Pak vs Eng: माघार, मग शाही स्वागत आणि आता वर्ल्डकप फायनलमध्ये भिडणार
रविवार, 13 नोव्हेंबर 2022 (10:08 IST)
सप्टेंबर 2021- इंग्लंड क्रिकेट बोर्डाने पुरुष आणि महिला संघाचा पाकिस्तान दौरा सुरक्षेच्या कारणास्तव रद्द केला. त्याआधी तीन दिवस न्यूझीलंड संघानेही पाकिस्तान संघाचा रद्द करत असल्याची घोषणा केली होती.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या निर्णयाचे तीव्र पडसाद पाकिस्तानमध्ये उमटले होते. खेळाडू, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि चाहते यांनी नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे खेळाडूंची सुरक्षा हेच सर्वोच्च प्राधान्य असल्याचं ईसीबीने म्हटलं.
कोरोना काळात खेळाडूंना प्रदीर्घ काळ बबलमध्ये राहून खेळावं लागलं. त्याचा ताण त्यांच्यावर होता. सुदैवाने आता तो धोका कमी झाला आहे. या दौऱ्यासाठी त्यांच्यावर सुरक्षेचा ताण टाकायचा नाहीये असं इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलं.
आमच्या या निर्णयाचा फटका पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला बसणार आहे. चाहते नाराज होणार आहेत. पाकिस्तानच्या खेळाडूंना घरच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळणार नाही.
आम्ही या सगळ्यासाठी दिलगीर आहोत. भविष्यात आम्ही नक्कीच पाकिस्तानचा दौरा करू असं इसीबीने आपल्या पत्रकात म्हटलं.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख रमीज राजा यांनीही इसीबीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी रोष व्यक्त केला होता.
सप्टेंबर 2022- इंग्लंड क्रिकेट संघ सात सामन्यांच्या ट्वेन्टी20 मालिकेसाठी पाकिस्तानात दाखल झाला. अभूतपूर्व सुरक्षा यंत्रणेत त्यांचं स्वागत झालं. विदेशी राष्ट्राध्यक्षाला जी सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात येते तशी सुरक्षा इंग्लंडच्या संघाला देण्यात आली.
सर्वसाधारणपणे दोन संघांदरम्यान दोन किंवा तीन सामन्यांची ट्वेन्टी-20 मालिका खेळवण्यात येते पण आगामी वर्ल्डकप लक्षात घेऊन 7 सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. कराची आणि लाहोर या दोन्ही ठिकाणी चाहत्यांच्या भरघोस प्रतिसादात सामने झाले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या मालिकेत पाहुण्या इंग्लंड संघाने 4-3 अशी बाजी मारली.
आयोन मॉर्गन निवृत्त झाल्यामुळे संघात स्थान मिळालेल्या हॅरी ब्रूकला मालिकावीर पुरस्कराने गौरवण्यात आलं. दुखापतीमुळे जोस बटलर मालिकेत एकही सामना खेळू शकला नाही, त्याच्या अनुपस्थितीत मोईन अलीने संघाचं नेतृत्व केलं.
वर्ल्डकपच्या तयारीच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी उत्तम रंगीत तालीम झाली. योगायोग म्हणजे वर्ल्डकप फायनलमध्ये आता हेच दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.
दोनच महिन्यांपूर्वी एकमेकांविरुद्ध खेळल्याने गुणदोषांची चांगलीच कल्पना आहे. दोन्ही संघांचे बहुतांश खेळाडू ऑस्ट्रेलियात आयोजित बिग बॅश ट्वेन्टी-20 लीग स्पर्धेत खेळतात. त्यामुळे ऑस्ट्रेलियातल्या मोठ्या मैदानांवर कसं खेळायचं याची त्यांना माहिती आहे.
पाकिस्तानसाठी बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान फॉर्मात येणं अतिशय महत्त्वाचं आहे. फखर झमानला झालेल्या दुखापतीमुळे अंतिम अकरात समाविष्ट मोहम्मद हॅरिसने संधीचं सोनं केलं आहे.
इफ्तिकार अहमदने अडचणीच्या काळात आश्वासक खेळी केली आहे. शान मसूदकडूनही पाकिस्तानला दमदार खेळीची अपेक्षा आहे.
असिफ अली आणि हैदर अली यांच्यापैकी एकाचा समावेश केला जाऊ शकतो. शदाब खान आणि मोहम्मद नवाझ या जोडगोळीने तिन्ही आघाड्यांवर संघाला जिंकून देण्यात योगदान दिलं आहे.
पाकिस्तानचं फास्ट बॉलिंग आक्रमण स्पर्धेतील सर्वोत्तम बॉलिंग चमूपैकी एक आहे. शाहीन शहा आफ्रिदी, मोहम्मद वासिम, हॅरिस रौफ, नसीम शहा यांनी आतापर्यंत प्रतिस्पर्ध्यांना जखडून ठेवलं आहे. रन्स आणि विकेट्स दोन्हीमध्ये त्यांची कामगिरी सातत्याने चांगली होते आहे.
तब्बल दहाव्या क्रमांकापर्यंत इंग्लंडची बॅटिंग आहे. जोस बटलर आणि अलेक्स हेल्स यांना अगदी योग्यवेळी सूर गवसला आहे.
भारताविरुद्धच्या लढतीत त्यांच्या बॅटचा तडाखा भारतीय संघाला बसला. मोईन अली, लायम लिव्हिंगस्टोन, हॅरी ब्रूक हे त्रिकुट तडाखेबंद फटकेबाजीसाठी प्रसिद्ध आहे.
डेव्हिड मलानच्या जागी संधी मिळालेला फिल सॉल्टही आक्रमक खेळींसाठीच प्रसिद्ध आहे. बेन स्टोक्स हा बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग अशा तिन्ही आघाड्यांवर योगदान देणारा अनुभवी खेळाडू आहे. पाकिस्तानच्या दर्जेदार बॉलिंगसमोर इंग्लंडच्या बॅट्समनचा कस लागणार आहे. इंग्लंडसाठी बॉलिंग कच्चा दुवा ठरू शकते. भारताविरुद्ध इंग्लंडच्या बॉलिंग चमूने शिस्तबद्ध काम केलं पण आता मैदान बदललं आहे, प्रतिस्पर्धी संघही बदलला आहे. मार्क वूडच्या खेळण्याबाबत अजूनही साशंकता आहे. तो खेळू न शकल्यास ख्रिस जॉर्डन संघात असेल.
तो ख्रिस वोक्स आणि बेन स्टोक्स यांच्यासह फास्ट बॉलिंगची धुरा सांभाळेल. मोईन अली, लायम लिव्हिंगस्टोन स्पिन आक्रमणात आदिल रशीदला साथ देतील. हाणामारीच्या ओव्हर्समध्ये रन्स रोखण्यासाठी सॅम करन महत्त्वपूर्ण आहे.
1992ची पुनरावृत्ती
इंग्लंड-पाकिस्तान फायनलमध्ये पोहोचल्यापासून सोशल मीडियावर 1992 वर्ल्डकप फायनलची पुनरावृत्ती होणार का? याची चर्चा आहे.
1992 वर्ल्डकप स्पर्धेच्या फायनलमध्ये इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील संघाने जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यावेळी पाकिस्तानने सलामीची लढत गमावली होती.
प्राथमिक फेरीत भारताविरुद्ध पराभव झाला होता. प्राथमिक फेरीत सलग तीन सामने जिंकले होते. सेमी फायनलसाठी अगदी शेवटच्या क्षणी पात्र ठरले होते. सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडला हरवलं होतं. हेच सगळं यंदाही जसंच्या तसं झाल्याने पाकिस्तान यंदा वर्ल्डकप पटकावणार अशी भाकितं वर्तवली जात आहेत.
पाकिस्तान- बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शान मसूद, मोहम्मद हॅरिस, इफ्तिकार अहमद, खुशदील शहा, शदाब खान, हैदर अली, असिफ अली, हॅरिस रौफ, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाझ, मोहम्मद वासिम, नसीम शहा, शाहीन शहा आफ्रिदी
ठिकाण: मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड
अंपायर्स: मारेस इरॅसमस, कुमार धर्मसेना, ख्रिस गफनी, पॉल रायफेल.
मॅचरेफरी: रंजन मदुगले
वेळ: दुपारी 1.30 पासून
आमनेसामने
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात 28 ट्वेन्टी20 लढती झाल्या आहेत. यामध्ये इंग्लंडचा संघ 17-9 अशी आघाडीवर आहे. ट्वेन्टी20 वर्ल्डकपमध्ये या दोन संघांमध्ये केवळ 2 सामने झाले आहेत आणि दोन्हीतही इंग्लंडनेच विजय मिळवला आहे.
पावसाची शक्यता
संपूर्ण स्पर्धेदरम्यान पावसाने व्यत्यय आणला आहे. फायनलमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सामन्याचा निकाल लागण्यासाठी 10पेक्षा जास्त ओव्हर्सचा खेळ होणं अनिवार्य आहे. त्यानंतर डकवर्थ लुईस प्रणाली लागू आहे. फायनलसाठी सोमवारचा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे.
पावसाची शक्यता निश्चित असल्याने आयसीसीने सामन्यासाठी अतिरिक्त दोन तासांचा कालावधी मुक्रर केला आहे.
स्पर्धेत आतापर्यंत
पाकिस्तान वि. भारत- पराभूत वि. झिम्बाब्वे- पराभूत वि. नेदरलँड्स- विजयी वि. दक्षिण आफ्रिका- विजयी वि. बांगलादेश- विजयी वि. न्यूझीलंड- विजयी
इंग्लंड वि. अफगाणिस्तान-विजयी वि. आयर्लंड- पराभूत वि. ऑस्ट्रेलिया- रद्द वि. न्यूझीलंड- विजयी वि. श्रीलंका- विजयी वि. भारत-विजयी