"माझा मुलगा हे असं करूच नाही शकत "!

गुरूवार, 20 ऑगस्ट 2020 (17:41 IST)
......"माझा मुलगा हे असं करूच नाही शकत "! ही अशी वाक्य आपण खूपदा ऐकतो, पण होतं काय की "त्याच्या" बायकोला हे नक्की माहिती असतं की "हे" कार्य माझ्या नवऱ्याने केलंय, पण आईची श्रद्धा अढळ आहे.
 
प्रत्येक नातेसम्बन्ध कित्ती वेगवेगळे गुंफली असतात न ! मुलगा आईशी वेगळा वागतो, पण बायकोला वेगळीच ट्रीटमेंट देत असतो.
 
मला तर असं वाटत की प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक नात्याशी, अथवा व्यक्तीशी वागण्याची रीत फार वेगवेगळी असते.
 
घरी श्रवण बाळ असलेला मुलगा ऑफिस मध्येही तसाच आज्ञाधारक पणे वागत असेल असं नाही, त्याची तिथं वागण्याची तऱ्हा वेगळी असते, तोच घरी बायकोशी वेगळ्या रीतीने वागतो, आईला जी गुपितं माहिती सुद्धा नसतात ती फक्त बायकोच जाणू शकते.
 
तरी आईचे शब्द असतात की माझ्या मुलासारखा नवरा तुला मिळाला हे तुझं भाग्य समज! आता खरें खोटे त्या सुनेला माहिती असते, कारण ती त्याची बायको म्हणून वावरत असते, नवरा म्हणून तिने त्याला झेललेलं असतं.
 
तसंच तो एक जावई म्हणून पण अत्यन्त वेगळा वागत असतो, आपलं जवाईपण तो लग्नानंतर च्या 20/25 वर्षानंतर पण विसरत नाही. आणि इकडे सुनेने घरात पाऊल पडता क्षणी सासर "आपलं घर" समजून सर्व कर्तव्य, काम आपल्या अंगावर घ्यावी, किंबहुना त्यासाठीच ती तिथं आली आहे !
 
पण आता थोडा काळ बदललेला दिसतोय, मुली फार वेगळ्या वागू लागल्यात, त्या फारश्या ह्या गोष्टीत रमतांना दिसत नाहीत. त्यांनी त्यांचं कस जगायचं हे ठरवलेलं दिसतंय.
 
ह्यावर काही सुवर्णमध्य निघायला मात्र हवा आहे, घरातील वातावरण बदलेल, आधी जे होत आणि आत्ता जे घडतंय ह्यातला सुवर्णमध्य.
 
कालाय तसम्य नमः ! असं च म्हणावं लागेल, पण तरी ही हे मात्र सत्यच असणार आहे की प्रत्येक व्यक्तीची प्रत्येकाशी वागण्याची रीत वेगळी असते, वत्यानुसार प्रत्येक जण त्या व्यक्ती विषयी वेगवेगळी मतं करीत असतो, त्यात मग चूक , बरोबर ठरवणे योग्य नाही असं मला वाटत!
.........अश्विनी थत्ते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती