ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, अंतिम फेरीत प्रवेश

शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021 (08:13 IST)
टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर 5 गडी राखून दणदणीत विजय मिळवला.
 
या विजयासह ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला असून आता त्यांची गाठ शेजारी आणि कट्टर प्रतिस्पर्धी न्यूझीलंडशी आहे.
 
शुक्रवारी (11 नोव्हेंबर) सायंकाळी दुबईच्या क्रिकेट स्टेडियमवर येथे ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान हा सामना खेळवण्यात आला.
 
यामध्ये 17 चेंडूत 41 धावांची तुफान खेळी करणारा मॅथ्यू वेड ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने 19 व्या षटकात शाहीन आफ्रिदीला सलग तीन षटकार मारून अशक्यप्राय विजय खेचून आणला.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक 49 धावा केल्या. तर मार्शने 28 धावा केल्या. स्टोईनिसने 40 धावांवर नाबाद राहत विजयात महत्त्वाची भूमिका निभावली. त्याच्या बळावर पाकिस्तानने दिलेलं 177 धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियाने 5 गड्यांच्या मोबदल्यात 19 व्या षटकातच गाठण्यात यश मिळवलं. 26 धावांत 4 बळी घेणारा शादाब खान ऑस्ट्रेलियाला रोखू शकला नाही.
 
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकांत 4 बाद 176 धावा केल्या. त्यांच्याकडून मोहम्मद रिझवान आणि फखर जमान यांनी अर्धशतके झळकावली. रिझवान 52 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 67 धावा करून बाद झाला. फखर जमानने 31 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. 32 चेंडूंत त्याने नाबाद 55 धावांची खेळी केली.
 
ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने 38 धावांत 2 बळी घेतले. पॅट कमिन्स आणि अॅडम झम्पा यांनीही 1-1 विकेट घेण्यात यश मिळवलं. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती