अंधश्रद्धा निर्मुलनाचं भूत

गुरूवार, 27 सप्टेंबर 2018 (11:14 IST)
काही कार्यकर्ते, पत्रकार इतके समर्पित असतात की विचारुन सोय नाही. श्रीदेवींचा मृत्यू झाला तेव्हा एका पत्रकाराने टबमध्ये झोपून दाखवले होते आणि आपण पत्रकारीतेला किती समर्पित आहोत हे त्याने सिद्ध केले होते. उद्या जर एखाद्या सेलिब्रिटीने उंचावरुन उडी मारुन जीव दिला तर तो पत्रकार त्याचेही प्रात्यक्षिक करुन दाखवेल याबद्दल माझ्या मनात तीळमात्रही शंका नाही. अशा समर्पित लोकांमुळेच जगात सगळं कुशल मंगल आहे. जिंतूरमध्ये अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी असेच समर्पित कार्य केले आहे. कोणतीही गोष्ट समर्पित होऊन केली तर परिणाम चांगलाच येतो. तर झालं असं की अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि पुरोगामी संघटनांनी १९ सप्टेंबर रोजी अंनिसच्या पदाधिकार्‍याच्या मुलाचा वाढदिवस स्मशानभूमीत साजरा केला. वाढदिवसानिमित्त स्मशानात केक कापण्यात आला आणि मांसाहार अशी मेजवानी सुद्धा ठेवण्यात आली होती. त्या परिसरातील अनेक लोकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावून आपला समर्पित भाव व्यक्त केला आहे.
 
आता तुम्ही म्हणाल यात अंधश्रद्धा निर्मुलन कुठे दिसून येते? तर लोकांच्या मनात अशी भिती आहे की मांसाहार करुन स्मशानभूमीकडे जाऊ नये, रात्रीच्या वेळी स्मशानभूमीकडे फिरकू सुद्धा नये. कारण स्मशानात भूतं राहतात, अशी अंधश्रद्धा लोकांच्या मनात आहे. लोकांच्या मनातील भिती निघून जावी म्हणून अंनिसने हे समर्पित कार्य केले आहे. लोकांच्या मनातील जातीभेदाची अंधश्रद्धा निघून जावी म्हणून सावरकरांनी सहभोजनाचे कार्यक्रम केले होते. पण अंनिसने १०० पावले पुढे जात स्मशानातील भूतांसोबत सहभोजनाचा कार्यक्रम उरकून घेतला आहे. त्यांनी भावी पिढीसाठी आदर्श घालून दिला आहे. एखादे कार्य कोणत्या थराला जाऊन समर्पित होऊन करावे याचे जीवंत उदाहरण म्हणजे अंनिसने साजरा केलेला स्मसानातील वाढदिवस...
 
सुधीर काकर यांच्या shamans, mystics and doctors या पुस्तकात भुतबाधा आणि त्यावरील उपचार यांचे मानसशास्त्रीय विश्लेषण दिले आहे. (संदर्भ: महाराष्ट्राची शोकांत्तिका - अरुण सारथी) भरतपूर जवळ बालाजी मंदिरत भूत उतरवण्याचे उपचार त्यांनी पाहिले आहेत. यावेळी काकर यांच्या असे लक्षात आले की २८ पैकी १५ जणांना मुसलमान भुतांनी झपाटले आहे. भुतांच्या साम्राज्यात मुसलमान भुतं ही फारच दुष्ट वगैरे मानली जातात. त्यात सय्यद भूत हे अतिशय वाईट मानले जाते. हे सय्यद भूत जर कुणाला झपाटले तर ते सहसा उतरवता येत नाही. हिंदू भूते त्यामानाने सोज्वळ असतात, बर्‍यापैकी सहिष्णू असतात. आल्या पावली निघून जातात. पण हे सय्यद भूत मात्र वंगाळ असतं, हट्टी असतं. कोणत्याही फकीराला घाबरत नाही, इतकंच काय तर आकाशातल्या बापालाही धजावत नाही. त्यामुळे अंनिसचे पुढचे पाऊल मुस्लिम दफनभूमी असणार आहे. तसेही कयामतचा दिन येईपर्यंत ती भूते काही तिथून हलणार नाहीत. मुस्लिम लोकांना आणि मुस्लिम भूतांना मांसाचे तसे वावडे नाही. पण माझ्या मते मुस्लिम भूतांना वरण भात तूप आदि पदार्थ आवडत नसणार. त्यामुळे वरण भात खाउन जर कुणी दफनभूमीकडे गेलं की ते सय्यद नावाचं भूत प्रचंड रागवू शकतं. म्हणूनच अंनिस दफनभूमीत यंदाच्या पितृपक्षात वरण, भात व तूपाची मेजवानी आयोजित करु शकते.
 
तसे पाहता भूतांच्या राज्यात ख्रिस्ती भूते सुद्धा मागे नाहीत बरे का... या ख्रिस्ती भूतांनी हॉलिवूडपटांना भूरळ घातलेली आहे. हॉलिवूडकरांनी भूतांचे अनेक चरित्रपट निर्माण केलेले आहेत. असा वेळी अंनिससमोर हा मोठा पेचप्रसंग आहे. भूते नाहीत असे अंनिस सांगताना भूतांवर चित्रपट तयार होणे म्हणजेच अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यासारखेच आहे. मी जितकं भूतांबद्दल ऐकलंय त्यावरुन ज्याप्रमाणे चराचरात देव आहे असं म्हटलं जातं त्याप्रमाणे भूते सगळीकडेच असतात. गावाला तर लोक रात्रीचे विहिरी जवळ सुद्धा जात नाही. म्हणून अंनिसच्या कार्यकर्त्यांनी रात्री अपरात्री विहिरीत उडी घेऊन विहिरीत भूत नसल्याचे सिद्ध केल्यास नवल वाटून घेऊ नका. शेवटी कर्तव्यदक्ष समर्पित माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. पण मला वाटतं लोकांच्या मनातील भिती घालवण्यासाठी हे कार्यकर्ते आपल्या घरातंच प्रेत का नाही गाडत. घरात जर प्रेत गाडले तर लोकांच्या मनातील भूतांविषयीची भिती कायमची नाहिशी होऊ शकते. त्यासाठी ते पुढाकार घेतील अशी माझी खात्री आहे. शेवटी अंधश्रद्धा नष्ट होणे गरजेची आहे.
 
मला फक्त त्या स्मशानातील घटनेबद्दल एकच तक्रार आहे. कारण त्या प्रसंगाचा जो फोटो प्रसिद्ध झाला तो दिवसाचा फोटो असल्याचा वाटतो आणि भूते ही रात्रीची येतात असे ऐकलेय. असो. शेवटी कुठल्याही सज्जन माणसाला स्मशानात जेवताना किळस येईल. पण अंधश्रद्धा निर्मुलनसाठी अतिसज्जन कार्यकर्त्यांनी प्रचंड मोठा त्याग केलेला आहे हे कौतुकास्पद आहे. बरं काही शौचालयत सुद्धा भूते असल्याचे ऐकिवात आहे. तिथे कोणता कार्यक्रम करता येईल?
 
@ जयेश शत्रुघ्न मेस्त्री

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती