येडीयुरप्पा यांचे सरकार भ्रष्ट : अमित शहा

बुधवार, 28 मार्च 2018 (12:44 IST)
जर भ्रष्टाचारासाठी कुठल्या सरकारला बक्षीस द्याचे असेल तर ते येडीयुरप्पा सरकारला द्यायला हवे असे चुकून अमित शहा बोलून बसले आहेत. कर्नाटकमध्ये निवडणुका जाहीर झाल्या असून प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. येडीयुरप्पा भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. तर काँग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे सरकार भ्रष्टाचारी असल्याचा आरोप भाजप करत आहे. निवडणुकांसदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना शहा यांनी सुप्रीम कोर्टाचा दाखला दिला.
 
शहा म्हणाले, सुप्रीम कोर्टाच्या एका निवृत्त न्यायाधीशांनी असे म्हटले होते की, भ्रष्टाचारासाठी कुठले सरकार पात्र असेल तर ते येडीयुरप्पांचे सरकार. ते असे म्हणताक्षणीच शेजारी बसलेल्या व्यक्तीने चूक निदर्शनास आणली असून शहा यांनी लगेच चूक सुधारत सिद्धरामय्या सरकार अशी दुरूस्ती केली. अर्थात, व्हायचे ते नुकसान होऊन गेले. सिद्धरामय्या यांनी लगेच सदर वक्तव्य ट्विट करत शहा यांचे धन्यवाद मानले आहेत. तुम्ही अखेर सत्य वदलात असे उद्‌गार सिद्धराय्या यांनी काढले आहेत.
 
कर्नाटकमध्ये एकाच टप्प्यात 12 मे रोजी मतदान होणार असून 15 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. काँग्रेसच्या हातात असलेल्या मोजक्या राज्यांमध्ये कर्नाटक असून ते जिंकण्यासाठी भाजप जीवाची बाजी लावणार असल्याचे दिसत आहे. अशा स्थितीत आज घडल्या तशा प्रत्येक चुका उचलून धरण्यास काँग्रेस उत्सुक असेल हेही दिसून येत आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती