सेल्फी नाकारल्याने क्रिकेटपटू पृथ्वीच्या गाडीवर हल्ला गुन्हा दाखल
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2023 (09:22 IST)
social media
भारताचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉने 'सेल्फी' काढण्यास नकार दिल्याने एका चाहत्याने 'बेसबॉल बॅट' घेऊन त्याच्या गाडीवर हल्ला केला. ही घटना बुधवारी (15 फेब्रुवारी) पहाटे सांताक्रूझ येथील एका हॉटेलबाहेर घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेत एका महिलेसह आठ जणांवर दंगल आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचे आल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
पृथ्वी मित्रांसह सांताक्रूझ येथील विमानतळाच्या जवळच असलेल्या एका हॉटेलमध्ये गेला होता. तेथून बाहेर पडल्यानंतर ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. पृथ्वी आणि त्याच्याच घरात राहणाऱ्या आशिष यादवने पोलिसांत तक्रार दाखल केली.
या दोघांनी केलेल्या तक्रारीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने पृथ्वीसोबत 'सेल्फी' काढण्याची मागणी केली. पृथ्वीने त्यासाठीही परवानगीही दिली. मात्र, त्या व्यक्तीने आणखी काही 'सेल्फी' काढण्याची मागणी केल्यानंतर पृथ्वी त्यास नकार दिला. त्यानंतर त्या व्यक्तीने पृथ्वीसोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली.
हे सर्व पाहिल्यावर, हॉटेलच्या व्यवस्थापकाने त्या व्यक्तीस तेथून बाहेर पडण्यास सांगितले. मग पृथ्वी आणि यादव यांनी अन्य काही मित्रांसह हॉटेलमध्ये जाऊन भोजन केले. मात्र, हॉटेलमधून बाहेर पडत असताना पृथ्वीने 'सेल्फी'ची मागणी करणाऱ्या त्या व्यक्तीला पुन्हा तेथे पाहिले आणि त्या व्यक्तीच्या हातात 'बेसबॉल बॅट' होती.
पृथ्वी आणि त्याचे मित्र गाडीमध्ये बसताच त्या व्यक्तीने गाडीच्या पुढील काचेवर हल्ला केला. धोका लक्षात आल्यावर पृथ्वीने दुसऱ्या गाडीत बसण्याचा निर्णय घेतला, तर यादव आणि अन्य मित्र त्याची घाडी घेऊन ओशिवारासाठी रवाना झाले.
त्याच वेळी तीन दुचाकी आणि पांढऱ्या रंगाची गाडी आपला पाठलाग करत असल्याचे यादवने पाहिले. साधारण पहाटे 4 वाजताच्या सुमारास, या पाठलाग करणाऱ्या व्यक्तींनी लिंक रोड येथे त्याच्या गाडीवर हल्ला केला. यापैकी एकाने 'बेसबॉल बॅट'च्या साहाय्याने गाडीची मागील काच फोडली. मोटारबाईकवर बसलेले सहा जण आणि गाडीत असलेले दोघे (यापैकी एक महिला) यांनी यादव व त्याच्यासोबत असणाऱ्या अन्य मित्रांना शिवीगाळ केली. त्यानंतर यादव ओशिवारा पोलीस स्थानकात दाखल झाला.
त्याच्यावर हल्ला करणारे आठ जणही त्याच्या पाठोपाठ पोलीस स्थानकात आले. या आठ जणांपैकी महिलेने यादवशी हुज्जत घातली आणि हे प्रकरण मिटवण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणी केली. तसे न केल्यास पोलिसांत खोटी तक्रार दाखल करण्याची धमकीही तिने दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मग यादवने पोलिसांत तक्रार दाखल केली.
Published By -Smita Joshi