बुलावायो स्पोर्ट्स क्लब येथे गुरुवारी खेळल्या गेलेल्या T20 मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानचा 2 गडी राखून पराभव केला. या विजयानंतरही झिम्बाब्वेला २-१ ने मालिका गमवावी लागली. या मालिकेपूर्वी पाकिस्तानने दोन्ही सामने जिंकले होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकात 7 गडी गमावून 132 धावा केल्या. झिम्बाब्वेने 133 धावांचे लक्ष्य 8 विकेट गमावून पूर्ण केले.
पाकिस्तानचा कर्णधार आगा सलमानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. साहिबजादा फरहान आणि ओमेर युसूफ यांनी डावाला सुरुवात केली मात्र 4 धावा जोडल्यानंतर झिम्बाब्वेने पहिला धक्का दिला. चौकार मारूनच फरहान पॅव्हेलियनमध्ये परतला. ओमेरला खातेही उघडता आले नाही आणि तो मुझाराबानीच्या चेंडूवर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. मुझाराबानीने त्याच्या पुढच्याच षटकात आणखी एक यश मिळवले आणि पाकिस्तानची धावसंख्या 3 बाद 19 धावांवर आणली. यानंतर कर्णधार आगा सलमानने तय्यब ताहिरसह संघाला 50 च्या पुढे नेले.
133 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. या दोघांनी 3.1 षटकात संघाची धावसंख्या 40 पर्यंत नेली. चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मारुमणी बाद झाला. ब्रायन बेनेट 10व्या षटकात 43 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर झिम्बाब्वेची फलंदाजी गडगडली पण लक्ष्य इतके कमी होते की शेपटीच्या फलंदाजांनी मिळून संघाला 133 धावांपर्यंत मजल मारली.