सोमवार, 5 एप्रिल 2021 (16:24 IST)
पूजेसाठी रोज मी उपकरणं स्वच्छ करतो !
पण जोपर्यंत विकारांच्या मलीनतेपासून मन स्वच्छ होत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !
रोज मी देवासमोर पांढरी रांगोळी काढतो !
पण त्या पांढर्या रंगाप्रमाणे माझे मन धवल, निर्मळ होत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !
रोज ताम्हनात देवांवर मी पाणी घालतो !
पण मनातल्या आसक्ती वर मी जोपर्यंत पाणी सोडत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !
रोज मी देवाजवळ दिवा लावतो !
पण जोपर्यंत समाधानी वृत्तीचा नंदादीप मी मनात लावत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !
रोज मी देवाजवळ उदबत्ती लावतो !
पण संसारतापाने मंदपणे जळत असताना चित्तशुद्धीचा अंगारा जोपर्यंत मला लाभत नाही तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !
रोज मी देवाजवळ कापूर जाळतो !
पण त्या कापराच्या वडीप्रमाणे मनातले कुविचार क्षणात जळून जात नाहीत, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !
रोज आरती करताना मी देवाचा गुणगौरव करतो !
पण माझ्या आजूबाजूच्या माणसांमधले गुण जोपर्यंत मी शोधत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !
रोज मी देवासमोर स्थिर बसून तासभर ध्यान करतो !
पण जोपर्यंत माझ्या चंचल चित्तवृत्ती स्थिर होत नाहीत, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !
वृक्षवेलींनी प्रयत्नपूर्वक निर्मिलेली फुले मी देवाला रोज वाहतो !
पण माझ्या कष्टसाध्य सत्कर्माची फुले मी जोपर्यंत समाजाला वाटत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !
देवासमोर मी रोज प्रसाद ठेवतो !
पण त्याने मला दिलेला हा जीवनरूपी प्रसाद परोपकारी वृत्तीने मी इतरांना देत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे !