स्मिथ, वॉर्नरवरील बंदी योग्य

शुक्रवार, 30 मार्च 2018 (13:48 IST)
चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर एका वर्षाची क्रिकेटबंदी घातली आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाचा हा निर्णय अगदी योग्य आहे, असे मत भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने व्यक्त केले आहे.
 
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊनमधील कसोटी सामन्यात बॅनक्रॉफ्ट हा चेंडूशी छेडछाड करताना कॅमेर्‍यात पकडला गेला होता. बॅनक्रॉफ्टने हे कृत्य कर्णधार व उपकर्णधार यांच्याशी संगनमत करून केल्याचे समोर आले. त्यामुळे क्रिकेट जगतात खळबळ उडाली. त्यानंतर स्मिथला कर्णधारपद आणि वॉर्नरला उपकर्णधारपद गमवावे लागले. या दोघांना आयपीएल संघांच्या कर्णधारपदांवरूनही पायउतार व्हावे लागले. त्यात आता ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. दोन्ही खेळाडूंवर एका वर्षाची क्रिकेटबंदी घातली आहे. तर, बॅनक्रॉफ्टवर 9 महिन्यांची बंदी घातली आहे.
 
ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाच्या या निर्णयावर सचिन म्हणाला, 'सभ्य माणसांचा खेळ अशी क्रिकेटची ओळख आहे. जे काही झाले ते दुर्दैवी आहे. पण या खेळावरील विश्वास अबाधित राखण्यासाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने घेतलेला निर्णय योग्य आहे. जिंकणे महत्त्वाचे आहेच, पण कोणत्या मार्गाने जिंकतो हेही तितकेच महत्त्वाचे आहे,' असे सचिनने म्हटले आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती