India Tour of South Africa : उपकर्णधार रोहित शर्मा कसोटी मालिकेतून बाहेर, या खेळाडूने घेतली 'हिटमॅन'ची जागा

सोमवार, 13 डिसेंबर 2021 (23:48 IST)
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. टी-20 नंतर संघाच्या वनडे संघाचा कर्णधार बनवण्यात आलेला रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे. दुखापतग्रस्त रोहितच्या जागी प्रियांक पांचाळचा भारतीय कसोटी संघात समावेश करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयने ट्विटरवर दिली. मुंबईत संघाच्या नेट सराव दरम्यान, रोहितला डाव्या पायाच्या स्नायूला तीव्र दुखापत झाली आणि हातालाही दुखापत झाली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एका निवेदनात म्हटले आहे की, "टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्माला काल मुंबईत प्रशिक्षणादरम्यान डाव्या पायाच्या स्नायूला दुखापत झाली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून तो बाहेर पडला आहे. रोहित शर्माच्या जागी प्रियांक पांचाल कसोटी संघात स्थान घेणार आहे. भारताला 26 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. टीम इंडिया 16 डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे.
नवीन कसोटी उपकर्णधार रोहितसह त्याचे सहकारी अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, केएल राहुल आणि शार्दुल ठाकूर दुपारी शरद पवार अकादमीमध्ये नेटमध्ये सराव करत होते. त्याचवेळी रोहितच्या हाताला दुखापत झाली. रोहितच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडल्यानंतर त्याच्या जागी प्रियांक पांचाळचा संघात समावेश करण्यात आला आहे. पांचाल अलीकडेच भारत अ संघाचा कर्णधार होता, ज्यांच्या नेतृत्वाखाली संघाने तीन सामन्यांची मालिका खेळली. 31 वर्षीय पांचाळने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही. पण या फलंदाजाकडे चांगला अनुभव असून त्याने 100 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 46 च्या सरासरीने 7011 धावा केल्या आहेत. रोहितच्या बाहेर पडल्यानंतर आता भारतीय संघाचा उपकर्णधार कोण असेल, हे अद्याप ठरलेले नाही. कसोटी मालिका 15 जानेवारीला संपेल, त्यानंतर 19 जानेवारीपासून पार्लमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाईल.
  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती