शिखर धवन : भारतीय क्रिकेटच्या 'गब्बर'चा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा
शनिवार, 24 ऑगस्ट 2024 (20:26 IST)
भारताचा सलामीवीर शिखर धवन यानं आज (24 ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांसाठी एक भावनिक व्हिडिओ पोस्ट करत शिखरनं निवृत्तीची घोषणा केली आहे.
2022 मध्ये शिखर धवन भारतासाठी एकदिवसीय क्रिकेट मालिका खेळला होता. मात्र, नंतरच्या काळात शुभमन गिल आणि इतर तरुण फलंदाजांच्या चांगल्या कामगिरीमुळे शिखरला संघात स्थान मिळत नव्हतं.
शिखर भारतासाठी 34 कसोटी सामने, 167 एकदिवसीय सामने आणि 68 टी-20 सामने खेळला आहे. 50 षटकांच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने आतापर्यंत 6 हजार 793 धावा केल्या आहेत. त्याने 44.11 च्या सरासरीनं धावांचा पाऊस पाडला आहे.
तर कसोटी सामन्यांमध्ये त्याने 40.61 सरासरीनं 2 हजार 315 धावा केल्या आहेत
निवृत्तीची घोषणा करताना शिखरच्या भावना शिखर धवननं सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केली आहे.
या व्हिडिओमध्ये शिखर म्हणाला, "आज मी आयुष्याच्या अशा टप्प्यावर उभा आहे, जिथून मागे वळून पाहिल्यास फक्त आठवणी आहेत तर समोर पाहिल्यास संपूर्ण जग दिसतं आहे. भारतासाठी खेळणं हे नेहमीच माझं स्वप्नं होतं. ते पूर्णसुद्धा झालं. यासाठी मी अनेक जणांचा आभारी आहे."
आभार व्यक्त करताना शिखर पुढे म्हणाला, "मी सर्वात आधी माझ्या कुटुंबाचे आभार मानतो. माझे लहानपणीचे प्रशिक्षक तारक सिन्हा जी, मदन शर्मा जी, ज्यांच्याकडून मी क्रिकेट शिकलो, त्यांचेही आभार मानतो."
"मी इतके वर्षे ज्यांच्याबरोबर खेळलो ते क्रिकेट संघातील माझे सहकारी यांचेही आभार मानतो. क्रिकेटमुळे मला एक कुटुंब मिळालं. नावलौकिक मिळाला आणि सर्वांचं प्रेम मिळालं."
शिखरनं पुढे म्हटलं आहे, "आयुष्यात जेव्हा आपण पुढे मार्गस्थ होतो, तेव्हा काही गोष्टी मागे सुटत जातात. माझ्याही बाबतीत तसंच होतं आहे. मी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून माझी निवृत्ती जाहीर करतो आहे."
शिखर म्हणाला, "क्रिकेटमधील माझा प्रवास थांबवत असताना, मी माझ्यासाठी देशासाठी खूप क्रिकेट खेळलो या गोष्टीचा मला मनस्वी आनंद आहे. बीसीसीआय आणि डीडीसीए यांचा मी खूप आभारी आहे. त्यांनी मला संधी दिली. माझ्यावर इतकं प्रेम करण्यासाठी मी माझ्या चाहत्यांचा मनापासून आभारी आहे."
तो म्हणाला, "मी स्वत:ला हेच सांगतो आहे की तुला देशासाठी पुन्हा खेळता येणार नाही, या गोष्टीमुळे दु:खी होऊ नकोस. उलट देशासाठी तुला इतकं खेळायला मिळालं याचा आनंद तू बाळग. मी देशासाठी खेळलो हीच माझ्या सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे."
'हॅप्पी रिटायरमेंट गब्बर!'
शिखर धवन भारतासाठी 269 आंतरराष्ट्रीय सामने खेळला. यात त्याने 24 शतकं ठोकली आहेत. यावर्षी आयपीएल 2024 मध्ये तो पंजाब किंग्सचा कर्णधार म्हणून खेळला.क्रिकेट संघातील सहकारी त्याला 'गब्बर' या टोपणनावानं हाक मारतात.
शिखर धवननं निवृत्तीची घोषणा केल्यानंतर पंजाब किंग्सने त्याच्या कामगिरीची आठवण करताना म्हटलं, "धावा, ट्रॉफी आणि असंख्य आठवणी, हॅप्पी रिटायरमेंट गब्बर. तुझ्या आयुष्याच्या पुढील इनिंगची जोरदार सुरुवात होण्याची आम्ही आतुरतेनं वाट पाहत आहोत."
शिखरच्या नावावरील विक्रम
शिखर धवनच्या निवृत्तीच्या क्षणी त्याच्या विक्रमांबद्दल बोलणं संयुक्तिकच ठरेल.आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये 40 पेक्षा जास्त सरासरीनं पाच हजार धावांपेक्षा अधिक धावा फटकावणाऱ्या आठ फलंदाजांमध्ये शिखर धवनचा समावेश आहे.
या सामन्यांमध्ये त्याने 90 पेक्षा अधिक धावगतीनं (स्ट्राइक रेट) धावा ठोकल्या आहेत. या यादीत भारतीय फलंदाजांमध्ये फक्त रोहित शर्मा आणि विराट कोहली आहेत.शिखर धवननं कसोटी सामन्यातील आपली सुरूवातच दणक्यात केली होती. कारकीर्दीच्या पहिल्याच कसोटी सामन्यात त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक केलं होतं.
हा कसोटी सामना मोहालीत खेळला गेला होता. या सामन्यात शिखरनं 85 धावांतच शतक केलं होतं. पदार्पण करणाऱ्या कोणत्याही फलंदाजानं केलेलं हे सर्वाधिक वेगवान शतक आहे. या सामन्यात त्याने 187 धावा केल्या होत्या. या सामन्यात भारतानं विजय मिळवला होता.
2013 मध्ये शिखर जबरदस्त फॉर्ममध्ये होता. तेव्हा तो त्याच्या कारकीर्दीच्या शिखरावर होता. यावर्षी त्याने एकदिवसीय सामन्यात 50.52 च्या सरासरीनं आणि 97.89 च्या धावगतीनं 1162 धावा ठोकल्या होत्या.
यावर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुद्धा भारताला विजय मिळवून देताना शिखरनं महत्त्वाची भूमिका बजावली होती. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाच डावांमध्ये मिळून शिखरनं 363 धावा केल्या. यात त्याने दोन शतकंसुद्धा केली.
याच टूर्नामेंटमध्ये रोहित शर्माबरोबर सलामीवीर म्हणून त्याची जोडी जमली. सलामीवीरांच्या या जोडीनं एकदिवसीय क्रिकेटमधील चौथी सर्वोत्तम भागीदारी केली होती. सचिन तेंडुलकर आणि सौरभ गांगुली यांच्या जोडीनंतर ही जोडी भारतासाठी सलामीवीरांची सर्वात यशस्वी जोडी ठरली आहे.