पाकिस्तानकडून निवडणूकीबाबत भाष्य ; रविशंकर प्रसाद यांच्याकडून टीका

मंगळवार, 12 डिसेंबर 2017 (09:21 IST)
गुजरातमधील विधानसभेच्या निवडणूकांबाबत पाकिस्तानकडून झालेले भाष्य पूर्णपणे अनावश्‍यक असल्याची टीका केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केली आहे. पाकिस्तानकडून झालेले हे भाष्य कॉंग्रेस पक्षाला सहाय्य करण्यासाठीच झाले असल्याचे दिसत आहे, भारतातील नागरिक आपल्या लोकशाही देशामध्ये स्वतःच्या बळावर निवडणूका लढवण्यास सक्षम आहेत. त्यामुळे भारतातील निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणात्याही बाह्य घटकांच्या हस्तक्षेपाला स्थानच नाही, असेही प्रसाद म्हणाले. पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्‍ते मोहम्मद फैजल यांनी केलेल्या ट्विटला उत्तर देताना प्रसाद बोलत होते.
 
“भारताने बेजबाबदार आणि बिनबुडाची कारस्थाने रचण्यापेक्षा पाकिस्तानला निवडणूकीच्या वादामध्ये ओढणे बंद करावे आणि स्वतःच्या बळावर निवडणूका जिंकाव्यात.’ असे फैजल यांनी ट्विटरवर म्हटले होते.
 
कॉंग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या घरी झालेल्या भोजनोत्तर बैठकीला पाकिस्तानचे उच्चायुक्‍त, पाकचे माजी विदेश मंत्री, भारताचे माजी उपराष्ट्रपती आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे उपस्थित होते, असा आरोप काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालनपूर येथील प्रचार सभेमध्ये बोलताना केला होता. या नेत्यांच्या बैठकीनंतर लगेच दुसऱ्या दिवशी मणिशंकर अय्यर यांनी “नीच’ असा शब्दप्रयोग केल्याचेही मोदींनी सांगितले.
 
मात्र मोदींच्या या वक्‍तव्यावर आक्षेप घेणारे निवेदन आज पाकिस्तानने प्रसिद्धीस दिले आणि पाकिस्तानला निवडणूकीच्या वादात ओढले जात असल्याची टीका केली. त्याला प्रसाद यांनी खरमरीत उत्तर दिले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती