सर्वाधिक व्ह्यूज असलेल्या 'रानबाजार'चे पुढील भाग लवकरच

मंगळवार, 24 मे 2022 (18:54 IST)
असंच काहीसं घडलं होतं... कदाचित?’अशी टॅगलाईन असणाऱ्या ‘रानबाजार’या भव्य वेबसीरिजची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु असून सर्वच स्थरातून त्याच्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. प्रेक्षकांनी ‘रानबाजार’ला भरभरून प्रतिसाद दिला आहे. वेबसीरिजच्या पहिल्या टीझरपासूनच खरंतर 'रानबाजार' वादळ निर्माण करणार याची खात्री होती आणि तसेच झाले. अवघ्या दोन दिवसांत या वेबसीरिजच्या ट्रेलरला २ मिलियनहूनही अधिक व्ह्यूज आले असून  इतक्या अल्पावधीत एवढी लोकप्रियता प्राप्त करणारी ही पहिली मराठी वेबसीरिज आहे. नुकतेच ‘रानबाजार’चे ३ भाग 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर प्रेक्षकांच्या भेटीला आले असून या तिन्ही भागांनी अक्षरशः खळबळ माजवली आहे. यातील तिसरा भाग अशा एका रंजक वळणावर येऊन थांबला आहे, जिथे प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे, ती पुढील भागांची. मात्र प्रेक्षकांची ही उत्सुकता अधिक न ताणता 'रानबाजार'चे पुढील भाग येत्या शुक्रवारी म्हणजेच २७ मे रोजी झळकणार आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचा आशय असणाऱ्या या वेबसीरिजची भव्यता यापूर्वी क्वचितच वेबविश्वात अनुभवण्यास आली असेल. 
 
प्राजक्ता माळी आपल्या भूमिकेबद्दल सांगते, “यापूर्वी अशा प्रकारची भूमिका मी कधीच साकारली नव्हती. या भूमिकेमुळे माझी 'बबली' इमेज बदलली. रत्ना साकारणे नक्कीच सोप्पे नव्हते. मुळात प्रत्येक भूमिकेसाठी अभ्यास हा करावाच लागतो. रत्नासाठी मला जरा जास्त मेहनत घ्यावी लागली. सगळ्यात आधी मी माझे वजन वाढवले. रत्ना ही एक वेश्या आहे. त्यामुळे तिची देहबोली, चालणे- बोलणे, तिचे राहणीमान, तिच्यातील आत्मविश्वास या सगळ्याचा मला अभ्यास करावा लागला. यासाठी मी पुण्यातील बुधवार पेठेत आणि मुंबईतील कामाठीपुरात जाऊन तेथील महिलांशी संवाद साधला. त्यांचे निरीक्षण केले. शारीरिक बदलासोबतच मला माझी मानसिकताही बदलावी लागली आणि त्यातूनच ही रत्ना समोर आली. अनेकांनी माझ्या या व्यक्तिरेखेचे कौतुक केले. काहींनी नाराजीही व्यक्त केली. परंतु या नाराजीकडे मी सकारात्मकतेने बघतेय. हे 'रत्ना'चे कौतुक आहे.'' 
 
तेजस्विनी पंडित ‘रानबाजार’धील आपल्या व्यक्तिरेखेविषयी बोलते, “आजवर मी अनेक भूमिका साकारल्या आहेत. अगदी सरळसाधी मुलगी ते अतिशय बोल्ड मुलगी. बबली इमेज ते अगदी बायोपिक सिनेमेही केले. परंतु अशा प्रकारची बोल्ड व्यक्तिरेखा मी पहिल्यांदाच साकारत आहे. अनेक प्रतिक्रिया आल्या, येत आहेत. ज्या अपेक्षित होत्या. त्यामुळे त्यांचा मी मनापासून स्वीकार करत आहे आणि हीच माझ्या कामाची पावती आहे. ज्यावेळी या भूमिकेबद्दल मला विचारणा करण्यात आली त्याक्षणी मी ही ऑफर स्वीकारली. अभिजित पानसे सारखे दिग्दर्शक, दमदार कथानक, 'प्लॅनेट मराठी' सारखे ओटीटी प्लॅटफॉर्म आणि तगडी स्टारकास्ट अशा सगळ्याच जमेच्या बाजू होत्या. प्रत्येक क्षणी प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणाऱ्या 'रानबाजर'मध्ये हळूहळू खूप गोष्टी उलगडणार आहेत. 
तर ‘रानबाजार’चे लेखक, दिग्दर्शक अभिजित पानसे म्हणतात, “रानबाजारला मिळणारा प्रतिसाद पाहता, खूप आनंद होतोय. प्रेक्षक असा बोल्ड विषयही स्वीकारत आहेत. त्यांची मानसिकता बदलत आहे. ही आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. त्यामुळे नवनवीन विषय प्रेक्षकांसमोर मांडण्याची आम्हाला संधी मिळते. ही माझी पहिलीच वेबसीरिज आहे. चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये खूप फरक असतो. चित्रपटाच्या कथेतील सस्पेन्स हा शेवटी समोर येतो. फारफार तर मध्यंतरापूर्वी. मात्र वेबसीरिजच्या प्रत्येक भागाचा शेवट हा एका अशा वळणावर आणून संपवावा लागतो, जिथे पुढच्या भागाची उत्सुकता निर्माण होते. त्यामुळे याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. वेबसीरिमध्ये कोणत्याही मर्यादा नसल्याने विचारविनीमयाने आशय बनवावा, या मताचा मी आहे. त्यामुळे प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर आणि मी, आमच्या दोघांच्या विचारसरणीतून ही भव्य आणि कधीही वेबविश्वात न पाहिलेली वेबससीरिज साकारण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. प्रत्येक पात्राने आपली भूमिका उत्तम वठवली आहे.'' 
 
प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “अभिजित पानसे दिग्दर्शित 'रानबाजार' या वेबसीरिजमध्ये अगदी प्राथमिक प्रक्रियेपासून माझा सहभाग होता. त्यामुळे यातील प्रत्येक व्यक्तीने घेतलेली मेहनत मी पाहिली आहे. हा आशयच इतका दमदार आहे, की आजवर वेबविश्वात सहसा असा विषय कोणीच हाताळला नसेल. प्लॅनेट मराठी ओटीटी हे एक असे माध्यम आहे. जे केवळ महाराष्ट्रापुरताच मर्यादित नसून ते परदेशातील प्रेक्षकांसाठीही आहे. आज जगाच्या कानाकोपऱ्यातून प्रेक्षक 'प्लॅनेट मराठी' ओटीटीवरील कॉन्टेन्ट पाहात आहेत. त्यांना ग्रामीण पासून आंतरराष्ट्रीय पातळीवर कॉन्टेन्ट देण्याची जबाबदारी ही आमची आहे. 'रानबाजार' ही अशीच आंतरराष्ट्रीय पातळीवरील वेबसीरिज आहे. येत्या शुक्रवारी येणारे पुढील भागही प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारे आहेत.'' 
 
पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असणाऱ्या या वेबसीरिजची निर्मिती प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी, रावण फ्युचर प्रॉडक्शन, अभिजित पानसे आणि अनिता पालांडे यांनी केली आहे. यात तेजस्विनी पंडित, प्राजक्ता माळी, मोहन आगाशे, मोहन जोशी, मकरंद अनासपुरे, सचिन खेडेकर, उर्मिला कोठारे,  वैभव मांगले, अनंत जोग, अभिजित पानसे, गिरीश दातार, निलेश दिवेकर, श्रेयस राजे, अतुल काळे, वनिता खरात आणि माधुरी पवार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती