मुंबई, बडोदा संघांचे शानदार विजय

गुरूवार, 19 ऑक्टोबर 2023 (07:41 IST)
2023 च्या क्रिकेट हंगामातील सुरु झालेल्या सैय्यद मुस्ताक अली टी-20 चषक क्रिकेट स्पर्धेत झालेल्या सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने हरियाणाचा 8 गड्यांनी पराभव केला. तर जयपूरमध्ये झालेल्या अन्य एका सामन्यात बडोदा संघाने जम्मू काश्मीरवर 19 धावांनी विजय नोंदविला.
 
मुंबई आणि हरियाणा यांच्यातील खेळविण्यात आलेल्या अ गटातील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हरियाणा संघाने 18 षटकात 5 बाद 147 धावा जमविल्या. हरियाणा संघातील हर्षल पटेलने 27 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारासह 38 धावा जमविल्या. हर्षल पटेल आणि अंकित कुमार यांनी 47 चेंडूत पहिल्या गड्यासाठी 67 धावांची भागीदारी केली. अंकित कुमार 26 चेंडूत 6 चौकारांसह 36 धावा जमविल्या. मुंबईच्या तनुश कोटियान 19 धावात 3 गडी बाद केले. मात्र मुंबई संघातील वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे प्रभावी ठरु शकला नाही. त्याने 4 षटकात 48 धावा दिल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना मुंबईने 15.5 षटकात 2 बाद 149 धावा जमवित शानदार विजय नोंदविला. मुंबई संघातील अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने 43 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 76 धावा झळकावल्या. रहाणेला 57 धावावर जीवदान मिळाले होते.
 
संक्षिप्त धावफलक : हरियाणा 18 षटकात 5 बाद 147 (हर्षल पटेल 38, अंकित कुमार 36, कोटीयान 3-19, मोहित अवस्थी 2-15), मुंबई 15.5 षटकात 2 बाद 149 (अजिंक्य रहाणे नाबाद 76).
 
बडोदा विजयी
 
जयपूरमध्ये झालेल्या अ गटातील अन्य एका सामन्यात बडोदा संघाने जम्मू काश्मिरचा 19 धावांनी पराभव केला. या सामन्यात बडोदा संघातील वेगवान गोलंदाज अभिमन्यू सिंगने 26 धावात 4 गडी बाद केले. तर कर्णधार कृणाल पांड्याने 19 धावात 1 बळी मिळविला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती