विराट कोहलीचं 3 वर्षांनंतर वनडे क्रिकेटमध्ये शतक

शनिवार, 10 डिसेंबर 2022 (23:31 IST)
बांगलादेशमध्ये खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या वनडेमध्ये भारतीय संघानं अनेक विक्रम केले आहेत.
भारताकडून ईशान किशननं 126 चेंडूत द्विशतक झळकावलं. वनडे क्रिकेटच्या इतिहासातील हे सर्वांत वेगवान द्विशतक आहे. तो 131 चेंडूत 210 धावा करून बाद झाला.
त्याचवेळी विराट कोहलीनं या सामन्यात 44वं वनडे शतकही झळकावलं आहे. विराटने तीन वर्षांनंतर वनडे क्रिकेटमध्ये शतक झळकावलं आहे.या खेळीत त्यानं11 चौकार आणि 1 षटकार मारला आहे.
 
खरं तर काही दिवसांपूर्वी तीन वर्षांचा आंतरराष्ट्रीय शतकाचा दुष्काळ विराट कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध आशिया चषकात संपवला.
 
पण, विराट कोहलीने नैराश्याच्या उंबरठ्यावरून कशी घेतली भरारी? त्याची ही गोष्ट.
मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड. लाखभर चाहत्यांची साथ. ट्वेन्टी20 वर्ल्डकप आणि समोर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान. अशा दडपणाच्या स्थितीत विराट कोहलीने कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी साकारत भारताला शानदार विजय मिळवून दिला.
अवघ्या महिनाभरापूर्वी कोहली ट्वेन्टी20 संघात फिट बसतो का? अशी चर्चा होती. सलग तीन वर्ष कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावता आलं नव्हतं. फॉर्मसाठी झगडणाऱ्या कोहलीने 'फेक इंटेन्सिटी' दाखवल्याचं स्वत:च म्हटलं होतं. संघाचं कर्णधारपद सोडण्यावरून कोहली आणि बीसीसीआय यांच्यात बेबनाव असल्याचं स्पष्ट झालं होतं.
 
सततच्या खेळण्यामुळे दमलेल्या कोहलीने विश्रांतीचा निर्णय घेतला. 2008 पासून सातत्याने टेस्ट, वनडे, ट्वेन्टी20 तसंच आयपीएल खेळणाऱ्या कोहलीने पहिल्यांदाच महिनाभर बॅटला हातदेखील लावला नाही.
 
आशिया चषक स्पर्धेत कोहलीने पुनरागमन केलं. अफगाणिस्तानविरुद्ध तडाखेबंद शतकी खेळी करत कोहलीने शतकांचा दुष्काळ संपवला. परंतु रविवारी पाकिस्तानविरुद्ध वर्ल्डकपच्या महत्त्वपूर्ण लढतीत फिटनेस, सातत्य, खेळाचं चपखल आकलन या सर्व आघाड्यांवर स्वत:ला नव्याने सिद्ध करत कोहलीने अफलातून खेळी साकारली.
 
स्वत:च्या क्षमतेविषयी साशंकता वाटणाऱ्या स्थितीतून कोहलीने ट्वेन्टी20 प्रकारातली सार्वकालीन महान अशी खेळी साकारली. याखेळीच्या निमित्ताने कोहलीने अडथळ्यांवर मात करत इथपर्यंत कशी वाटचाल केली आहे.
 
भारतीय संघाचा इंग्लंड दौरा. वर्ष होतं 2014. टेस्ट क्रिकेटमध्ये विराट कोहली हे नाव चमकू लागलं होतं. संघात चौथा क्रमांक त्याने आपलासा केला होता. कामगिरीत सातत्य आणि फिटनेस या दोन्ही आघाड्यांवर त्याची आगेकूच सुरू होती. त्या इंग्लंड दौऱ्यात संघातील मुख्य फलंदाज म्हणून कोहलीकडून अपेक्षा होत्या पण घडलं भलतंच.
 
कारकीर्दीत पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये टेस्ट खेळणाऱ्या कोहलीची दाणादाण उडाली. ढगाळ वातावरण, स्विंगला पोषक खेळपट्ट्या आणि समोर जेम्स अँडरसन नावाचा अनुभवी गोलंदाज. अँडरसनच्या आऊटस्विंगर्सनी कोहलीला अक्षरक्ष: मामा बनवलं. अँडरसन यायचा आणि कोहलीची विकेट घेऊन जायचा. तंत्रकौशल्यात पारंगत हाच का तो असं वाटू लागलं.
 
दौरा सुरू व्हायच्या आधी कोहली म्हणजे भारतीय क्रिकेटमधलं नेक्स्ट बिग थिंग मानलं गेला होता. प्रत्यक्षात अँडरसनसमोरची त्याची त्रेधातिरपीट पाहून इंग्लंडमधल्या प्रसारमाध्यमांनी जोरदार टीका केली.
 
घरच्या मैदानावर सगळेच शेर असतात, परदेशात जाऊन दर्जेदार गोलंदाजांसमोर, जिवंत खेळपट्यांवर खेळतो तो खरा महान फलंदाज असं सगळं ऐकवण्यात आलं. त्या दौऱ्यातल्या 5 टेस्टमध्ये मिळून कोहलीची कामगिरी होती- 1, 8, 25, 0, 39, 28, 0, 7, 6, 20.
 
सोनं भट्टीतून तावून सुलाखून निघाल्यावर झळाळतं असं म्हणतात. कोहलीच्या जागी दुसरा कोणी लेचापेचा असता तर खचून गेला असता पण कोहलीने मायदेशात परतल्यावर सगळी कौशल्यं परजून घेतली. सार्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा सल्ला घेतला. स्वत:च्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अनेक तास सराव केला. या काळात कोहलीने यथेच्छ टीकेचा सामना केला.
 
इंग्लंड दौऱ्याच्या कटू आठवणी बाजूला सारत कोहली ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला. ऑगस्ट ते डिसेंबर या चार महिन्यातल्या अथक प्रयत्नांनी किमया केली.
 
कोहलीने ऑस्ट्रेलियात जाऊन अॅडलेड इथे झालेल्या पहिल्याच टेस्टमध्ये दोन्ही डावात शतक झळकावलं.
 
इंग्लंडमध्ये अँडरसनला शरण गेलेल्या कोहलीचा ऑस्ट्रेलियातल्या वेगवान खेळपट्यांवर आणि खणखणीत आक्रमणासमोर निभाव लागेल का अशा शंका व्यक्त केल्या जात होत्या.
 
कोहलीने त्या दौऱ्यात मेलबर्न आणि सिडनी या टेस्टमध्येही शतक झळकावत टीकाकारांना बॅटने चोख प्रत्युत्तर दिलं. इंग्लंड दौरा आणि परतल्यानंतरचा काळ हा कारकीर्दीतल सगळ्यात कठीण कालखंड असल्याचं कोहलीने मध्यंतरी मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं.
 
या काळात नैराश्याचाही सामना केल्याचं कोहली म्हणाला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची क्षमता आहे का असे विचारही मनात आल्याचं कोहलीने स्पष्ट केलं होतं.
 
इंग्लंड ते ऑस्ट्रेलिया व्हाया भारत या काळात कोहलीने चुका सुधारण्यासाठी अविरत मेहनत घेतली. प्रेक्षक, चाहते, माजी खेळाडू, तज्ज्ञ, समालोचक काय म्हणतात त्याकडे लक्ष न देता स्वत:च्या तंत्रकौशल्यावर काम केलं. शारीरिकदृष्ट्या फिट तर तो होताच पण मानसिकदृष्ट्या कणखर असल्याचं त्याने सिद्ध केलं.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या अद्भुत प्रदर्शनानंतर कोहलीने मागे वळून पाहिलंच नाही. वनडे आणि ट्वेन्टी20 क्रिकेटमध्ये धावांची टांकसाळ उघडणाऱ्या कोहलीने आधुनिक काळाचा शिलेदार असूनही टेस्ट मॅच खेळण्याला प्राधान्य दिलं.
 
टेस्ट मॅचमध्ये तुमच्या गुणकौशल्यांची, मानसिकतेची, शारीरिक क्षमतांची परीक्षा पाहिली जाते असं कोहली वारंवार सांगतो. भारतासाठी टेस्ट मॅच खेळणं हा गौरव असल्याची भावना त्याने अनेकदा व्यक्त केली आहे.
 
म्हणूनच भारतासाठी टेस्ट पदार्पण केल्यानंतर दशकभरात कोहली 100वी टेस्ट खेळतो आहे.
 
भारतीय संघ सतत खेळत असतो. टेस्टच्या बरोबरीने वनडे, ट्वेन्टी20, आयपीएल खेळणाऱ्या कोहलीचा प्रदीर्घ काळ प्रवास, सराव, सक्तीचं क्वारंटीन यामध्येही गेला आहे. भारतीय संघ 365 पैकी 330 दिवस कुठे ना कुठे खेळतच असतो.
 
संघातील मुख्य फलंदाज आणि कर्णधार यामुळे कोहलीवर जबाबदारी असते. पण अद्भुत फिटनेस आणि कमाल सातत्य यामुळे कोहली दशकभरातच 100 टेस्ट खेळण्याचा पराक्रम नावावर करत आहे.
हा विक्रम करणारा तो केवळ 12वा भारतीय खेळाडू आहे यातच या विक्रमाचं दुर्मीळत्व सिद्ध होतं. भारतासाठी 100 टेस्ट खेळणाऱ्या सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग, सुनील गावस्कर, कपिल देव, दिलीप वेंगसरकर, अनिल कुंबळे, इशांत शर्मा, हरभजन सिंग या दिग्गजांच्या मांदियाळीत आता विराट कोहलीचं नाव समाविष्ट होत आहे.
 
कोहलीच्या पदार्पणाच्या कसोटीत राहुल द्रविड संघात होता. कोहलीच्या 100व्या कसोटीवेळी ते संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी आहेत.
 
20 ते 24 जून 2011 या कालावधीत किंग्स्टन इथे झालेल्या टेस्टमध्ये कोहलीच्या बरोबरीने फलंदाज अभिनव मुकुंद आणि गोलंदाज प्रवीण कुमार यांनीही पदार्पण केलं होतं.
 
अभिनव भारतासाठी फक्त 7 तर प्रवीण फक्त 6 टेस्ट खेळू शकला. कोहलीने मात्र बॅटने नवा इतिहास रचत भारतीय संघाला यशोशिखरावर नेलं.
 
2008 मध्ये कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने U19 विश्वचषक जिंकला होता. युवा संघ ते वरिष्ठ संघ हे संक्रमण यशस्वी पद्धतीने साकारणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये कोहलीचा समावेश होतो.
 
धावांची अविरत टांकसाळ
कोहलीच्या या शंभरीपर्यंतच्या प्रवासाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याने देशाबाहेर धावा केल्या. घरी शेर, बाहेर शेळी असं त्याचं कधीही झालं नाही. कोहली आणि ऑस्ट्रेलियाचं लव्ह अफेअर याबद्दल तुम्ही इथे वाचू शकता.
 
दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका- प्रत्येक ठिकाणी खेळपट्यांचा नूर वेगळा. प्रतिस्पर्ध्यांच्या घरच्या मैदानात खेळत असल्याने त्यांचे गोलंदाज सरसावून असत.
 
कोहलीने सर्वोत्तमांविरुद्ध धावा केल्या. अनेक भलाभल्या फलंदाजांची सरासरी परदेशात गेल्यावर ढेपाळते. कोहली तिथे वेगळा ठरतो. भारतात 62च्या सरासरीने धावा चोपणारा कोहली परदेशातही 44च्या सरासरीने धावा करतो हे महत्त्वाचं.
कोहलीने अधिकारवाणीने धावा केल्या. तो खेळपट्टीवर आल्यानंतर मोठी खेळी करणार असा विश्वास संघाला वाटतो. कोहली सहजी विकेट टाकणार नाही याची प्रतिस्पर्ध्यांना खात्री असते.
 
वेगवान गोलंदाजी आणि फिरकी अशा दोन्ही आक्रमणांना कोहली लीलया सामोरा जातो.
 
खेळपट्टीचा अंदाज घेत डावाला सुरुवात करतो. एकेरी-दुहेरी धावांचा पुरेसा रतीब घालून झाल्यानंतर कोहली चौकारांची पोतडी उघडतो. यांत्रिक वाटावं पण तरीही कलात्मकतेने तो धावा करत जातो. भागीदाऱ्या रचण्यात कोहली निपुण आहे. पायाला स्प्रिंग लावल्यागत पळणाऱ्या कोहलीला पाहणं हा नेत्रसुखद अनुभव असतो.
 
दर्जेदार गोलंदाजी आक्रमण असो, जिवंत खेळपट्या असो, बोचरे वारे असोत, लिटरवारी घाम काढणारा उकाडा असो- कोहली व्रत करावं त्या श्रद्धेने धावा करत राहिला. त्याची विकेट मिळवणं प्रतिस्पर्धी संघाचं मुख्य उद्दिष्ट होऊ लागलं.
 
कोहलीने तिशीचा टप्पा पार केला की तो शतकाकडे कूच करू लागला असं म्हटलं जाऊ लागलं इतकं त्याच्या कामगिरीत सातत्य होतं.
 
शंभरीपर्यंतच्या या प्रवासात कोहलीला एकदाही संघातून वगळण्यात आलेलं नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर कामगिरीतील सातत्यामुळे कोहलीला संघातून काढण्याचा कधी प्रश्नच उद्भवला नाही.
 
कर्णधार कोहली
फलंदाजीचं काम झाल्यावर नेतृत्वाच्या जबाबदारीत कोहली स्वत:ला झोकून देत असे. मॅच वाचवण्यासाठी खेळण्यापेक्षा जिंकण्यासाठी खेळण्याची मानसिकता कोहलीने रुजवली.
 
पाच दिवस समान क्षमतेने खेळणारे भिडू तयार केले. यासाठी फिटनेसचा दर्जा उंचावला. टेस्ट मॅच जिंकायची असेल तर 20 विकेट्स पटकावणारे गोलंदाज महत्त्वाचे असतात.
कोहली कर्णधार झाल्यापासून त्याने 5 गोलंदाजांसह खेळण्यावर भर दिला. 5 फलंदाज, यष्टीरक्षक फलंदाज, 5 गोलंदाज असं संघाचं प्रारुप त्याने तयार केलं.
 
गोलंदाजीत-क्षेत्ररक्षणात बदल करणं, विशिष्ट फलंदाजासाठी खास सापळा रचणं, आक्रमक खेळाडूंना बोलंदाजी करून हैराण करणं अशी सगळं कामं कोहलीच्या धमन्यांमध्ये जाऊन बसली.
 
अफलातून अशा फिटनेसमुळे झेल टिपणं आणि धावा वाचवणं या दोन्हीतही कोहलीचं मोलाचं योगदान असतं.
 
परदेशात टेस्ट मॅच तसंच टेस्ट सीरिज जिंकणं हे कोणत्याही संघासाठी मोठं आव्हान असतं. कोहलीने हे आव्हान पेललं. कोहलीच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियात मालिका विजयाचा पराक्रम साजरा केला.
 
कोहलीच्या नेतृत्वातच भारतीय संघाने आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली.
 
फॅब फोरचा मानकरी
साधारण एकाच वयाचे आणि कारकीर्दीत साधारण एकाच कालखंडात भारतासाठी विराट कोहली, न्यूझीलंडसाठी केन विल्यमसन, ऑस्ट्रेलियासाठी स्टीव्हन स्मिथ आणि इंग्लंडसाठी जो रूट खेळू लागले. चौघांचीही शैली भिन्न. पण चौघांमधील साम्यस्थळ म्हणजे सगळे धावांचा रतीब घालतात. अल्पावधीतच हे चौघेही आपापल्या संघांचे मुख्य फलंदाज आणि नंतर कर्णधारही झाले.
 
या चौघांनी बॅटच्या माध्यमातून संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. नवनवे विक्रम रचले. या चौकडीला फॅब फोर असं म्हटलं जाऊ लागलं.
 
जो रूटने कारकीर्दीत 100 टेस्टचा टप्पा पार केला. इंग्लंडचा कर्णधार म्हणूनही नाव कमावलं. पण रूट वनडे, ट्वेन्टी20 मर्यादित प्रमाणित खेळतो. आयपीएल खेळत नाही त्यामुळे रूट टेस्टपुरताच राहिला. बॉल कुरतडल्याप्रकरणी बंदीमुळे स्मिथच्या कारकीर्दीला बट्टा लागला.
देखण्या फलंदाजीसाठी आणि आदर्शवत वागण्यासाठी क्रिकेटविश्व केनचा आदर करतं. पण न्यूझीलंडचा संघ एकूणातच कमी क्रिकेट खेळतो त्यामुळे केन टेस्ट मॅचच्या शंभरीपासून अजून दूर आहे.
 
या चौघांचा खेळ अनुभवणं ही पर्वणी असते. या चौघांमध्ये सर्वाधिक टेस्ट रूटने खेळल्या आहेत. धावांच्या बाबतीतही रूट चौघांमध्ये आघाडीवर आहे. सरासरीच्या बाबतीत स्मिथ अग्रणी आहे. शतकांच्या बाबतीत कोहली-स्मिथ प्रत्येकी 27 शतकासह बरोबरीत आहेत.
 
वडिलांचं छत्र हरपलं पण तो खेळायला परतला
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात. कोहलीच्या मानसिक कणखरतेची प्रचिती 2006 मध्येच आली होती. कोहली दिल्ली संघाचा भाग होता. दिल्ली वि. कर्नाटक लढत सुरू होती.
 
कोहलीचं वय होतं 17. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा विराट कोहली आणि पुनीत बिश्त नाबाद होते. त्याच रात्री कोहलीचे बाबा प्रेम कोहली यांना ब्रेनस्ट्रोक झाला. रात्रीच ते गेले. अवघ्या काही तासात विराटचं पितृछत्र हरपलं.
विराटच्या क्रिकेट प्रवासात वडिलांचं योगदान मोलाचं होतं. हा धक्का पचवणं खूपच कठीण होतं. वडील अचानक गेलेले, मॅचमध्ये तो नाबाद, घरी नातेवाईक येत होते.
 
विराटने सकाळी उठल्यावर मॅचला जाण्याचा निर्णय घेतला. चेतन शर्मा दिल्लीचे प्रशिक्षक होते. मिथुन मन्हास कर्णधार होता. दोघांनाही कोहलीला घरी जावं असं सुचवलं.
 
कोहली मॅच खेळण्यावर ठाम होता. विराटने 90 धावांची खेळी केली. विराटच्या अतुलनीय धैर्य आणि कर्तव्याप्रती निष्ठेचं कर्नाटकचा तत्कालीन कर्णधार येरे गौड आणि सहकाऱ्यांनी कौतुक केलं.
 
मॅचचा तिसरा दिवस संपला आणि कोहली वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी रवाना झाला. 17व्या वर्षी वडील गेल्यामुळे कोहली आणि त्याच्या भावावर जबाबदारी आली.
 
कर्णधारपदाच्या काटेरी मुकुटासह धावा
 
अनेक मोठे फलंदाज कर्णधारपद मिळाल्यानंतर कोशात जातात. कोहलीच्या बाबतीत उलट झालं आहे. 100पैकी 68 सामन्यात कोहलीने कर्णधार आणि मुख्य फलंदाज अशी दुहेरी जबाबदारी सांभाळली आहे.
 
कर्णधार म्हणून खेळताना कोहलीची कामगिरी विस्मयचकित करणारी आहे. 68 सामन्यात कोहलीने 54.80च्या सरासरीने 5864 धावा केल्या आहेत. कर्णधाराने संघासमोर उदाहरण ठेवायचं असतं. स्वत: उत्तम खेळ करत कोहली सहकाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
 
सचिनशी तुलना
धावा करण्यातलं सातत्य आणि धावा करण्याची भूक यामुळे विराटची सातत्याने सचिन तेंडुलकरशी करण्यात आली. तेंडुलकरसारख्या दिग्गज खेळाडूशी तुलना होणं हा मोठा सन्मान आहे पण त्याचवेळी दडपण वाढवणारे आहे.
सातत्याने सचिनशी तुलना होत असतानाही कोहलीने त्याचं दडपण न घेता धावा करण्यावर भर दिला. कोहली सचिनचे विक्रम मोडेल, तो पुढचा सचिन आहे अशाही चर्चा रंगत. कोहलीने सचिनकडून मार्गदर्शनही घेतलं आहे. 2011 विश्वचषक विजयानंतर कोहलीने सचिनबद्दल काढलेले गौरवोद्गराही गाजले होते.
 
शतकाची प्रतीक्षा
2019 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या कोलकाता इथे झालेल्या टेस्टमध्ये कोहलीने शतकी खेळी केली होती. त्यानंतर 2 वर्ष शतकापासून विराट दुरावला आहे. तो धावा करतो आहे पण शतकाचा टिळा माथी लागलेला नाही. ट्वेन्टी20 प्रकाराचं कर्णधारपद त्याने स्वत:हून सोडलं. वनडेतून त्याला कर्णधारपदावरून बाजूला करण्यात आलं.
 
नुकत्याच आटोपलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर कोहलीने टेस्ट प्रकाराचं कर्णधारपदही सोडलं आहे. कर्णधारपदाचा दबाव आता कोहलीवर नाही.
 
100व्या विक्रमी कसोटीत शतक झळकावण्याचा विक्रम हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्याच खेळाडूंच्या नावावर आहे. घरच्यांच्या साक्षीने शतकांचा दुष्काळ संपवण्याची नामी संधी कोहलीकडे आहे.
 
Published By- Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती