टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला भारतीय संघात संधी न मिळण्याची बाब सातत्याने वाढत आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्यासोबतच संजू सॅमसनने आंतरराष्ट्रीय स्तरावर एकदिवसीय क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी केली आहे. सॅमसनला भारताकडून सातत्याने खेळण्याची संधी मिळालेली नाही, परंतु त्याला मिळालेल्या दुर्मिळ संधींमध्ये सॅमसनने चांगली कामगिरी केली आहे आणि विक्रम त्याच्या नावे आहेत.
बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतही संजू भारतीय संघाचा भाग नव्हता. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे कर्णधार असलेल्या संजू सॅमसनचे चाहते मोठ्या संख्येने असून भारतीय संघात त्याचा समावेश करण्याची मागणी सातत्याने होत आहे. फिफा विश्वचषकादरम्यानही संजूचे चाहते त्याच्या नावाचे पोस्टर घेऊन कतारला पोहोचले होते. मात्र, इतकं होऊनही संजूला टीम इंडियामध्ये सतत संधी मिळत नाहीये. दरम्यान, संजू सॅमसनला आयर्लंडकडून खेळण्याची ऑफर आल्याच्या बातम्या आल्या होत्या, मात्र त्याने ही ऑफर धुडकावून लावली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयर्लंड क्रिकेट बोर्डाने संजू सॅमसनला सांगितले आहे की, जर तो आयर्लंडकडून खेळला तर त्याला देशासाठी प्रत्येक सामना खेळण्याची संधी मिळेल. मात्र, सॅमसनने आपल्या कारकिर्दीत आपला देश पुढे ठेवला असून आंतरराष्ट्रीय स्तरावर इतर कोणत्याही देशाकडून खेळण्याची आपली इच्छा नसल्याचे सांगितले. त्याला फक्त भारतीय संघाचा भाग व्हायचे आहे.
संजू सॅमसन आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार आहे. कर्णधार म्हणूनही त्याची कामगिरी चांगली झाली आहे. यंदा त्याचा संघही अंतिम फेरीत पोहोचला. या कारणास्तव, आयर्लंड क्रिकेट बोर्ड त्याच्यावर विश्वास ठेवत आहे. मात्र या संदर्भात आयर्लंड क्रिकेट बोर्ड किंवा संजू सॅमसनकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, मात्र सॅमसनला आयर्लंडकडून खेळण्याची ऑफर असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.