श्रावणास आता संपत आलाय. अन् भाद्रपद महिन्याला सुरुवात होणार आहे. कधी खिडकीतून तर कधी अंगणात उभे राहून, रस्त्यावर चालताना पावसाचा प्रत्यय येऊ लागतो. आजूबाजूला हिरव्या रंगात रंगलेला परिसर, रस्त्याच्या बाजूला दाटीवाटीने वाढलेली हिरवळ. झाडावर चढलेल्या पसरट पानाच्या वेलीबुट्टीदार वाटोळ्या आकाराच्या नाजूक वेली. करंजीची झाडं. झाडांवरून टपटपणारे टपटप मोती अन् दुरून खुणावणारे हिरवेगार पोपटी डोंगर त्यावर अलगद तरंगणारे ढग. या दिवसात निसर्गरम्य ठिकाणांना भेट द्यायला आवडतंच पण सहज जरी घराबाहेर पडलं तरी भटकायला तर किती प्रसन्न आणि छान वाटतं, नाही का!
श्रावणातल्या या सरी अगदी रेशासारख्या मऊसुत मुलायम हिरवळीवर दाटतात तेव्हा त्या रेशमी सरींचा मोतीहार, नक्षीदार कशिदा विणून त्याचा झगा या हिरव्या झाडेवेली अंगावर लेवून दिमाखात उभ्या राहतात तेव्हा त्या वेलीना पाहून खरंच त्यांचा हेवा वाटतो. जाई-जुई, चमेली, मोगरा, गुलाब, पारिजात, सोनचाफा आदी फुलांचा गंध मनाला भुरळ पाडतो. केवड्याचं पान केसात माळण्याचा मोह मनाला आवरता येत नाही. वेगवेगळी गवतफुले, निळी, जांभळी, गुलाबी तेरड्याची फुलं, आघाडा, गवताचे विविध प्रकार, गोकर्णीच्या वेलीवरची ती नाजूक निळी, पांढरी फुलं, नक्षीदार गणेश वेलीवरची ती लालचुटूक फुलं अन् त्यावर बागडणारी इवली इवली रंगीबेरंगी फुलपाखरं आपल्याला त्या गवतावर
फुलपाखरू बनून बागडायला भाग पाडतात.
त्या पावसाच्या सरी अंगावर घेत आपण घराबाहेर पडतो तेव्हा अंगणात ऊन- पावसाचा खेळ रंगलेला. क्षणात ऊन क्षणात सावल्या आणि पाऊस. ढगांचा झिम, लपंडाव फुगडीचा खेळ जणू सुरू झालेला अन् आपण त्यात अगदी सहभागी खेळाडूप्रमाणे सहभागी व्हावं, राज्य त्यांच्यावर आहे आणि आपण फक्त पळतोय इकडे तिकडे त्यांच्यासोबत लंगडी घालत, कधी एका पायावर तरी कधी दोन्ही पायावर. कधी झाडाआड लपतो अन् झाड गदागदा हलते टपोर्या सरींचा अंगावर वर्षाव होतो. अंग शहारून येतं... झाडावर पंख फडफडवत बसलेली पाखरं पाहून अंगावरले थेंब शहारलेले झटकून चालू लागतो. ओठावर गाणं असतं...
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे. आणि खरंच याचा प्रत्यय आलेला पाहून मन आनंदाने इकडे तिकडे धावू लागले...गाणंम्हणत...नदीकाठावर, डोंगररानी, घाटमाथ्यावर... आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे वरती खाली मोद भरे...
या सर्व निसर्गकविता गुणगुणताना आजूबाजूचा हिरवा निसर्ग, हिरव्या पानांची मंद सळसळ, पाखरांची गोड चिवचिव, अन् निळसर ढगांची आकाशातली दाटी अन् तो भुरूभुरू पडणारा पाऊस तांबूस, हिरवी, पोपटी पालवी फुटलेली. आकाशात उटलेली सप्तरंगी इंद्रधनुची प्रतिमा पाहते तेव्हा श्रावणातल्या या दिवसात...आठवतात कवी मंगेश पाडगावकरांच्या या गाण्याच्या ओळी-
हे सुंदर हिरवं स्वप्नं जगताना डोळ्यांत भरून घेताना वाटतं... काळ पुढे सरकूच नये आणि असंच बसून राहावं या निसर्गाच्या कुशीत ध्यानस्थ समाधिस्त एखाद्या ऋषिुनीच्या सारखं. देवाच्या मंदिरात होणारा पवित्र घंटानाद, ओंकार, बेलफूल, दुर्वा, दुधाचा अभिषेक, कापूर, उद, उदबत्तीचा दर्प आणि यामुळे गाभार्यात दाटलेली निळाई आणि फळांचा नैवेद्य. भाविकांची गर्दी मनाला नकळत खेचून घेतेच मंदिराकडची वाट अन् जोडले जातात आपसूकच हात. हे निसर्गसौदर्यांचं वरदान माणसाच्या ओटीत घातल्याबद्दल आपण आनंद घेतानादेताना हा निसर्ग जपू या.
-तनुजा ढेरे