बांगलादेशविरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात विराट कोहलीने शानदार शतक झळकावले. शनिवारी (10 डिसेंबर) चितगावमध्ये त्याने 113 धावांची इनिंग खेळली. विराटने 91 चेंडूंच्या खेळीत 11 चौकार आणि दोन षटकार मारले. कोहलीच्या वनडे कारकिर्दीतील हे 44 वे शतक आहे. त्याचवेळी त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 72 शतके पूर्ण झाली.
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके ठोकण्याच्या बाबतीत विराट ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्याही पुढे गेला आहे. विराटने 482 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 72 शतके झळकावली आहेत. पाँटिंगने 560 सामन्यांमध्ये 71 शतके झळकावली आहेत. भारताचा माजी दिग्गज सचिन तेंडुलकर आता कोहलीच्या पुढे आहे. त्याने 664 सामन्यात 100 शतके ठोकली.