भावपुर्ण श्रध्दांजली

मंगळवार, 30 मार्च 2021 (16:22 IST)
किती सरळ, साधं सोपं आहे ना ? आजकाल जगाच्या कानाकोपर्‍यात काहीही घडो काही सेकंदात सगळ्या जगात बातमी पोहचते. जगातील सगळं कसं वेगात चाललय. माणसं देखील देखील तेवढ्याच वेगात धावत आहेत. कोणाला थांबायला वेळच नाही. तसंच झालंय मृत्यूचं देखील. तोही अगदी वेगात येतोय. तो देखील आता थांबायच नाव घेत नाही.
 
अगदी दोन तासापुर्वी संभाषण झालेल्या माणसाला व्हॉटसअॅपवर भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करतो आपण. किती सोप आहे ना!! एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर साडेचार साडेचार अक्षरांचे दोन शब्द आणि एक डिजीटल पुष्पगुच्छ देऊन आपण मोकळे होतो. पण खरंच ज्या घरातला कमवता बाप, प्रेम करणारी आई, वयात आलेला भाऊ, लहान लहान लेकरं असलेली बहीण अशी कितीतरी नाती उघड्यावर टाकुन कोणीतरी निघुन गेलेल असतं.
 
माणसं श्रध्दांजली अर्पण करुन मोकळी होतात. काहीजण यथाशक्ति आर्थिक मदतही करतात. काहीजण दहावे तेरावे घालतात. काहीजण पोकळ आश्वासनं देतात तर काहीजण फुशारकी मिरवत मदतीचा आव आणतात. जिचा तरुण कमावता नवरा मरतो ना आणि ज्या लेकरांचा आयुष्य सुरु होण्याआधीच बाप मरतो त्यांचं दुःख काय असेल. दरारोज घरी येताना घामानं भिजलेला बाप हातात त्या चिमण्यांसाठी खाऊ घेऊन येतो ना तेव्हा कोंबडीच्या पंखाखाली ऊब घ्यावी तशी ती पिल्लं बापाला बिलगतात. पण आज तोच बाप अग्नित विलिन झालाय त्या लेकरांनी काय टाहो फोडावा. रोज संध्याकाळी कोणाची वाट पहावी. पाठीवर लाडाचा धपाटा कोणाचा खावा. काय यातना  होत असतील त्या लेकरांना. आपलं बरंय आपण फक्त भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करुन मोकळे होतो.
 
काय वाटत असेल त्या अर्धांगिनीला जिचा साथीदार अर्ध्यावर डाव मांडुन निघुन गेला. बँक कुठं आणि कशी असते हे तिनं कधीच पाहीलेलं नसतं. व्यवहार माहीत नाही. जग माहीत नाही.आणि आज अचानक तिला सोडून या बाहेरच्या जगात पोरकं करुन जेव्हा तिचा सोबती जातो ना तिचं दुःख तिलाच माहीत. आपण मात्र भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करुन मोकळे होतो.
 
ज्या आईबापाची म्हातारपणी काठी बनावी त्याच तरण्याबांड पोराचा बाप जेव्हा खांदेकरी होतो ना तेव्हा त्या बापाला जिवंत मरणयातना काय असतात हे कळतं. नऊ महिने पोटात वाढवुन जग पाहील्यावर तळहाताचा पाळणा आणि नेत्रांचा दिवा करणारी माऊली जेव्हा आपल्या बाळाचं प्रेत पाहुन हंबरडा फोडते ना...तेव्हा तिची ती हाक त्या पांडुरंगाच्या कानावर पडते की नाही माहीत नाही. आपण दहावा तेरावा करुन मोकळे होतो. आपलं काम सोप आहे भावपुर्ण श्रध्दांजली

भाऊबीजेला माझा दादा येईल. अशी चातकासारखी वाट पाहणारी ताई. रक्षाबंधन जवळ आलं की माझा भाऊ माझ्याकडे येईल या वेड्या आशेवर जगणारी सासुरवासीण जेव्हा आपल्या पाठीराख्याच्या मृत्यूची बातमी ऐकत असेल तर तिचं काळीज कसं फडफड करत असेल याची कल्पना न केलेलीच बरी. आता माझा दादा...माझा भाऊ...सणासुदीला येईल कि ?? येणारा सण तिच्यासाठी कसा असेल .... आपलं बरं आहे हो.... आपण भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करुन मोकळे होतो..
 
दररोज भेटणारा मित्र. तासनतास फक्त गप्पा कधीतरी मनमुराद हशी मजाक. तर कधी जाणीवपुर्वक असणारा रुसवाफुगवा. हातात घेतलेला हात. खांद्यावर डोकं ठेऊन मनसोक्त अश्रुंना मोकळी करुन दिलेली वाट. तर कधी भक्कम पाठीशी उभा राहणारा मित्र जेव्हा सोडुन जातो. त्यानंतर त्या मित्रांची किंवा मैत्रीणींची अवस्था. उद्या माझा सखा भेटेल का ? स्वतःच्याच मनाला प्रश्न विचारल्यावर आंतरमनातली भावना काय असते हे त्यालाच कळतं ज्याचा मित्र निघुन गेलाय कैलासाच्या प्रवासाला.....आपलं काय एकदम सोप आहे हो.....भावपुर्ण श्रध्दांजली ....
खरंच आपलं सोपं आहे.....पण ज्याचं प्रेत जळतं त्या घरातल्यांनाच कळतं...दुःख काय आणि कस असतं
 
म्हणून सर्वांना विनंती की कोविड सारख्या भयानक परिस्थितीत आपली स्वतःची, आपल्या सर्व प्रियजनांची, मित्रपरिवाराची काळजी घ्या..!! स्वस्थ रहा आनंदी रहा... 

-सोशल मीडिया

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती