'रानबाजार'मधल्या बोल्ड दृश्यांबद्दल तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी म्हणाल्या...

गुरूवार, 19 मे 2022 (15:05 IST)
'रानबाजार' या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे.
 
सोशल मीडियावर या वेबसीरिजची खूपच चर्चा आहे आणि त्याला कारण ठरलंय मराठीतल्या प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांचा बोल्ड अंदाज. या सीरिजचा विषय खूपच बोल्ड असल्याची चर्चा असून मराठी वेब विश्वात पहिल्यांदाच इतका बोल्डनेस दाखण्यात आल्याचा दावाही करण्यात आलाय.
 
काही दिवसांपूर्वी प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांचा रानबाजार या वेबसीरीजा टीझर रिलीज झाला होता. त्यात प्राजक्ता माळीचा बोल्ड लूक पाहून प्रेक्षकांनी आश्चर्य व्यक्त केलं तर काहींनी प्राजक्ता माळीवर सोशल मीडियावर सडकून टीका केली. तर, असाच बोल्ड टीझर अभिनेत्री तेजस्विनी पंडितचाही प्रसिद्ध झाल्यावर तिलाही लोकांनी टीकेचं धनी बनवलं. त्यामुळे सोशल मीडियावर या वेब सीरिजच्या विषयावरून वाद निर्माण झाल्याचं चित्र आहे.
 
मात्र, या दोन्ही अभिनेत्रींनी त्या आपल्या भूमिकांवर ठाम असल्याच्या प्रतिक्रिया माध्यमांना दिल्या आहेत.
 
प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेब सीरिज रीलीज होणार असून यापूर्वी 'रेगे' आणि 'ठाकरे' असे सिनेमे बनवलेल्या अभिजीत पानसे यांची ही कलाकृती आहे.
 
यात प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित प्रमुख भूमिकेत आहेत. त्याचबरोबर डॉ. मोहन आगाशे, मोहन जोशी, सचिन खेडेकर, अनंत जोग, जयंत सावरकर, मकरंद अनासपुरे, वैभव मांगले, माधुरी पवार, उर्मिला कानेटकर, सुरेखा कुडची, जयवंत वाडकर, नम्रता गायकवाड, अशी तगडी आणि मराठीतील आघाडीची स्टारकास्ट या वेबसीरिजमध्ये आहे.
 
मात्र, या सीरिजचे टीझर काही दिवसांपूर्वी रीलीज झाले आणि सोशल मीडियावर याच्यावरच्या वादाला तोंड फुटलं. प्राजक्ता माळीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या टीझरमध्ये तिचा बोल्ड लूक कसा असेल याची झलक प्रेक्षकांसमोर आलेलीच होती. यामुळे प्राजक्ता माळीला ट्रोलही करण्यात आलं.
 
दुसरीकडे तेजस्विनी पंडितही बोल्ड भूमिकेत दिसत आहे. तेजस्विनीचा हा लूक पाहून अनेकांनी तिलाही ट्रोल केलं. मात्र, यावर तेजस्विनी पंडितने या सीरिजच्या ट्रेलर लाँचच्यावेळी आणि तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिची भूमिका मांडलीय.
 
तेजस्विनीनं महाराष्ट्र टाइम्स सोबत बोलताना म्हटलं की, "टीझर पाहिल्यावर लोकांना एक स्त्री कपडे काढताना दिसली, त्यांना त्यामागचा हेतू कळला नाही. टीझरमध्ये मागे पॉलिटिकल व्हॉईस ओव्हर सुरू आहे. त्या राजकीय गदारोळात सामान्य माणूस विवस्त्र होतोय, असा त्यामागचा अर्थ होता. पण अनेकांनी तो समजून घेतला नाही. काही लोकांना त्याविषय़ी गंमत वाटली, तर काही लोकांनी भुवया उंचावल्या. काही जणांनी वाईट कमेंट्सही केल्या. पण चर्चा होतीये. सगळेच निगेटिव्ह बोलत नाहीयेत. 60 जण निगेटिव्ह बोलत असतील, तर 40 जण चांगलंही बोलत आहेत."
 
तेजस्विनी याबद्दल म्हणते की, "माझ्या पाठीशी माझं कुटुंब भक्कमपणे उभं आहे आणि नुसता टीझर पाहून अशाप्रकारे ट्रोल करण्याआधी वेबसीरिज पाहा आणि मग ठरवा ट्रोलर्सकडे मी लक्ष देत नाही." कामाची, भूमिकेची ती गरज असल्याचं तिने स्पष्ट केलं.
 
अभिनेत्री प्राजक्ता माळीने हिने देखील आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिची बाजू स्पष्ट केलीय.
 
"प्रत्येक कलाकाराला आपल्या कारकिर्दीत विविधांगी भूमिकांमध्ये झळकण्याची, समाजात अस्तित्वात असणारी विविध पात्रं साकारण्याची, सतत काहीतरी नवं करण्याची इच्छा असते. मी त्याला अपवाद नाही. लहानपणापासून स्मिता पाटील, रंजना यांना बघत मोठी झाले, (मी त्यांच्याइतकी मोठी नक्कीच नाही.) पण त्यांच्या कारकिर्दीतून प्रेरीत होऊन आणि तुम्हां मायबाप रसिक प्रेक्षकांवर विश्वास ठेवून केलेला हा प्रयत्न."
 
त्यामुळे एकीकडे प्रेक्षकांनी कितीही ट्रोल केलं तरी या अभिनेत्री आपापल्या मतांवर ठाम आहेत. तर दुसरीकडे काहींनी त्यांच्या या भूमिकेचं कौतुकही केलंय.
 
सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया?
सोशल मीडियावर काही नकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या असल्या तरी अनेकांनी या दोन्ही अभिनेत्रींना पाठिंबाही दिला आहे.
 
प्राजक्ता आणि तेजस्विनीच्या काही चाहत्यांनी तुम्ही जे करत आहात, ते चांगलं आहे, तुमच्या कामावर विश्वास आहे, अशा प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.
 
बॉलिवूडमधले चित्रपट, नेटफ्लिक्सवरचा कन्टेन्ट आपण पाहतो, मग मराठीत काही प्रयोग होत असतील तर त्यावरून एवढा गदारोळ का असा एक सूरही सोशल मीडियावर पाहायला मिळाला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती