रणजी स्पर्धेत पहिल्यांदाच महिला पंच

बुधवार, 7 डिसेंबर 2022 (09:45 IST)
2023 च्या रणजी हंगामात पहिल्यांदाच मैदानावर पंचगिरीची जबाबदारी महिला क्रिकेट पंचावर सोपवण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने घेतला आहे. आता भारताच्या महिला पंच वृंदा राठी, जननी नारायणन आणि गायत्री वेणुगोपालन या रणजी स्पर्धेत पंचगिरी करणार आहेत.
 
भारतीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच पुरुषांच्या क्रिकेट सामन्यात मैदानावर महिला पंच दिसणार आहेत. बऱयाच सामन्यांमध्ये खेळाडूंकडून फलंदाजाचा विरुद्ध बादचे जोरदार अपिल केले जाते. आता अशा उग्र अपिलांसमोर महिला पंचांना सामोरे जावे लागणार आहे. यापूर्वी रणजी क्रिकेट स्पर्धेत भारताची महिला पंच गायत्री वेणुगोपालने राखीव पंच म्हणून कामगिरी केली होती. 2022 च्या रणजी हंगामाला 13 डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे. याच दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघातील पाच सामन्यांची टी-20 मालिकाही खेळवली जाणार आहे.
 
देशातील रणजी स्पर्धा ही सर्वात जुनी आणि प्रतिष्ठेची समजली जाते. पुरुषांच्या या प्रथम श्रेणी स्पर्धेमध्ये निवडक सामन्यांसाठी या तीन महिला पंच पंचगिरी करतील. जननी नारायणन ही चेन्नईची तर मुंबईची वृंदा राठी आता मैदानावर पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेत पंचगिरी करताना पाहावयास मिळणार आहे. दिल्लीच्या गायत्री वेणुगोपालनलाही ही संधी उपलब्ध झाली आहे. 32 वर्षीय राठीने क्रिकेट क्षेत्रात पंचगिरी करण्याचा निर्णय घेतला. तर 36 वर्षीय नारायणन ही यापुर्वी सॉफ्टवेअर इंजिनिअर क्षेत्रात वावरत होती पण तिने हे क्षेत्र सोडून पंचगिरीचे क्षेत्र निवडले. 43 वर्षीय वेणुगोपालनने भारतीय क्रिकेट मंडळाची पंच परीक्षा देऊन त्यात उत्तीर्ण झाल्यानंतर तिने 2019 साली पंचगिरीला प्रारंभ केला. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये पुरुषांच्या क्रिकेट क्षेत्रात यापूर्वीच महिला क्रिकेट पंच म्हणून कार्यरत आहेत. आता भारतामध्येही ही लाट आली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती