WTC Final : भारतीय क्रिकेट संघासमोरचं नवं मिशन काय?

बुधवार, 31 मे 2023 (19:53 IST)
दोन महिने आयपीएल स्पर्धेत खेळल्यानंतर भारतीय संघातील खेळाडू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी इंग्लंडला रवाना झाले आहेत.7 जून पासून लंडनमधल्या ओव्हल इथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात हा मुकाबला होणार आहे.
 
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप म्हणजे काय?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप म्हणजे टेस्ट प्रकाराचा वर्ल्डकप. टेस्ट अर्थात कसोटी प्रकाराची लोकप्रियता कमी होत असल्याचं लक्षात आल्यानंतर आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आयोजित करायला सुरुवात केली आहे. दोन वर्षांदरम्यान ही चॅम्पियनशिप आयोजित केली जाते.
 
चॅम्पियनशिप अंतर्गत ग्राह्य धरण्यात येणाऱ्या मालिकांमध्ये विजय मिळवला तर संघांना गुण मिळतात. सामना अनिर्णित राहला तर गुण विभागून दिले जातात.
 
गुणांची बेरीज आणि जिंकण्याची टक्केवारी यावर चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये कोण खेळणार ते स्पष्ट होतं. यंदाच्या चॅम्पियनशिप फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने असणार आहेत.
 
चॅम्पियनशिपचा इतिहास काय?
2019-2021 या कालावधीत झालेल्या पहिल्यावहिल्या टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंड एकमेकांसमोर उभे ठाकले होते. न्यूझीलंडने फायनलमध्ये भारतावर विजय मिळवत जेतेपदाला गवसणी घातली होती.
 
भारतीय संघाचा फायनलपर्यंतची वाटचाल
भारतीय संघाने इंग्लंडच्या दौऱ्यात 5 सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी केली. न्यूझीलंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. 2 सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 असा विजय मिळवला. यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर रवाना झाला.
 
3 सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने भारतावर 2-1 असा विजय मिळवला. श्रीलंका संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. भारतीय संघाने 2 सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यश मिळवलं. भारतीय संघाने बांगलादेशचा दौरा केला.
 
2 सामन्यांच्या मालिकेत भारताने निर्भेळ यश साजरं केलं. यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला. 4 सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-1 असा विजय मिळवत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये धडक मारली.
 
भारतीय संघ
रोहित शर्माकडे भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा आहे.
 
के.एस.भरत आणि इशान किशन हे दोन विकेटकीपर फलंदाज संघात आहेत. रोहित शर्मा आणि शुबमन गिल ही सलामीची जोडी असेल.
 
विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे हे अनुभवी शिलेदार भारतीय फलंदाजीचा कणा आहेत.
 
रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल या त्रिकुटावर फिरकीची जबाबदारी असेल.
 
मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकत आणि शार्दूल ठाकूर यांच्यापैकी तिघे अंतिम संघात असतील.
 
आयपीएलमध्ये झंझावाती फॉर्मात असलेले यशस्वी जैस्वाल आणि सूर्यकुमार यादव यांच्यासह वेगवान गोलंदाज मुकेश कुमार राखीव खेळाडू आहेत.
 
विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत, श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह हे तिघेही दुखापतीमुळे या लढतीत खेळू शकणार नाहीत.
 
ऑस्ट्रेलियाचा संघ
वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सकडे ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्वाची धुरा आहे.
 
डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा हे ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर असतील. मार्कस हॅरीस राखीव सलामीवीर असेल. स्टीव्हन स्मिथ आणि मार्नस लबूशेन या जोडगोळीकडून ऑस्ट्रेलियाला मोठ्या अपेक्षा आहेत.
 
ट्रॅव्हिस हेड आणि कॅमेरुन ग्रीन ही अष्टपैलू जोडी ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वाची आहे. अॅलेक्स कॅरे आणि जोश इंग्लिस हे विकेटकीपर फलंदाज आहेत.
 
अनुभवी फिरकीपटू नॅथन लॉयन आणि टॉड मर्फी फिरकीचं आक्रमण सांभाळतील. मिचेल स्टार्क, कमिन्ससह जोश हेझलवूड आणि स्कॉट बोलँड ही चौकडी ऑस्ट्रेलियाचा वेगवान मारा असेल.
 
आयसीसी स्पर्धांमध्ये दोन्ही संघांची कामगिरी
कपिल देव यांच्या नेतृत्वातील भारतीय संघाने 1983 साली वर्ल्डकप जिंकला. यानंतर तब्बल 28 वर्षांनंतर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने वनडे वर्ल्डकपवर नाव कोरलं होतं.
 
2007 मध्ये झालेल्या पहिल्यावहिल्या ट्वेन्टी20 वर्ल्डकप स्पर्धेत धोनीच्याच नेतृत्वात भारतीय संघाने जेतेपदाला गवसणी घातली होती.
 
2002 मध्ये चॅम्पियन्स लीग स्पर्धेत भारत आणि श्रीलंका संघ संयुक्त विजेते ठरले होते. 2013 मध्ये धोनीच्या नेतृत्वातील भारतीय संघाने जेतेपदाची कमाई केली होती. यानंतर 10 वर्ष भारतीय संघाला आयसीसी स्पर्धांच्या जेतेपदावर नाव कोरता आलेलं नाही.
ऑस्ट्रेलियाने 1987, 1999, 2003, 2007 अशी वनडे वर्ल्डकपवर नाव कोरलं होतं. 2015 मध्येही ऑस्ट्रेलियाचा संघ अजिंक्य ठरला होता.
 
ऑस्ट्रेलियाने 2021 मध्ये ट्वेन्टी20 वर्ल्डकपच्या जेतेपदावर कब्जा केला होता. ऑस्ट्रेलियाने 2006 आणि 2009 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या जेतेपदाची कमाई केली होती.

Published By- Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती