महिलांमध्ये वास घेण्याची क्षमता अधिक

पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये घ्राणेंद्रिय पेशी अधिक प्रमाणात असल्यामुळे त्यांची हुंगण्याची अर्थात वास घेण्याची क्षमता पुरूषांपेक्षा अधिक सरस असते, असा नवा निष्कर्ष संशोधकांच्या एका समूहाने काढला आहे.
महिलांची वास घेण्याची क्षमता पुरूषांपेक्षा सरस का असते? या महत्त्वाच्या प्रश्नाची उकल करण्याचा प्रयत्न गेल्या अनेक दिवासांपासून करण्यात येत होता. त्यात आता यश आले आहे. संशोधकांच्या एका समूहाने 55 वर्षे

वयोगटातील 7 पुरूष व 11 महिलांच्या मेंदूची मरणोत्तर तपासणी करून महिलांत पुरूषांच्या तुलनेत घ्राणेंद्रियाच्या पेशी अधिक असल्यामुळे त्यांची वास घेण्याची क्षमता पुरूषांपेक्षा अधिक चांगली असते, असा निष्कर्ष काढला आहे.

मृत स्त्री- पुरूषांच्या मेंदूतील घ्राणेंद्रिय पेशींची मोजणी केली असता या पेशी पुरूषांच्या तुलनेत महिलांत 43 टक्के अधिक असल्याचे आढळून आले, असे रियो दी जेनेरियो स्थित फेडरल विद्यापीठाचे प्रोफेसर रॉबर्ट लेंट यांनी म्हटले आहे. या संशोधनामुळे स्त्री- पुरूषांच्या मेंदूच्या जडणझडणीतील मूलभूत फरकही शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आल्याचे ते म्हणाले. वास घेण्याच्या मानवातील लैंगिक फरक एक महत्त्वाची भूमिका बजावतो, हेही या संशोधनातून सिद्ध झाल्याचे ते म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा