WTC Final : रविचंद्रन अश्विनला संधी न देणं ही रोहित शर्माची चूक ठरेल का?

गुरूवार, 8 जून 2023 (19:26 IST)
ANI
रविचंद्रन अश्विन इंग्लंड दौऱ्यावर असताना पहिल्याच दिवशी एक किस्सा घडला.
 
31 मे चा तो दिवस होता. भारताचा संघ लंडनपासून सुमारे दोन तासांच्या अंतरावर असलेल्या अरुंडेल मध्ये सराव सत्रासाठी गेला होता. मी ही त्या ठिकाणी पोहोचलो.
 
सुरुवातीला अश्विनसोबत औपचारिक गप्पा झाल्या आणि मी ही माझ्या कामात गुंतून गेलो.
 
काही तासांनंतर अश्विन माझ्याकडे आला आणि कुतुहलाने मला विचारलं की तुम्ही आदल्या दिवशी ओव्हलच्या मैदानावर गेला होता का? आणि तिथली खेळपट्टी पाहिली होती का?
 
अचानक प्रश्न विचारल्यामुळे काय उत्तर द्यावं मला समजलंच नाही. कारण मी ओव्हलच्या मैदानावर गेलो तर होतो पण तिथल्या अधिकाऱ्यांनी मला खेळपट्टीवर जाऊ दिलं नव्हतं.
 
मी अश्विनला म्हणालो की मी खेळपट्टी तर पाहिली नाही, पण ती चांगलीच असावी.
 
यावर अश्विन म्हणाला की, "खेळपट्टी कशीही असो, प्रत्येक गोलंदाजाला त्याप्रमाणे जुळवून घ्यावं लागतं."
 
तो संवाद अगदीच अनौपचारिक होता.
 
पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाच्या गोलंदाजांची कामगिरी निराशाजनक होती. यानंतर माझ्या मनात अश्विनसोबतची ती भेट घोळू लागली.
 
प्लेइंग इलेव्हनमध्ये अश्विन नाही
असं खूप क्वचित घडतं की क्रिकेट विश्वातील तज्ज्ञ आणि क्रिकेटचे चाहते भारतीय संघाच्या एखाद्या निर्णयावर पूर्णपणे सहमत असतात.
 
प्लेइंग इलेव्हनमध्ये अश्विन नसणं हा देखील तसाच एक निर्णय आहे. त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश व्हायला हवा होता, यावर सर्वांचंच एकमत आहे.
 
रिकी पाँटिंग असो की नासिर हुसेन.. या माजी क्रिकेट कर्णधारांनीही या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलंय. तर संजय मांजरेकरांनाही या निर्णयाने गोंधळात टाकलंय.
 
खेळाच्या पहिल्याच दिवशी मी किमान डझनभर प्रेक्षकांना भेटलो. यातील प्रत्येकजण अश्विनच्या सहभागी न होण्यावर हळहळत होता. खेळपट्टी आणि हवामानासारखी कारणं देऊन भारतीय संघ कसोटी क्रमवारीत जगातील अव्वल क्रमांकाच्या गोलंदाजाला बाहेर कसं बसवू शकतं? असा सगळ्यांचाच प्रश्न होता.
 
पण, भारतीय संघाच्या या सर्वोत्तम गोलंदाजाला अशा निर्णयांना सामोरे जाण्याची आता सवय झाली आहे.
 
2021 च्या इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली चार सामन्यांदरम्यान एकाही सामन्यात अश्विनला खेळवलं नाही.
 
भारतीय संघाच्या या निर्णयावर माजी दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न ही जाहीरपणे संतापला होता.
 
अश्विनची आजवरची कामगिरी
आतापर्यंतच्या 92 कसोटी सामन्यांमध्ये 2.76 च्या सरासरीने धावा लढत 474 बळी घेतले.
113 एकदिवसीय सामन्यांमध्ये 4.9 च्या सरासरीने 151 बळी घेतले.
कसोटी क्रमवारीत जगातील पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज.
आत्तापर्यंत सर्वात जलद 250, 300 आणि 350 बळी घेणारा खेळाडू.
सर्वाधिक वेळा प्लेअर ऑफ द मॅचचा किताब जिंकणारा जगातील दुसरा खेळाडू.
अश्विनचं मानांकन
भारतीय क्रिकेटमध्ये संघाचे प्रशिक्षक बदलले आणि कर्णधारही बदलला, पण अश्विनच्या कसोटीतील क्रमवारीत काही बदल झाला नाही. बाहेरच्या देशांमध्ये त्याच्यासोबत घडणाऱ्या गोष्टींमध्येही काही बदल झाला नाही.
 
क्रिकेटच्या विश्वात भारताला फलंदाजांची पंढरी असं म्हटलं जातं. म्हणजे इथे कोहली, रोहित आणि शुभमन गिल सारख्या खेळाडूंना सुपरस्टारचा दर्जा मिळतो.
 
पण 92 कसोटी सामन्यांमध्ये 51 च्या स्ट्राईक रेटने एकूण 474 बळी घेणारा आणि प्रति षटक तीनपेक्षा कमी धावा देत गोलंदाजी करणारा अश्विन अजूनही ड्रेसिंग रूममध्ये दिसत नाही.
 
मग प्रश्न पडतो की, आयसीसीच्या क्रमवारीचा काहीच फायदा नाही का?
 
म्हणजे जगात असा कोणता खेळ आहे ज्यात नंबर वन असलेल्या खेळाडूला त्याच्याच संघात स्थान मिळत नाही?
 
जर भारतीय संघाने हा सामना जिंकला नाही तर मात्र अश्विनबाबत घेतलेला हा निर्णय पुढची अनेक वर्षे राहुल द्रविड आणि रोहित शर्माला त्रास देत राहील.
 
कदाचित त्यांच्या या निर्णयाची तुलना 2003 च्या विश्वचषकाशी केली जाऊ शकते. त्या विश्वचषकावेळी व्ही व्ही एस लक्ष्मण सारख्या फलंदाजाला बाजूला करून दिनेश मोंगिया सारख्या खेळाडूला संघात घेतलं होतं.
 
जॉन राईटने आपल्या आत्मचरित्रात कबूल केलंय की, मला आजही या निर्णयाचा पश्चाताप होतो.
 
सौरव गांगुलीने एकदा माझ्याशी खासगीत बोलताना सांगितलं होतं की, त्याच्या या निर्णयामुळे लक्ष्मण कित्येक महिने त्याच्यावर नाराज होता.
 
पण अश्विन कदाचित रोहित आणि द्रविडवर अशा प्रकारे नाराज होणार नाही, कारण त्याचं या दोघांशी असलेलं नातं जास्त चांगलं आहे.
 
खूप दूर जाण्याची गरज नाही. मागच्या वर्षीचा टी20 विश्वचषक आठवत असेल तर यात प्रशिक्षक आणि कर्णधाराच्या भक्कम पाठिंब्यामुळे अश्विनचं पुनरागमन झालं होतं.
 
फिरकीपटूच्या भूमिकेत अश्विन
इथे आणखीन एक महत्वाचा प्रश्न पडतो तो म्हणजे, भारतीय संघाला जर एकच फिरकीपटू हवा असेल तर रवींद्र जडेजापेक्षा अश्विन चांगला फिरकीपटू नाहीये का?
 
देशात खेळल्या गेलेल्या सामन्यांची आकडेवारी पाहा किंवा आंतरराष्ट्रीय सामन्यांची आकडेवारी पाहा, दोन्ही ठिकाणी तुम्हाला गोलंदाज म्हणून अश्विनची कामगिरी चांगलीच दिसेल.
 
आणि जर तुम्हाला आठवत नसेल तर दोन वर्षांपूर्वी न्यूझीलंडविरुद्ध साउथहॅम्प्टन इथं पार पडलेली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची पहिली फायनल आठवा.
 
त्या सामन्यातील केवळ एका सत्रातच नाही तर संपूर्ण सामन्यात गोलंदाज म्हणून आश्विनने आपला दबदबा राखला होता. अश्विनने त्या सामन्यातही आपली योग्यता दाखवून दिली होती.
 
पहिल्या डावात त्याने 15 षटकात केवळ 28 धावा देऊन दोन विकेट्स घेतल्या, तर दुसऱ्या डावात त्याने 10 षटकात केवळ 17 धावा देऊन दोन विकेट्स घेण्याची कमाल केली होती.
 
त्या सामन्यात जडेजाही मैदानात होता मात्र त्याची म्हणावी तशी कामगिरी नव्हती.
 
कोहली चालतो मग अश्विन का नाही?
कोहलीने त्याच्या तीन वर्षाच्या कारकिर्दीत एकही शतक झळकवलं नसताना त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान होतं. त्याला बाहेर बसवण्याची साधी कल्पनाही कोणी करणार नाही.
 
मग अनेक विक्रम नावावर करणाऱ्या अश्विनसारख्या गोलंदाजाला त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत अशी वागणूक का द्यावी? त्याच्यावर कोणीच काही बोलत का नाही?
 
कारण क्रिकेटमध्ये कदाचित आजही फलंदाजांबाबत पक्षपाती दृष्टीकोन ठेवला जातो.
 
देशासाठी हजारो धावा करणाऱ्या फलंदाजांना ते बाऊन्सी खेळपट्ट्यांवर किंवा उपयुक्त खेळपट्ट्यांवर सीम-स्विंगशी जुळवून घेऊ शकत नाहीत, असा युक्तिवाद करून संघाबाहेर बसवलं जात नाही.
 
ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे असं मानलं जातं. जर खेळाडू अपयशी ठरला तर तो खेळाचाच एक भाग म्हणून सहज स्वीकारलं जातं. पण मग गोलंदाजांसाठी ही भूमिका का घेतली जात नाही.
 
आता एखादा असा तर्क देईल की, कोणत्याही प्लेइंग इलेव्हनमध्ये सहा फलंदाज असतात तर गोलंदाजांची संख्या फक्त चार असते. पण ओव्हल टेस्टनुसार हा तर्क ही स्विकारण्याजोगा नाही.
 
म्हणजे जर तुम्ही उमेश यादवला किंवा शार्दुल ठाकूरला विचारलं की,
 
प्लेइंग इलेव्हनमध्ये अश्विनच्या आधी तुम्हाला स्थान मिळणार का? यावर एक प्रामाणिक क्रिकेटपटू या नात्याने ते मान्य करतील की आमच्याआधी अश्विनला स्थान मिळालं पाहिजे.
Published By -Smita Joshi 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती