्र्य झाल्यानंतर गृहमंत्रीपद देण्यात आले. भारतात सामील होण्यास नकार देणार्या  संस्थानांवर सैनिक कारवाई करून त्यांनी आपल्यातील पोलादी पुरूष दाखवून दिला. १५ डिसेंबर १९५० रोजी त्यांचा मृत्यू झाला. सरदार पटेल यांना मृत्यूनंतर 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 
'बहुसंख्यांक आपली जबाबदारी ओळखत नसतील, तर हे देशाचे दुर्भाग्य असेल. जर मी अल्पसंख्याक समुदायाचा असतो तर हे विसरून गेलो असतो की मी अल्पसंख्याक आहे.' हे त्यांचे प्रसिद्ध वाक्य आहे. देशाची एकता आणि स्वातंत्र्याचे रक्षण त्यांचे जीवनाचे लक्ष्य होते. नाविकांच्या विद्रोहाला देखिल त्यांनीच इशारा देऊन शांत केले. घटनासभेत देखिल देशाची एकता भंग पावू नये याची दक्षता त्यांनी घेतली. देशाच्या एकतेसाठीच हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यात आला. याबरोबरच सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करून लयास गेलेले वैभव पुन्हा मिळवून देण्याचे कार्यही त्यांनी केले.
 
(भारत सरकारतर्फे १९७० मध्ये प्रकाशित झालेल्या 'सरदार पटेल' या पुस्तकाच्या आधारे) 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती