वयाच्या 8 व्या वर्षी त्यांचा विवाह मल्हारराव होळकर याचे सुपुत्र खंडेराव होळकर यांच्याशी झाला. लहानग्या वयातच त्या होळकर कुटुंबाच्या सून झाल्या. त्यांना मालोजीराव आणि मुक्ताबाई नावाचे दोन अपत्ये झाली. अहिल्याबाई आपल्या पतीच्या राजकारणात त्यांची मदत करत होत्या. अहिल्याबाई यांच्या गुणांना त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी प्रोत्साहन दिले.वेळोवेळी ते त्यांना सैन्य,राज्याचे कारभार कसे करायचे याची शिकवणी देत असे. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी त्यांना वैधव्य आले. त्यांनी आपल्या पतीसह सती होण्याचा विचार केला परंतु त्यांना त्यांच्या सासऱ्यांनी असे करण्यापासून रोखले. नंतर त्यांच्या सासऱ्यांचे निधन झाल्यावर राज्यकार्याची जबाबदारी त्यांचा मुलाने मालेराव होळकर यांनी घेतली.
त्यांच्या हाती राज्याचे कारभार देण्याचा विरोध अनेक राजांनी केला परंतु त्यांचे कुशल नेतृत्व बघून प्रजेला देखील त्यांच्या वर विश्वास बसू लागला. आपल्या कार्यकाळात अहिल्याबाईंनी अनेकदा युद्धात प्रभावशाली रणनीती आखत सैन्याचे कुशल नेतृत्व केले. आपल्या प्रजेच्या रक्षणार्थ अहिल्याबाई सतत तत्पर रहात असत.राज्यात मोठ्या प्रमाणात चोरी, लुट, हत्या, या घटनांमध्ये वाढ झाली होती. यावर अंकुश आणण्यात अहिल्याबाईं यशस्वी झाल्या. आणि आपल्या नेतृत्वात त्यांना प्रांतात शांतता आणि सुरक्षेचं वातावरण स्थापन करण्यात यश आलं. पुढे त्यांच्या राज्याचा कला, व्यवसाय, शिक्षण, या क्षेत्रात उत्तम विकास झाला.ग्रामपंचायतीचे काम सुरळीत करून न्यायालयांची स्थापना केली. अहिल्याबाईंची गणना आता आदर्श शासकाच्या रुपात सर्वदूर होऊ लागली होती.
राणी अहिल्यादेवी यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, किंवा त्यांचा जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्यांनी माळव्यात रस्ते व किल्ले बांधले, अनेक उत्सव भरवले, हिंदूमंदिरांमध्ये कायमस्वरूपी पूजा सुरू रहावी म्हणून अनेक दाने दिली., माळव्याबाहेरही त्यांनी मंदिरे, घाट, विहिरी, तलाव व धर्मशाळा बांधल्या. अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. अहिल्याबाई होळकरांनी केलेल्या बांधकामांच्या यादीत काशी, गया, सोमनाथ,अयोध्या, मथुरा, हरिद्वार, कांची, अवंती, द्वारका, बद्रीकेदार, रामेश्वर व जगन्नाथपुरी वगैरेचे समावेश आहे.
अहिल्याबाई होळकर या दानशूर आणि उदार शासक होत्या, त्यांच्यात दया, करुणा, परोपकाराची भावना ओतप्रोत भरलेली होती आणि म्हणूनच आपल्या शासनकाळात गरिबांकरता व भुकेलेल्यांसाठी त्यांनी अनेक अन्नछत्र उघडलीत.पाण्याकरता अनेक पाणपोया स्थापन केल्या.
आपल्या कारकिर्दीत अहिल्याबाईंनी इंदौर या छोट्याश्या शहराला समृद्ध आणि विकासात्मक बनविण्यात आपले अमुल्य योगदान दिले आहे. येथील रस्त्यांची स्थिती, भुकेलेल्या जीवांसाठी अन्नछत्र, शिक्षण या संबंधी अद्वितीय कार्य करून ठेवलं आहे. त्यांच्यामुळेच आज इंदौर शहराची ओळख समृद्ध आणि विकसित शहरांमध्ये केली जाते.