लक्ष्याचा पाठलाग करताना रायन रिकलटन आणि रोहितने मुंबईला चांगली सुरुवात करून दिली. या दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी केली. मुंबईला पहिला धक्का रिकलटनच्या रूपात बसला. रिकलटनने 19 चेंडूत तीन चौकार आणि एका षटकारासह 24 धावा काढल्या. मागील काही सामन्यांप्रमाणे, या सामन्यातही मुंबईने रोहितचा प्रभावशाली खेळाडू म्हणून वापर केला. रोहित काही काळापासून खराब फॉर्ममधून जात होता, पण या सामन्यात तो वेगळ्या लयीत दिसला.
रोहितने 33 चेंडूत हंगामातील पहिले अर्धशतक झळकावले आणि फॉर्ममध्ये जबरदस्त पुनरागमन केले. सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करणाऱ्या सूर्यकुमार यादवने रोहितला चांगली साथ दिली. सूर्यकुमारने फक्त 26 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर, सूर्यकुमार वेगळ्याच लूकमध्ये दिसला. सूर्य कुमार आणि रोहितने 16 वे षटक टाकण्यासाठी आलेल्या मथिशा पाथिरानाचा सामना केला आणि तीन षटकार मारून सामना जिंकला.