काँग्रेस पक्षाला गेल्या वर्षभरापासून हंगामी अध्यक्ष आहे. याबाबत निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला असल्याची बातमी असून जर या संदर्भात समाधानकारक उत्तर दिले नाही तर पुढील निवडणूकीत कांँग्रेस पक्षाचे निवडणूक चिन्ह गोठवले जाण्याची भीती जाणकार व्यक्त करीत आहेत. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी अध्यक्ष नसल्यामुळे पक्ष दिशाहीन झाल्याचा दावा करीत जर राहूल गांधी नाहीच वर ठाम असतील तर दूसरा पर्याय शोधावा असेही सुचवले आहे. या घटनाक्रमामध्ये राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून आता काँग्रेसचे काय या प्रश्नावर दबक्या आवाजात चर्चाही सुरु झाली आहे.
तसा विचार करता काँग्रेस हा देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणून ओळखला जातो. 2019 मध्ये या पक्षाने 125 वर्षे पूर्ण केलीत. या पक्षाचा देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातही सिंहाचा वाटा राहिला होता. त्यानंतर स्वतंत्र भारतातही दीर्घकाळ काँग्रेस देशभरात सत्तेत सहभाग ठेवून होती. स्वातंत्र्योत्तर काळात देशाच्या जडणघडणीतही काँग्रेसचे योगदान दुर्लक्षिता येत नाही.
या कांँग्रेस पक्षाने 1984 पर्यंत देशाच्या राजकीय क्षितिजावर आपला अक्षरशः वरचष्माच नव्हे तर दबदबाही ठेवला होता. मात्र 1984 नंतर काँग्रेसला देशाच्या लोकसभेत कधीच पूर्ण बहुमत मिळाले नाही. तिथून हळूहळू घसरणीला लागलेला काँग्रेस पक्ष आज अगदी आचके देतो आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. 2004 ते 2014 या 10 वर्षात कडबोळे सरकारचे नेतृत्व करणारा काँग्रेस पक्ष 2014 मध्ये देशातील प्रमुख विरोधी पक्ष म्हणूनही स्वतःचे अस्तित्व ठेवू शकला नव्हता. 2019 मध्ये काहीशी परिस्थिती बदलेल असे वाटले होते. मात्र आजही परिस्थितीत फारसा बदल झाला नाही. 2014 मध्ये काँग्रेसने भाजपला लोकसभेत 282 जागांवर रोखले होते. 2019 मध्ये भाजपने 303 जागांवर मजल मारली. हे जितके भाजपचे यश आहे त्यापेक्षाही जास्त काँग्रेसचे अपयश आहे असे म्हणावे लागते. त्यामुळे आता काँग्रेसचे कसे ही चिंता सर्वच काँग्रेसप्रेमी आणि राजकीय अभ्यासकांना लागली असल्यास त्यात नवल नाही.
काँग्रेसच्या या दुर्गतीला कोणकोणती कारणे कारणीभूत ठरली याचा आढावा घेणे आज गरजेचे झाले आहे. आज देशात सत्तास्थानावर दोन प्रमुख विचारधारा सक्रिय आहेत. त्यात एक भाजपची म्हणजेच संघविचारांची तर दुसरी काँग्रेसची विचारधारा आहे. सत्ता माणसाला भ्रष्ट करते आणि अनिर्बंध सत्ता माणसाला बेफाम बनवते हे राजकारणातले एक तत्त्व आहे. त्यामुळेच लोकशाहीत प्रबळ विरोधी पक्ष असणे गरजेचे असते. मात्र सद्यस्थितीत प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस हा गलितगात्रा झाला आहे. तर इतर विरोधी पक्षांपैकी कोणालाही राष्ट्रीय क्षितिजावर स्वीकराहर्ता नाही. त्यामुळे ही लोकशाही उद्या हुकूमशाहीत तर परिवर्तित होणार नाही ना अशी भीती राजकीय विचारवंत व्यक्त करीत आहेत. अशा परिस्थितीत आज प्रबळ विरोधी पक्षाचे काम करू शकणार्या काँग्रेसची अशी वाताहत होण्याची नेमकी कारणे कोणती याचा शोध घेणे आवश्यक ठरते.
काँग्रेसच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतल्यास स्वातंत्र्यपूर्व काळातील वातावरणातली काँग्रेस ही पूर्णतः वेगळी होती असे लक्षात येते. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळातली काँग्रेसच्या वाटचालीचाच इथे विचार करणे क्रमप्राप्त ठरते.
स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेसवर महात्मा गांधींचा प्रभाव होता. नंतर मात्र काँग्रेस पूर्णतः नेहरु परिवाराच्या आधिन झालेली दिसून आली. एकूणच काँग्रेसमधल्या घराणेशाहीची ही सुरुवात होती. नेहरुंनी देशाचे पंतप्रधान होण्यासाठी काय काय केले याबाबत विविध कथा सांगितल्या जातात. त्यातील काही आख्यायिकाही असतील. मात्र काही वास्तव घटनाही असू शकतात. त्या काळात पंडित नेहरुंवर एकूणच इंग्रजांचे शेवटचे व्हॉईसरॉय लॉर्ड माऊंटबेटन यांचा प्रभाव होता. त्यामुळे त्यांच्या सूचनांनुसार सुरुवातीच्या काळात देशाची धोरणे ठरवली गेली. भारतात इंग्रजांना कायम हिंदू-मुसलमान संघर्ष हवा होता. धोरणे ठरवताना हा मुद्दा कायम लक्षात ठेवला गेला. यातून अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण आणि बहुसंख्यांकांना काहीशी दुय्यम वागणूक हे धोरण सुरु झाले. यातूनच बहुसंख्यांक समाज हळूहळू काँग्रेसपासून दुरावायला सुरुवात झाली.
घराणेशाहीची परंपरा पुढे न्यायची हे तर नेहरु-गांधी परिवाराचे प्रमुख तत्व होते. पं. नेहरुंच्या मृत्यूनंतर देशाचे पंतप्रधानपद नेहरु परिवारातील त्यांची कन्या इंदिरा गांधींना मिळावे ही सर्व परिवाराची इच्छा होती. मात्र त्यावेळी काही काँग्रेसजनांनी थोडे बाजूला जात लालबहाद्दुर शास्त्रींना पंतप्रधान केले. त्यावेळी नेहरु-गांधी परिवाराने केलेल्या आकांडतांडवाची माहिती त्या काळातील ख्यातनाम मराठी पत्रकार मो. ग. तपस्वी यांनी आपल्या नियतीचा करार या पुस्तकात दिली आहे. अर्थात शास्त्रीजींना जास्त काळ मिळालाच नाही आणि नंतर सलग 11 वर्ष इंदिरा गांधी सत्तेत राहिल्या. या 11 वर्षात त्यांनी सत्ता तर टिकवलीच मात्र त्याचबरोबर एकाधिकारशाहीही राबवली. पक्षातंर्गत लोकशाही तिथेच संपुष्टात आली होती. 1977 नंतरही हाच प्रकार सुरु राहिला. नेहरु-गांधी परिवाराचे वर्चस्व कायम राहावे म्हणून 1969 आणि 1977 असा दोनदा काँग्रेस पक्ष दुभंगला गेला.
1980 मध्ये इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्यावर पुढली साडेचार वर्ष त्यांनी सत्ता राबवली. त्यांच्या वधानंतर काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ व्यक्ती पंतप्रधान व्हायला हवी होती. मात्र तिथेही घराणेशाही राबवली गेली. राजीव गांधींना पंतप्रधान बनवले गेले.
या काळापर्यंत तरी देशातील जनता नेहरु-गांधी परिवाराच्या करिष्माच्या प्रभावाखाली होती. त्यामुळे त्यांच्या नावावर काँग्रेस सत्तेत निवडून येत असे. मात्र राजीव गांधींच्या काळात झालेल्या चुकांचा योग्य उपयोग त्या काळात देशातील सत्तेचे स्वप्न बघणार्या भारतीय जनता पक्षाने करुन घेतला. शहाबानो प्रकरण आणि राममंदिर उभारणी या दोन मुद्यांवर भाजपने मतदारांचे धृवीकरण घडवून आणले. बोर्फोसचा मुद्दा घेऊन समाजातील उच्च मध्यमवर्गीयांनाही काँग्रेसपासून दूर केले. परिणामी 1989 च्या निवडणूकीत काँग्रेसला पिछाडीवर जावे लागले.
राजीव गांधींच्या निधनानंतरही काँग्रेस आपला जुना दबदबा निर्माण करू शकली नाही. या काळात भारतीय जनता पक्षाची ताकद तर वाढतच होती. त्याचबरोबर काँग्रेसमधले वेगवेगळे गट तुटून बाहेर पडत होते. विशेषतः प्रादेशिक स्तरावरील अस्मितांचा नवा आविष्कार समोर येत होता. त्यातून मग ममता बॅनर्जी, शरद पवार, बिजू पटनाईक, एन.टी. रामाराव असे प्रादेशिक स्तरावरील नेते आणि पक्ष पुढे येऊ लागले. काँग्रेस विचारसरणीतून पुढे आलेले हे होतेच पण त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे, जयललिता, करुणानिधी असेही प्रादेशिक अस्मितांचा पुरस्कार करणारे नेते पुढे आले. या सर्वांनीच जो काही धोका पोहोचवला तो काँग्रेस पक्षालाच.
आणखी एक विशेष बाब येथे नमूद करणे गरजेचे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेस ही एक विचारधारा होती. स्वतंत्र्य लढ्यासाठी त्या विचारधारेत झोकून देणारे लाखो नागरिक होते. मात्र स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेसची संघटनात्मक बांधणी योग्य पद्धतीने व्हायला हवी होती. ती आजवर कधीच झालेली नाही. या तुलनेत आधी जनसंघ आणि आताचा भारतीय जनता पक्ष यांनी कायम आघाडी घेतली. संघटनात्मक बांधणी ही कोणत्याही पक्षाला पुढे जाण्यासाठी आवश्यक असते. काँग्रेसने मात्र त्याकडे कधीच लक्ष दिले नाही.
आधी नमूद केल्याप्रमाणे काँग्रेस पक्षाकडे देशात दीर्घकाळ अनिर्बंध सत्ता होती. या अनिर्बंध सत्तेने भ्रष्टाचाराला खतपाणी घातले. त्याचा फायदा काँग्रेसच्या विरोधकांनी तर करुन घेतलाच पण काँग्रेसमधल्यानीही फुटून बाहेर पडत हाच भ्रष्टाचार निवडणूकीचा मुद्दा बनवला. याचे उत्तम उदाहरण 1989 मध्ये विश्वनाथ प्रतापसिंह यांचे देता येईल. राजीव गांधींसोबत काही काळ सत्तेत राहिल्यानंतर त्या काळातील प्रकरणांचा मुद्दा बनवित ते जनता दल बनवते झाले होते. यावेळी अरुण नेहरुंसारखे राजीव गांधींचे निष्ठावनही त्यांच्यासोबत गेले होते. हे सर्वच प्रकार नेहरु--गांधी परिवाराबद्दल देशातील जनसामान्यांच्या मनात असलेली आस्था दोलायमान करण्यास कारणीभूत ठरले. त्याचा फायदा सर्वच प्रमुख विरोधी पक्षांनी उचलला.
1996 नंतर काँग्रेस काहीशी दिशाहीन झाली होती. त्यावेळी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी सर्वसहमतीने पक्ष पुढे नेणे गरजेचे होते. मात्र इथेही नांग्या टाकत सर्वांनीच सोनिया गांधींना नेतृत्व देऊ केले. जी क्षमता नेहरु, इंदिराजी किंवा राजीव गांधींमध्ये होती ती सोनियांमध्ये निश्चितच नव्हती. मात्र वाद नको म्हणून त्यांना गुळाचा गणपती बनवून पक्षाध्यक्ष केले गेले. विरोधी पक्षांनी हा मुद्दा घेण्या आधीच पक्षातीलच शरद पवार, पी.ए. संगमा अशांनी सोनियांना विरोध करत पक्ष फोडला. इथे काँग्रेस विरोधकांना आयतेच कोलित मिळाले. 2004 मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडी बनवून काँग्रेसने सत्ता काबीज केली खरी मात्र पक्षाला आणि सरकारला सक्षम नेतृत्व देणारे नाव त्यांच्याकडे नव्हते. त्यामुळे पुढील 10 वर्ष रडतघडत सरकार चालले. जेव्हा नरेंद्र मोदींसारखे सक्षम नेतृत्व पुढे आले तेव्हा या सरकारचे तीनतेरा व्हायला वेळ लागला नाही. तेव्हापासून काँग्रेस जी आचके देते आहे ती आजही तशीच आहे.
आज आचके देणारी काँग्रेस देशात किमान प्रमुख विरोधीपक्ष म्हणून तरी पुढे यायला हवी होती. मात्र गत 6 वर्षात तेही शक्य झालेले नाही. 2019 च्या निवडणूकीत राहूल गांधींनी पक्षाला नेतृत्व दिले होते. मात्र भाजप आणि देशातील माध्यमांनी राहूल गांधींची पप्पू म्हणून निर्माण केलेली प्रतिमा त्यांना स्वतःला किंवा पक्षाला दूर करता आली नाही. निवडणूकीचे निकाल लागल्यावर त्यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्याचवेळी गांधी-नेहरु परिवाराबाहेरच्या व्यक्तीला पक्षाचे नेतृत्व द्या असे सुचवले. मात्र अजूनही गांधी-नेहरु परिवाराच्याच प्रभावाखाली असलेल्या काँग्रेसजनांनी सोनिया गांधींना हंगामी अध्यक्ष बनवले. त्यातूनच आजची परिस्थिती निर्माण झाली आहे.
ही परिस्थिती बदलायची असेल तर काँग्रेसला स्वतःमध्येच आमूलाग्र बदल करणे गरजेचे झाले आहे. आजही काँग्रेसची विचारधारा मानणारा वर्ग या देशात लक्षणीय संख्येत आहे. त्या सर्वांना एकत्र करण्यासाठी काँग्रेसला प्रयत्न करावे लागतील. पक्षाची संघटनात्मक बांधणी करावी लागेल. बहुसंख्यांकांच्या विरोधी असलेली त्यांची प्रतिमा त्यांना पुसून टाकावी लागेल आणि सर्वांना आम्ही समान न्याय देऊ शकू हा विश्वास निर्माण करावा लागेल. राहूल गांधींनी सुचवल्यानुसार पक्षातंर्गत सक्षम नेतृत्व पुढे आणून त्याच्याकडे पक्षाची धुरा सोपवावी लागेल. पक्षातील घराणेशाहीला मुठमाती द्यावी लागेल. पक्षात येणार्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्याच्या क्षमतेनुसार संधी मिळते,जुनेच वर्षानुवर्षे सत्ता उपभोगता आणि बाकी फक्त नारे देण्यासाठी ही परिस्थिती बदलली असल्याचा विश्वास निर्माण करावा लागेल.
या पद्धतीने पक्षा बांधल्यावर जनसामान्यांचे प्रश्न घेऊन पक्षाला प्रसंगी रस्त्यावर उतरावे लागेल. सत्तेसाठी अभद्र शय्यासोबत आणि वैचारिक भ्रष्टाचार हे प्रकारही टाळावे लागतील. आम्ही या देशात सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करू शकतो आणि वेळ पडल्यास देशाची धुरा सांभाळून देशाला वैभवशाली बनवू शकतो हा विश्वास जनसामान्यांच्या मनात निर्माण करावा लागेल.
हे सर्व करताना काँग्रेस पक्ष जनसामान्यांचा आहे, नेहरु-गांधी परिवाराचाच नाही हे आपल्या कृतीतून काँग्रेसजन्यांना सिद्ध करून द्यावे लागणार आहे. अर्थात आजतरी काँग्रेससाठी हे शिवधनुष्य पेलण्याइतके अवघड आहे. मात्र हे अशक्यही नाही. जर काँग्रेसजनांनी ठरवले तर ते करूही शकतात.
हे शिवधनुष्य काँग्रेसजनांनी पेलावे यासाठी आज आपण काँग्रेसला शुभेच्छा देऊ या त्यांनी आजच सुरुवात करावी म्हणजे उद्या त्यांचे निवडणूक चिन्ह गोठवण्याची वेळ येणार नाही.
तुम्हाला पटतंय का हे? त्यासाठी आधी तुम्ही समजून तर घ्या राजे हो....
ता.क : घ्या समजून राजे हो या लेख मालिकेतील अविनाश पाठक यांचे लेख वाचण्यासाठी त्यांच्या www.facebook.com/BloggerAvinashPathak या फेसबुक पेजवर जाऊन वाचता येतील.