शमीच्या आयपीएल सहभागावर अद्याप निर्णय नाही : बीसीसीआय

शनिवार, 17 मार्च 2018 (12:36 IST)
पत्नी हसीन जहाँने केलेल्या आरोपांनंतर अडचणीत आलेला भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या आयपीएल सहभागावर अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे. 
 
बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाचे प्रमुख नीरज कुमार सध्या मोहम्मद शमीची फिक्सिंगच्या आरोपांप्रकरणी चौकशी करत आहेत. त्यामुळे नीरज कुमार यांच्या अहवालानंतरच शमीच्या आयपीएल सहभागावर निर्णय घेतला जाईल असे, बीसीसीआयचे प्रभारी अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी स्पष्ट केले.
 
विनोद राय यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट प्रशासकीय समिती शमीबद्दल निर्णय घेणार आहे. मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँने शमीवर फिक्सिंगचे आरोप केले होते.
 
आयपीएलच्या अकराव्या हंगामासाठी दिल्ली डेअरडेविल्स संघाने शमीला 3 कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात घेतले आहे. हसीन जहाँने केलेल्या आरोपांनंतर बीसीसीआयने शमीचा वार्षिक करार राखून ठेवला होता. मोहम्मद शमीचे इतर मुलींसोबत अनैतिक संबंध असून शमी व त्याच्या परिवाराकडून आपला छळ होत असल्याची तक्रार हसीन जहाँने कोलकाता पोलिसांकडे केली होती. आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलची बैठक पार पडली, त्या बैठकीत शमीच्या सहभागाबद्दल चर्चा झाल्याचे समजते; परंतु या बैठकीत शमीच्या सहभागाबाबत काहीही निर्णय घेण्यात आला नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती