क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद

गुरूवार, 27 फेब्रुवारी 2020 (14:35 IST)
चंद्रशेखर आझाद
जन्म: २३ जुलै, १९०६
मृत्यू: २७ फेब्रुवारी, १९३१
 
चंद्रशेखर आझाद  हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतीकारक होते. चंद्रशेखर आझाद यांचा जन्म मध्यभारतातील झाबुआ तहशिलीतील भाबरा गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पंडित सीताराम तिवारी, व मातेचे नाव जगदानीदेवी असे होते. आईच्या इच्छेनुसार ते वाराणसी येथील संस्कृत पाठशाळेत गेले. 
 
डिसेंबर, १९२१ मध्ये महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या असहकार आंदोलनात तेव्हाच्या 15 वर्षे वयाच्या चंद्रशेखरने सहभाग घेतला होता. त्यासाठी त्याला अटक झाली होती. ते इतके लहान होते की, त्यांना पकडण्यात आले तेव्हा त्यांच्या हातांना हातकडीच बसेना. ब्रिटीश न्यायाने या छोट्या मुलाला १२ फटक्यांची आमानुष शिक्षा दिली. फटक्यांनी आझादांच्या मनाचा क्षोभ अधिकच वाढला, व अहिंसेवरील त्यांचा विश्वास पार उडाला. मनाने ते क्रांतिकारक बनले. तेव्हा न्यायालयात चंद्रशेखरने आपले आडनाव 'आझाद' असल्याचे नोंदवले. तेव्हापासून ते त्याच आडनावाने ओळखले जाऊ लागले.
 
काशीत श्रीप्रणवेश मुखर्जींनी त्यांना क्रांतिची दीक्षा दिली. सन १९२१ सालापासून १९३२ सालापर्यंत ज्या ज्या क्रांतिकारी चळवळी, प्रयोग, योजना, क्रांतिकारी पक्षाने योजल्या, त्यात चंद्रशेखर आझाद हे आघाडीवर होते.
 
झाशीत राहून त्यांनी मोटार चालवणे व पिस्तूलाने गोळी मारणे, अचूक नेम साधणे याचे शिक्षण त्यांनी घेतले. 
 
काकोरी कटापासून त्यांच्या डोक्यावर फाशीची तलवार लटकत होती. तरी त्या खटल्यातील क्रांतिकारकांना सोडविण्याच्या योजनेत ते गर्क होते. आझादांनी क्रांतिकारकांना सोडविण्याचे जोरदार प्रयत्न चालू असताना ”मी जीवंतपणी ब्रिटीश सरकारच्या हाती कधीच पडणार नाही’ ही त्यांची प्रतिज्ञा होती. 
 
27 फेब्रुवारी 1931 ला ते शेवटचे अलाहाबादच्या आल्फ्रेड पार्कमध्ये शिरले. पो. अधिक्षक नॉट बॉबरने तेथे येता क्षणी आझादांवर गोळी झाडली. ती त्यांच्या मांडीस लागली. पण त्याच वेळी आझादांनी नॉट बॉबरवर गोळी झाडून त्याचा हातच निकामी केला. मग ते एका जांभळीच्या झाडाआड गेले. हिंदी शिपायांना ओरडून ते म्हणाले,” अरे शिपाई बंधूंनो, माझ्यावर गोळ्या का झाडताय? मी तर तुमच्या स्वातंत्र्यासाठी लढतोय. काही तर समजा. ते इतर लोकांना देखक्षल म्हणाले की येथे येऊ नका, येथे गोळ्या झाडल्या जात आहे. वंदे मातरम् ! वंदे मातरम् !”
 
जेव्हा त्यांच्या पिस्तुलात शेवटची गोळी राहिली, तेव्हा ते त्यांनी आपल्या मस्तकाला टेकले आणि चाप ओढला. तत्क्षणी त्यांचे प्राण पंचतत्वात विलीन झाले.
 
यावर नॉट बॉबर म्हणाला, की असे सच्चे निशाणबाज मी फार थोडे पाहिले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती