सौदी अरबच्या दृक्श्राव्य माध्यम सर्वसामान्य आयोगाने चित्रपट गृहांना परवानगी देण्याबाबत संमती व्यक्त केली आहे. सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहंमद बिन सलमान यांच्या व्हिजन 2030 चा एक भाग म्हणून या निर्णयाकडे पाहिले जात आहे. केवळ तेल उत्पादनवर अवलंबून असणाऱ्या सौदीच्या अर्थव्यवस्थेत यामुळे विविधता येणार आहे. सौदीचे संस्कृती आणि माहिती मंत्री अव्वाद अल अव्वाद यांनी म्हटले आहे, की चित्रपटगृहांवरील बंदी उठविण्याच्या या निर्णयामुळे अर्थिक विकासाला चालना मिळेल. एक व्यापक सांस्कृतिक क्षेत्र तयार करून आम्ही नवीन रोजगार आणि प्रशिक्षणाच्या संधी निर्माण करू शकतो. या निर्णयामुळे सौदीमधील मनोरंजनाच्या विकल्पांनाही विविधता प्राप्त होणार आहे.