महाराष्ट्र दिन : आपल्या प्राणांची आहुती देणार्या हुतात्म्यांचे स्मरण दिन
गुरूवार, 30 एप्रिल 2020 (11:55 IST)
महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. या दिवशी महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०५ हुतात्म्यांचे स्मरण केले जाते.
२१ नोव्हेंबर इ.स. १९५६ दिवशी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले. यामुळे सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संदर्भातच कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले.
प्रचंड जनसमुदाय गगनभेदी घोषणा देत फ्लोरा फाउंटनकडे जमला. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र अढळ सत्याग्रहींमुळे पोलिसांना अपयश हाती आले आणि त्यामुळे पोलिसांना गोळीबाराचा आदेश देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ आंदोलक हुतात्मे झाले.
या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर १९६५ साली त्याजागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली.