IND vs AUS : भारताचा पहिल्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियावर 1 डाव आणि 132 धावांनी विजय
शनिवार, 11 फेब्रुवारी 2023 (16:07 IST)
नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला एक डाव आणि 132 धावांनी पराभूत केलं आहे. दुसऱ्या डावात भारताने ऑस्ट्रेलियाला 91 धावांवर ऑलआउट केलं होतं. पहिल्या डावात भारताने ऑस्ट्रेलियावर 223 धावांनी आघाडी घेतली होती. इतकी मोठी आघाडी कमी करण्यात ऑस्ट्रेलियाला अपयश आलं. गुरुवारी (9 फेब्रुवारी) सुरू झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा पूर्ण संघ 177 धावांवर बाद झाला.
पहिल्या डावात चमकला जडेजा
ऑस्ट्रेलियाचा डाव 177 धावांमध्ये गुंडाळण्याचं श्रेय हे रवींद्र जडेजा आणि आर. अश्विन यांना जातं. पहिल्या डावात जडेजा आणि अश्विन यांनी कोणत्याही ऑस्ट्रेलियन फलंदाजाला क्रीझवर टिकूच दिलं नाही.
रवींद्र जडेजाने 47 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या, तर अश्विनने 42 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्या. मोहम्मद शमी आणि मोहम्मद शिराजसारख्या वेगवान गोलंदाजांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात मार्नस लाबूशानने 49 धावा केल्या आणि स्टीव्हन स्मिथने 37 धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त पीटर हँड्सकॉम्बने 31 धावा केल्या, तर अलेक्स करीने 36 धावा केल्या. या चौघांव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचा कोणताही फलंदाज दहाचा आकडाही गाठू शकला नाही.
दुसरीकडे भारतीय फलंदांनी पहिल्याच डावात 400 धावांचा डोंगर रचला. त्यामुळे भारताला ऑस्ट्रेलियावर 223 धावांनी विजय मिळवता आला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने 120 धावांची शतकी खेळी केली.
अक्षर पटेलने 84 धावा केल्या, तर रवींद्र जडेजाने 70 धावांची खेळी केली.
दुसऱ्या डावात अश्विनची कमाल
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने जेव्हा आपला दुसरा डाव सुरू केला, तेव्हा ऑस्ट्रेलियन फलंदाजांसमोर अश्विन कर्दनकाळ बनून उभा राहिला.
अश्विनने 12 ओव्हरमध्ये 37 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या. दुसरीकडे रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमीनेही 2-2 विकेट्स घेतल्या. अक्षर पटेलने एक विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक रन स्टीव्हन स्मिथने केल्या. त्याने नाबाद 25 धावा केल्या. त्याखालोखाल मार्नस लाबूशानने सर्वांत अधिक 17 धावा केल्या.