पहिल्या कसोटीतील चमकदार कामगिरीनंतर कसोटी मालिका गमावणाऱ्या श्रीलंका संघाला उद्याचा सामना जिंकून इतिहास घडविण्याची संधी आहे. त्याआधी त्यांना मायदेशात तीनही मालिका गमवाव्या लागल्या होत्या. पहिला सामना जिंकून त्यांनी सलग 12 एकदिवसीय सामन्यांतील पराभवाची मालिका खंडित केली होती. याआधी प्रभावी कामगिरी बजावणाऱ्या सुरंगा लकमलकडून दुसऱ्या सामन्यातही पाहुण्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. त्यातच अँजेलो मॅथ्यूजने गोलंदाजीतही चमक दाखविल्यामुळे आणि नुवान प्रदीपही प्रभावी ठरल्यामुळे श्रीलंकेला आश्चर्यकारक विजय मिळविता आला होता. मात्र भारतीय फलंदाजांनी किमान आव्हानात्मक धावसंख्या उभारल्यास श्रीलंकेच्या फलंदाजांवर मोठी जबाबदारी येऊन पडेल. ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर पोहोचलेला श्रीलंका संघ उद्या कशी कामगिरी करतो, याकडे समस्त क्रिकेटशौकिनांचे लक्ष लागले आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेचा दौरा तोंडावर आला असताना भारतीय संघाच्या क्षमतेची परीक्षाही उद्याच होणार आहे.